Tuesday, November 10, 2020

#वारी  


नंतर आमच्या बरोबर एक डॉक्टर होते त्यांच्या बरोबर जाऊन ग्रामपंचायत मध्ये गेलो आणि शाळेचे toilet उघडण्याची विनंती केली. ती मान्य झाली. त्यामुळे सगळ्यांची सोय झाली.पण खुपजण शेतातच जात होते.निरा गाव मोठे होते. तेथे माउलींची अंघोळ असते.नदीला भरपूर पाणी होते.

संध्याकाळी प्रवचन होते.त्यांनी ज्ञानेश्वरीतील १८ व्या अध्यायातील ९१७ व्या ओवीवर प्रवचन केले.ओवी अशी होती,
तया सर्वात्मका ईश्वरा !
स्वकर्म कुसुमांची वेळा !
पूजा केली होय अपारा !
तोषालागी!
त्यांनी अगदी सोप्प्या भाषेत , व्यवहारातील उदाहरणे देत प्रवचन केले.त्या म्हणाल्या तुटलेली कर्म चालत नाही. म्हणजे माझ्यावर पडलं म्हणून ते काम केलं तर त्याचे फुल होत नाही. ते फुल टवटवीतच हवे. स्वकर्म म्हणून आनंदाने करावे. त्यांनी लोककथेतील विठ्ठल आणि रुक्मिणी यांची कथा सांगितली. नवीन लग्न झालेल्या रुक्मिणीचे लाजणे सांगितले. त्यावेळी त्यांनी एक लोकगीत म्हटले, त्यातील काही ओळी
‘झाली अंघोळ वाजली घंगाळाची कडी ,
रुक्मिबाई नेवून देई , विठ्ठलाला धोतराची घडी
हे गाणं ऐकून मला नवीन लग्न झालेल्या जोडप्याची मजा आठवली. एकमेकांच्या सहवासासाठी आसुसलेले. पण घरभर एवढी मंडळी की बोलायला सुद्धा मोकळेपणा मिळत नाही.मग त्यासाठी काहीकाही युक्त्या शोधून काढल्या जात.त्यात ऐनवेळी लहान मुले नाहीतर घरातील मोठी माणसं खोडा घालतात आणि त्या दोघांची फजिती होते.हे सगळीकडेच घडते असे नाही.पण लोकगीतात देवाला आपल्या घरातले एक मानून त्याला आपल्या सारख्याच भावना ,अडचणी येतात याचे एक विलक्षण सादरीकरण असते. ते ऐकतांना फार मजा येते. म्हणून मग मला वाटते की लोकगीतातल्या स्त्रिया देवाशी माणसासारखे वडील,भाऊ, नवरा, सखा ,अशी नाती जोडतात. त्यांना त्याची भीती वाटत नाही. गंमत आहे ना ही.मी या गोष्टींकडे असे कधीच पाहिले नव्हते.
प्रवचन झाल्यावर जेवण झाले , मला वाटते त्यादिवशी लापशी होती. स्वयंपाक छानच होता. भूक लागत होती , त्यामुळे अन्न गोड लागत होते.दुसऱ्या दिवशी उशिरा निघालो तरी चालणार होते.तरीही सगळेजण लवकरच उठले ,मी ही अंघोळ वगैरे करून शांत बसले. थोड्यावेळाने पेंढारकर काकांनी आम्हांला मुद्रा शास्त्राची ओळख करून दिली. खूप जणांना त्याचा उपयोग झाला होता. मलाही खोकल्यासाठी त्याचा उपयोग झाला. म्हणजे खोकला आला नाही फारसा.
नीरेहून थोडं उशिरा निघालो, लोणंदला जायचे होते. शाळेच्या बाहेर पडलो , थोड्या अंतरावरच विठ्ठलाचे मंदिर होते. छान ,स्वच्छ मंदिर होते. आमच्या दिंडीतील काही माउली तिथे अभंग म्हणत होत्या. एक डंके म्हणून माउली होत्या , त्यांनी भारुड म्हटले.विठ्ठलाला फोन लावला, त्याच्यावर रुसल्या ,पायांची अशी सुंदर हालचाल केली की नाचण्याचा मोह आपल्यालाही व्हावा.हसत खेळत विठ्ठलाचे नाव कसे घ्यायचे ते शिकवले.आमच्या बरोबर एक कोकीळ म्हणून जोडपं होतं. दोघेही टाळ वाजविण्यात आणि अभंग म्हणण्यात वाकबगार होते.दोघेही नाचत होते, उड्या मारत होते.एकमेकांना सांभाळून घेत मंडळी पांडूरंगाचे नाव घेत होती ,त्याच्याशी भांडत होते. इथे एक भजन म्हटले होते त्यात एक ओळ होती ,’ ह्यांच्या घरी सोनंनाणं , आमच्या घरी संतजन ‘, कोणी म्हणू नका काही आम्ही माणसात नाही’. माझ्या एवढंच लक्षात राहिलं.हे सगळं झाल्यावर आम्ही सगळेच नमस्कार करून निघालो. मी विठ्ठलाला तिथेच सांगून टाकलं की,’ मी तुझे इथेच दर्शन घेते, पंढरपूरला रांगेत मी उभी राहणार नाही.’ तू वाटेत भेटत रहा., तुला ओळखायला शिकव.

No comments:

Post a Comment