Sunday, October 19, 2014

कभी अलविदा ना कहना


   सीमा आणि अतार्किक यांचं काल जोरदार भांडण झालं .सगळ्या कॉलनीने ते ऐकलं.पण रात्रीची वेळ असल्याने सगळ्याच बायकांना शांत बसावं लागलं.फोन करूनही उपयोग नव्हता.कारण सीमा बाई फोनवर खेकसायला कमी करणार नाही.शिवाय म्हणतील तुम्हांला एवढा दम निघत नाही का? उद्या दुपारी मी शिपाया बरोबर निरोप पाठवून बोलवून घेतले असतेच ना? खर आहे तिचं.तिने आम्हांला बोलावून सगळं सांगितलं असतं.कारण भांडण रात्री झालं होतं आणि तिच्याकडे रात्रीच्या वेळी शिपाई नसतो नाहीतर तिचं काम शिपाईच करतो. आम्ही आमच्या शिपाया पासून सगळं लपवायला पाहतो तर हिचं आपलं तिसरच.
   सकाळी पाहिलं तर बाईसाहेब व्यवस्थित आवरून फुलं तोडत होत्या आणि चक्क गाणं गुणगुणत होत्या. हटकलं असतं तर म्हटलं असतं माझ्या नावातच सीमा आहे,मी सगळं मर्यादा सांभाळून करते,काय लढाई करायची असेल ती सीमेवरून करते आणि लगेच समेवर येते.तिची समेवर येण्याचे गुपित जाणून घेण्यासाठी आम्ही दुपारी आपापला नाश्ता घेवून तिच्याकडे जमलो तेव्हा मादाम फार जुन्या काळात गेल्या.आणि कहाणीची सुरुवात करत म्हणाल्या.आटपाट नगर होतं आणि तिथे

  सीमा आणि अतार्किक यांच लग्न नुकतेच ठरलं होतं दोघं मिळून फिरायला वगैरे जात,आणि भरपूर गप्पा मारत.शिवाय इतरांपेक्षा आपलं कसं वेगळं आहे आणि कसे युनिक जोडीदार आहोत आपण हे ही त्यांचं खूप चाले.आठवड्यातून एकदा भेट होत असे त्यामुळे सांगण्यासारखं ही भरपूर असे.एकमेकांचे आई-वडिल,भाऊ-बहीण ,मित्र-मैत्रिणी असं भरपूर गबाळ गोळा करून ते त्यात रमत.स्वतः बद्दल ही ते थोडं बोलत नाही असं नाही.त्यात आवडता सिनेमा,नट-नट्या,आधुनिक आहोत असं दाखविण्यासाठी जे बोलावं लागतं ते सगळं ते बोलत.त्यामुळे भेटीचा शेवट होई तेव्हा विरहाच्या विचाराने त्यांना दुःख होई.मग ते हिंदी सिनेमाच्या गाण्याने “कभी अलविदा ना कहना “ असं म्हणत कसा बसा निरोप घेत असत.
  तिला कालच्या तिच्या भांडणापर्यंत आणण्यासाठी एकजण म्हणाली,म्हणजे आता तुम्ही एकमेकांना अलविदा म्हणणार तर.जणू ती त्यांच्या अलविदा म्हणण्याची वाटच पाहत होती.ती तरी बिचारी काय करणार,रोज तिच्या नवऱ्याकडून ऐकून घ्यावे लागे,सीमा वहिनी बघ,कशा नेहमी हसतमुख असतात ते.सीमानेच अलविदा म्हटलं म्हणजे आपोआपच ती कॉलनी सोडेल आणि ही मग नवऱ्याच्या टोमण्यातून मोकळी होईल.
पण सीमेबाहेर जाईल ती सीमा कसली आणि तार्किकतेने बोलेल तो अतार्किक कसला? सीमा यावर म्हणाली नाही ग बाई,आता कसलं आम्ही अलविदा म्हणतो आहे?
  का ग पोरी मध्ये जीव अडकला आहे का?की नवराच सोडवत नाही.आमच्या प्रश्नाने ती गंभीर होईल आणि रडत रडत काही सांगेन असं वाटलं.पण ती सीमेच्या बाहेर येईच ना.
  ती म्हणाली अग मी अलविदा म्हणायचं तर मला एक घर पाहिजे,नोकरी पाहिजे,घरात चीड चीड करायला माणूस पाहिजे.आणि त्याला सुद्धा स्वयंपाक यायला पाहिजे,बाई ठेवली तरी तिच्यावर चिडता येत नाही,शिवाय उरलेल्या स्वयंपाकाची विल्हेवाट लावायला एक माणूस घरात हजर पाहिजे.म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं की,कभी अलविदा ना कहना.आम्ही जगाला अलविदा म्हणू तेव्हाच एकमेकांना अलविदा म्हणू.
  अग अलविदाची गोष्ट नको सांगू.तुझं भांडणाबद्दल सांग,त्याचे कारण सांग.
काही नाही ग ,नेहमीचच.
म्हणजे?तू कशाला नाही म्हटलं का?
  हो.
कशाला?
अलविदा ना कहना “हे गाणं कोणी म्हटलं आहे हे ओळखायला मी नकार दिला.

  आम्ही सगळ्यांनी डोक्यावर हात मारत आणि आमचेच दात आमच्यावर खात आणि आमच्या नाश्तातला थोडा भाग सीमाला खाऊ घालून आम्ही सीमाला अलविदा म्हटलं.