Tuesday, November 10, 2020

 कृष्णा सोबती 1

एखाद्या लेखिकेपर्यंत किंवा एखाद्या पुस्तकापर्यंत आपण कसे पोहचतो ही सुद्धा एखादी घटना होऊ शकते , असे मला वाटते. बघा ना कृष्णा सोबती यांना ज्ञानपीठ मिळण्याच्या आधी मला विक्रम सहानी यांनी मला त्यांच्या लिखाणाबद्दल सांगितले होते. मी हिंदी पुस्तके वाचण्याची माझी ओढ त्यांना सांगत होते आणि ते म्हणाले की तू कृष्णा सोबती यांचे वाचलेस की नाही ? मी खूप काही वाचलेले नाही, हे मी त्यांना स्पष्ट सांगितले. त्यामुळे मला त्यांनी अनेक हिंदीतले लेखक, गुजराती लेखकांची नावे सांगितली.शिवाय मी त्यांनी सांगितलेली पुस्तके वाचते की नाही याचीही अधूनमधून ते चौकशी करत असतात.त्यामुळे माझ्या वाचनाला वेग आणि वेगळेपण येईल याची मला खात्री वाटते.
कृष्णा सोबती यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. जसे जिंदगीनामा, मित्रो मरजानी, ए लडकी,दिलोदानिश,समयसरगम, यारों के यार, सूरजमुखी अंधेरे में इत्यादी.त्यांच्या साहित्यात त्यांनी सामाजिक संदर्भ मांडले, तसेच माणसा –माणसांमधले सबंधांचेही चित्रण केले आहे.त्यां त्यांच्या विविध लेखनातून वाचकाला आशयसंपन्न तर करतातच पण त्यांनी वापरलेली भाषाशैली आणि ग्रामीण भागातील वातावरणाचा संपन्न असा अनुभव सुद्धा त्या आपल्याला देतात.
कृष्णा सोबती यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२५मध्ये चिनाब नदीकाठी वसलेल्या गुजरात या गावात झाला. हे गुजरात आता पाकिस्तान मध्ये आहे. त्यांचे शिक्षण लाहोरला झाले. फाळणीनंतर त्या दिल्लीला आल्या.त्यांना कोणी तरी विचारलं होतं की , तुमच्या लेखनात फाळणीचं दुःख आणि धार्मिक दंगलींची खोल वेदना जाणवते.’ यावर त्या म्हणाल्या, “स्वातंत्र्य आणि फाळणीचा अनुभव जवळून घेतलेली माणसे मी पाहिली आहेत, ते एवढी वर्ष उलटली तरी अजूनही त्या दुःखद आठवणी विसरलेली नाहीत की फाळणीशी जोडलेलं देशाचं स्वातंत्र्यपर्व विसरली नाही.त्यावेळचा तिरस्कार,खूनमारामाऱ्या काही नको.आपल्या मुल्यांसोबत आपल्याला जगायचं आहे ही जाणीव मनात होती. त्याकाळात त्यांनी सिक्का बदल गया “ ही कथा लिहली. त्यावरून असे वाटते की कोणीही माणूस वैयक्तिक दुःख विसरू शकत नाही.
कृष्णा सोबती म्हणतात की “ माझ्या आजूबाजूच्या वातावरणाने माझं सृजन आणि भाषा निश्चित केली.जे मी जगले तेच मी लिहलं. मी नेहमीच असा प्रयत्न केला की माझी पात्र सदैव माणुसकी आणि निसर्ग याच्या जवळ असतील. वास्तवापासून, सत्यापासून दूर पळणार नाहीत.”
मी जेव्हा त्यांची “ए लडकी “ ही दीर्घकथा वाचली. तेव्हा मला ती खूप आवडली. कारण या कथेत सारं काही होतं. या कथेत काव्य, नाटक, आयुष्यातील सगळे रंग, गंध, एखाद्या माळेसारखे एकत्र गुंफले आहेत. ही कथा मरणाच्या भीतीबद्दल बोलत नाही तर त्याच्याशी दोन हात करण्या विषयी, त्याच्याशी लढण्याविषयी बोलते.यातील स्त्री सांगते की , “जगणं आणि आयुष्य म्हणते प्रतारणा नव्हे तर उलट या दुनियेतून निघून जाणे म्हणजे फसवणूक आहे . हे जग खूप सुंदर आहे. वारा, ऊन, ढग .पाऊस, अंधार,प्रकाश,सारंच सुदंर आहे. इथले सारेच खेळ विलक्षण आहेत. या कथेतील स्त्री जीवनातील आठवणींचा आनंद, सुख अतिशय असोशीने भोगते. या कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ही कथा संवादातून सांगितली आहे,आईमुलीचा संवाद यात आहे.आई मुलीला आठवणीतील अनेक गोष्टी सांगते. पण तिला आपल्या एकट्या मुलीची काळजी आहे.म्हणून ती मुलीला विचारते,” तुझ्या एकटीच्या जगण्यात तू काय सिद्ध करणार? एकमेकांबरोबर राहतांना, जगतांना काहीतरी शिल्लक राहातं, काही वाहून जातं, एकटं असल्यावर काहीच शिल्लक राहत नाही की वाहुनही जात नाही.गरज पडली तर कोणाला हाक मारशील ?” आपल्याला आणि आपल्या आयांनाही हा प्रश्न पडतोच नाही का ?
पण यातली मुलगी म्हणते, “ मो कोणाला हाक मारणार नाही. जो मला हाक मारेन त्याला उत्तर देईन.” या एका छोट्याशा गोष्टीभोवती गोष्ट लिहलेली आहे.या कथेत खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सापडतात.जसे की स्त्री-पुरुष सबंध,नाती, स्त्रीचे स्थान, तिचे हक्क, स्वातंत्र्य, बंधनं,या सर्व मुद्दांवर इथे चर्चा आहे.तीही एका जिवंत भाषेत केलेली आहे असे जाणवते.
त्यांच्या सगळ्याच लेखनाबद्दल लिहू तेवढे थोडे आहे. त्या म्हणजे फक्त एक नाव नाही तर एक ओळख आहे.त्यांनी मागील पन्नास वर्षात अनेक कथा कादंबऱ्या लिहल्या.त्यांचे एक म्हणणे मला फार आवडते, त्या म्हणतात की, धर्मग्रंथ आणि साहित्यिक कृती यात अंतर आहे . ते दोन्ही एकत्र जोडून विचार करू नये कारण साहित्य आणि कलेचे आपले नियम आणि शिस्त असते.”
त्यांना वयाच्या ९२व्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांचे साहित्य वाचून आपण समृद्ध तर होतोच. पण एखादे मूल्य जपतांना कितीही संकटे आली तरी मागे हटायचे नाही हेही आपण त्यांच्याकडून शिकतो.
Image may contain: 1 person, glasses and close-up
Sanjay Kawale, Drpriti Mangesh Kulkarni and 34 others
20 comments
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment