Sunday, July 12, 2015

अनुभवांना स्मृती असतात पैशांना नाही .


   आपल्याला  आपल्या  शिक्षणासाठी किती पैसे लागले हे माहित नसतं,पण आपल्या  शाळेतील आणि कॉलेजमधील आठवणी आपण  आयुष्यभर काढत असतो .आई वडिलांच्या  दवाखान्यासाठी किती पैसे खर्च झाले हे आपण  काही दिवसांनी विसरून जातो ,पण आई वडिलांच्या  चैतन्यदायी आठवणी नेहमी आपल्याला  आठवत असतात,किंवा आपल्या  तान्हुल्याचा जन्म आणि त्या संबंधित आठवणीना आपण  जीवनभर उजाळा देत असतो .आपल्या  हनिमून साठी किती खर्च झाला हे आपल्या  लक्षात रहात नाही पण आपल्या  शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला एकमेकांबरोबर काढलेले ते सुंदर दिवस आठवत रहातात.पैशांना आठवणी नसतात तर अनुभवांना त्या असतात.
   चांगला –वाईट काळ,समृद्धीचा आणि गरिबीचा काळ,भविष्य सुरक्षित असण्याचा काळ आणि उद्या काय  वाढून ठेवलं आहे हे माहित नसण्याचा काळ,जीवन एखाद्या  चक्रीत बसलो आहे असं वाटण्याचा  काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो .जीवन विपुलतेने भरलेले आणि काहीच नाही असे असले तरी शेवटी काय उरते तर तेव्हा घेतलेल्या अनुभवांच्या आठवणी.काहीवेळेस खिसा पूर्ण भरलेला असतो तर काहीवेळेस पूर्ण रिकामा.काहीवेळेस पुरेसा पैसा असतो  तरी आपण  चिडचिड करतो . काहीवेळेस पुरेसा पैसा नसतो तरी आपल्या  चेहऱ्यावर स्मित असते.आज आपण  मागे वळून पहिले तर आपण  एकमेकांबरोबर बसून किती हसलो याची आठवण काढली तर आपल्या  डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू येतील आणि आपण  एकटेच बसून किती रडलो  हे आठवलं तर आपल्या  चेहऱ्यावर स्मित येईल.या सगळ्यामध्ये जीवन आपल्याला  आपला  स्वतःचा इतिहास निर्माण करण्याचा अनुभव देते आणि त्या आठवणीनी आपले जीवन भरून जाते आणि त्या नेहमी आपण  आठवू शकतो .
   प्रथम आपण  कोणाच्या मदतीशिवाय सायकल चालवायला शिकलात......,कोणाच्या मदतीने गाडी शिकलात ?
  आपल्याला प्रथम कोणी मैत्री साठी प्रथम विचारले?
आपल्या  मुलाचे पहिले रडणे,पहिलं पाउल,पहिला शब्द,पहिला पापा.....
आपल्या  पालकांनी आपल्याला  दिलेली पहिली भेट आणि आपल्या  मुलाने/मुलीने दिलेली पहिली भेट....
  आपलं  पहिलं बक्षीस, लोकांनी  पहिल्यांदा स्वीकारलं तो दिवस,आपला  स्टेज वरचा पहिला कार्यक्रम.....
ही यादी न संपणारी आहे...अनुभवांच्या आठवणी ह्या कालातीत असतात.
हे कोणी नाकारू शकत नाही की कोणत्याही गोष्टीसाठी पैसा लागतो.पण वस्तुस्थिती हीच शिल्लक राहते की त्या अनुभवासाठी किती पैसा खर्च झाला हे विसरले जाते पण तो अनुभव नाही,कधीच नाही.
   आर्थिक मंदी आली तरी त्याने काय होते?येवू द्या.पण आपल्या  जीवनाच्या गुणवत्तेत मंदी यायला नको . त्यामुळे कदाचित आपण आपल्या पालकांच्या काही इच्छा पूर्ण करू शकणार नाही .  पण काही नक्कीच पूर्ण करू शकू . आपण आपल्या   मुलाला पर्यटन स्थळी नेवू शकणार नाही पण स्थानिक बागेत नेवून त्याच्या बरोबर खेळू शकाल ना?पैशामुळे या सगळ्यांची किंमत कमी होणार आहे असं नाही किंवा तुमच्या बाळाला तुमच्या मांडीवर घेतल्याने त्याची किंमत कमी होणार नाही.मंदीच्या काळात  ,ज्ञान विकसित करा,आध्यात्मिक वृद्धी करा या सगळ्या गोष्टी काही पैशावर अवलंबून नसतात.
  काळा बरोबर आर्थिक स्थिती सुधारेल..चलनाला किंमत येईल.या सगळ्या काळात आपण  मागे वळून पहिले तर आपण  काहीच केले नाही केवळ खिन्नतेने लोळत पडलो  असं व्हायला नको.मंदी मुळे आपल्या  कडे पैसा येणार नाही,पण अनुभवांची कमी असणार नाही.जे आपल्याकडे  आहे त्याने आपण  आनंदी होणार नसू  तर आपल्या  कडे कितीही असले तरी आपण  आनंदी होवू शकणार नाही.
   मला कसं आणि काय वाटतं आहे हे माझ्याजवळ किती आहे यावर अवलंबून नाही हा जीवनाचा विचार असेल तर मस्त जगू आपण.