Tuesday, September 23, 2014

रांगोळीची रेघ


  अस्तिवाच्या लढाया सतत आपण देत असतोच,अगदी जन्मापासूनच. हो आपण रडतो,हसतो,वाट्टेल तसे चाळे  करतो ते आपलं अस्तित्व जाणवावं म्हणूनच असेल. काही काही वेळेस तर एखादी व्यक्ती त्या जागी नसते पण तिच्या अस्तित्वाच्या खुणा असतात. सामान्य माणूस त्याच्या नातेवाईकांच्या आठवणीतून का होईना अस्तित्वात राहतो. तर कलाकार त्यांच्या कलेतून आपल्याला जाणवतात. त्यांची एक एक रेषा,शिल्प,शब्द त्यांची ओळख आपल्याला देत असतात. ती रेघ,ते शब्द त्यातील विचार आपण ओळखले नाही तर कलाकाराला ते आवडत नाही,किंवा तो फार थोडा वेळ असे म्हणत असतो की, ते मी माझ्या आनंदासाठी करतो आहे.पण जेव्हा एखादी कला प्रदर्शित होते तेव्हा ती लोकांची आणि लोक कलाकारा बरोबरच स्वतःचेही अस्तित्व त्यात शोधतात,मजा येते. जेव्हा कलाकार आणि आस्वाद घेणारे जेव्हा एकाच नाण्याच्या पण दोन बाजू असतात तेव्हा दोघांनाही एक एकच बाजू दिसते. काहीवेळेस स्वतःला अनभिज्ञ अशा बाजूचा शोध घेता येतो.ती समजून घेता येते. तिचा अनुभव घेता येतो. पण हे सर्व केव्हा जेव्हा स्वतःचे अस्तित्व विसरून आपण काही बघायला जातो तेव्हा. नाही मला अस्तित्वावर लिहायचं नाही किंवा कोणत्या ख्यातनाम कलाकाराबद्दल लिहायचं नाही. पण ज्या दिवशी तो प्रसंग अनुभवला त्या दिवसापासून माझ्या मनात सतत येत आहे की कोणी काढली असेल ती रांगोळीची रेघ,जी इतकी सुंदर आणि नाजूक आहे.
    माढ्याला विठ्ठलाचे/पांडुरंगाचे एक छोटसं मंदिर आहे. असं आम्ही ऐकलं होतं.सोलापूर पासून पंढरपूर जवळ आहे,आणि पंढरपुरात सगळ्यांची विठू माउली आहे. त्या देवळातील प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असला तरी ह्र्दयस्पर्शी असा असतो. प्रत्येकाला त्याचं कोडं सोडवावं वाटतं आणि बहुतेकजण ते सोडविण्यासाठी तेथे जातात.या विठोबाला नमस्कार करून तुम्ही बाहेर आलात,तुमच्या गावी गेलात की तुम्हांला कोणीतरी नक्की सांगेल,काहीवेळेस  गुप्त आवाजात सांगेल की,असं म्हणतात माढयाचा विठोबा हा खरा आहे.ज्यांना या खऱ्या खोट्यात फारसा रस नसतो ते शांत बसतात आणि ज्यांना असतो ते पुरावा मागतात,चर्चा करतात. आपल्याकडे खूप ठिकाणी असे आढळते. तळघरातला देव खरा किंवा सगळ्यात जुना आणि सर्वाना सहज दिसेल अशी देवाची मूर्ती खोटी.मग परकीय आक्रमण,त्यातून वाचण्यासाठी लोकांनी केलेली धडपड असा सगळा इतिहास आपण पुन्हा पुन्हा बोलतो,ऐकतो. काहीवेळेस मजा येते.काहीवेळेस हसू येते. काहीवेळेस कशाचाच अंदाज येत नाही. तरीही आपण त्यात गुंतत जातो.मनाला काय थोडसं काहीतरी थ्रिलिंग हवंच असतं. शिवाय सत्यही समजून घ्यायचं असतं. त्याच्या शोधात मी खी खरच माढ्याला जावून धडकले. लोकांना विचारत विचारत मंदिराजवळ पोहचलो. कारण गावाच्या बाहेर, गावात देवळाकडे जाण्याचा मार्ग अशा सूचना लिहलेल्या नव्हत्या. तशा लिहण्याचे काही कारणही नव्हते. कारण  देवा जवळ  कोणतीही बाजारपेठ नव्हती. शिवाय सरकारला देवळापासून तसा कोणताही प्रत्यक्ष फायदा नव्हता. त्यांच्या आध्यात्मिक फायद्याबद्दल मी काय बोलणार? तो त्यांनाच माहित. गल्ली-त्यापेक्षा बोळकांड्यातून रस्ता काढत देवळाजवळ पोहचले.स्वच्छ,सुंदर आवार आणि तितकच सुंदर, स्वच्छ देऊळ .शांत विठोबा,भक्तांची ये-जा ही शांतच.एकदम प्रसन्न वाटावे असं हे देऊळ पाहून खूप समाधान वाटले.
   खरतर देऊळ लहानच होते. दगडी भिंतींनी बांधलेले नेटके.विठोबाचे सहज दर्शन होईल इतकं सुव्यवस्थित. विठोबाची मूर्ती मात्र खूप जुनी वाटत नव्हती. खरतर हे सर्व नवेच आहे असं वाटावे इतके सगळे चकचकीत होते. खरतर पंढरपूरचा विठोबा पाहिल्यामुळे या मूर्तीचा नवेपणा अधिक जाणवला असेल. पण मूर्तीची स्थापना मात्र खूप जुनी आहे. असे तिथे कोरलेले होते. विठोबा नवा-जुना,खरा-खोटा याच्या नादात आजूबाजूला लक्ष गेले नव्हते.पण मूर्तीचे दर्शन झाल्यावर लक्षात आले की,देवळात कोणतीही अस्वच्छता नाही.शिवाय देवळात आणि देवळाच्या बाहेर एक सुंदर रांगोळी काढली आहे.

  ती रांगोळी पहिली आणि वाटलं,जाणून घ्यावं त्या व्यक्तीला.कारण ती रांगोळी फार मनापासून काढलेली दिसत होती. त्यातील रेषा कलाकाराच्या संवेदनशीलतेच्या होत्या. शिवाय रांगोळी काढणाऱ्या त्या व्यक्तीला स्वतःचे अस्तित्व फक्त त्या रांगोळी पुरतेच आहे असं दाखवायचे होते. मला त्या रांगोळीने काहीतरी नवीन समजल्या सारखे वाटले. वाटलं आपण किती धावपळ करतो आपल्या एखाद्या रेषेसाठी,शब्दासाठी,आपलं अस्तित्व जाणवून देण्यासाठी शहरं हवी आहेत,जाणकार हवे आहेत. कोणाची सूक्ष्म टीका आपल्याला दुःखी करते. तर कोणाचे स्वीकारल्याचे सौम्य हसू जगण्यालायक बनवते. किती लाचार आणि दिनदुबळे होत आहोत आपण.आपलं अस्तित्व इतरांनी मान्य करावं म्हणून किती झटणार आहोत. या रांगोळीच्या रेघे इतकी बेफिकिरी का नाही आपल्यात. त्या व्यक्तीला वाटलेच नसेल का कोणी आपल्याला छान म्हणावे? काय असेल तिच्या मनात. मला खूप अस्वस्थ वाटले. अजून एक गोष्ट त्या रेघेत मला जाणवली,अप्रतिम निष्ठा.आपलं काम चोख,प्रामाणिकपणे आणि तितकेच निष्ठेने करण्याचे बळ त्या रेघेत होते. समोरच्या विठोबाचे अस्तित्व जणू त्या व्यक्तीला रोज जाणवत असावे किंवा कोणी सांगावे तो सखा रोज त्या रांगोळीसाठी तिच्याकडे हट्ट धरत असावा. ते त्यांचे गुपितही असेल.हसू येते मला माझ्या विचित्र मनाचे. बघा ना कोणी नाही तर विठोबासाठी ,तो येत असेल म्हणूनच त्या व्यक्तीने निष्ठेने ती रांगोळीची रेघ काढली असं म्हणून बसले. म्हणजे स्वतःच्या स्वीकृती साठी दुसऱ्याचे अस्तित्व हवेच हा दांभिकांचा कायदा मी विसरतच नाही. बाहेरच्या जगाचा माणसावर किती परिणाम होत असतो. अंतर्मनाला कशाला हवे आहेत हे उपचार,ते या बाह्य उपचारापासून स्वतंत्र्य ,मुक्त असू शकत नाही.? निश्चित असणार. हो ती रांगोळीची रेघ मला हाच विश्वास जणू देत होती. कारण रांगोळी काढणाऱ्या व्यक्तीचं सगळं मन त्या रेघेतून व्यक्त होत होतं. मला ते जाणवत होतं. नित्य जाणवत राहील.तेव्हापासून मला मात्र एक छंद जडलाय. रांगोळीची रेघ बघण्याचा. ती नुसती बारीक,नाजूक असून चालत नाहीतर स्वतंत्र आणि मुक्त आहे का हे बघण्याचा.   

Friday, September 19, 2014

जीवनात ही घडी -


सकाळी सकाळीच घराची बेल वाजली,पाहते तर त्रिपाठी बाईचा शिपाई दारात हजर ,हा? या वेळेला? म्हणजे बाईचा गाण्याचा कार्यक्रम ठरलेला दिसतो.बाईने गाणं गायचं ठरलं की,लगेच कार्यक्रम होतो.इतकी तिची सगळीकडे वट आहे. तिच्या कार्यक्रमाचे बोलावणे नसावे या आशेने मी शिपायाला म्हटलं.
"साहब तो ऑफिस में है ,कुछ काम था क्या?"
आता त्रिपाठी बाईचा शिपाई म्हटलं की हिंदीच बोलायला पाहिजे असं थोडंच आहे,पण असं होतं खरं.ती सुद्धा अमरावतीची आहे,पण हिंदी फाडत असते. तिचा शिपाई धुळ्याचा आहे.तरी आम्ही त्याच्याशी बोलतांना हिंदी फाडतो.
  त्याने लगेच सही साठी कागद पुढे केला.अशा प्रकारचा कागद घेवून आमच्या वर्गात मुरली काका यायचे.पण त्या कागदात सुट्टीची चांगली बातमी असायची.त्या कागदांची आम्ही आतुरतेने वाट पाहायचो,म्हणूनच नशीब अजूनही असे त्रिपाठी बाईचे आमंत्रण पाठवून आमचा डाव आमच्यावर उलटवत आहे असे वाटते.
  तुमच्या बाईसाहेब पार्टी देत आहेत का? 
   मी तो कागद हातात धरून उसना उत्साह आणून विचारले.तर शिपायाने फक्त वाचण्याची खुण केली.त्रिपाठी बाईंची त्याला बिचाऱ्याला कडक शिकवणी आहे,म्हणूनच तो इतर काही बोलत नाही.नाहीतर आमचे शिपाई,आमच्या घरात काय झालं आणि काय नाही याची सगळी उजळणी करतात.आम्ही शिस्तीच्या नाहीत,शिवाय त्रिपाठी बाईच्या मते नोकर माणसाला घरच्यासारखे वागवायचे म्हणजे अगदीच बेशिस्त .मी शिस्तीत कागद वाचला.आज क्लबमध्ये बाईचा गाण्याचा कार्यक्रम होता.त्यासाठी आग्रहाचे आमंत्रण होते.मनात हरे राम म्हटले आणि जनात व्वा फारच छान असं म्हटलं.लगेच शिपायाने सही करा,अशी खुण केली.मी मुकाट्याने सही केली,आणि त्या शिस्तीच्या पुतळ्याला खुण करून निरोप दिला.
  खरं तर मला गाण्यातलं काहीच कळत नाही.आता कोण गातोय असं कोणी विचारलं तर,मी गायक,गायिका असं उत्तर देते.गाणारी व्यक्ती स्त्री-पुरुष एवढच मला कळतं.काही गाणी आणि त्याचे गायक,गायिका पाठ झाल्यामुळे/केल्यामुळे तेवढे मी बिनदिक्कत सांगते.आताशा त्यांची संख्या काहीशी वाढल्याने काहींना मी गाण्यातली दर्दी आहे असं वाटतं.आपल्या बद्दल कोणाला काय वाटावं यासाठी आपल्याला कोणाचं मन थोडच धरता येतं? तशा या आमच्या त्रिपाठी बाईचे मन आणि गळा मी धरू शकत नाही.त्या महिन्यातून दोन तरी त्यांचे कार्यक्रम ठेवतात.सुरवातीला आम्हांला नवीन गावात बरी फुकटात करमणूक होते असं वाटायचं.पण नंतर मालिका पुढे न गेल्याने साचलेपण येतं ना तसं झालं.मग आम्ही न जाण्यासाठी  नवीन नवीन कारणं शोधायला  लागलो.पण त्रिपाठी बाईची  पण साहेबाने अचानक तपासणी साठी ऑफिसमध्ये यावे तशी अचानक निमंत्रणे यायला लागली.त्यामुळे पंचाईत व्हायला लागली.आमचा म्हणजे बायकांचा तिथे चहा –नाष्टा व्हायचा,पण घरी आल्यावर नवरा-मुलांसाठी करत बसावं लागायचं.म्हणून आम्हांला वाईट वाटायचे.आमच्यातल्या  एकीने त्यांना तसं सुचवलं की आम्ही थोडी वर्गणी काढून देतो,आमच्या घरी नाष्टा पाठवावा.तर तिला राग आला.तिने आम्हांला अरसिक ठरवलं.पण काही असलं तरी आम्हांला तिच्या कार्यक्रमाला जावंच लागत होतं कारण ती आमच्यातली सगळ्यात मोठी साहेबीन होती.
   आज त्रिपाठी बेगम साहिबाने जुनी गाणी म्हटली ,तिच्या मते ती शमशाद बेगमची गाणी होती.मी शमशाद बेगमची खूप प्रसिद्ध असलेलीच गाणी ऐकली होती.माझ्यातल्या अज्ञाना मुळे मी काहीच म्हटले नाही.शमशाद नाहीतर त्रिपाठी बेगम गाते आहे ना झालं तर मग.शेवटी बाईने तिचं आवडीचे गाणं गायला घेतलं .जीवनात ही घडी अशीच राहू दे.ती या गाण्यावर का एवढी फिदा आहे माहित नाही.पण तिच्या प्रत्येक मैफिलाचा शेवट ती याच गाण्याने करते.म्हणून कदाचित मैफलीची घडी तिच्या आयुष्यात वारंवार येत असावी आणि तिच्या मुळे आमच्या आयुष्यातही येते.यामुळे माझी चिडचिड झाली ती वेगळीच.
  तिने नेहमी प्रमाणे जाणकाराला  विचारतात तसं मला विचारलं ,काय दुसऱ्या जगात नेवून आणलं की नाही.?मी ही सज्ञान असल्या सारखी मान डोलावली.मला तिथून पटकन निघून जायचे होते.पण बाई काही सोडेना.त्या जीवनात ही घडी गुणगुणत माझ्या जवळ आल्या आणि ओळ पूर्ण करून बोलायला लागणार तेवढ्यात मी म्हटलं,अशा जीवनाच्या घड्या कशाला घालतात,चांगलं मोकळं सोडून द्या ते.बाईंनी माझ्याकडे अज्ञान बालका सारखं पाहिलं आणि म्हटलं,” मला आवडत तसं.”
  मला कपड्यांच्या घड्या सुद्धा आवडत नाही,शिवाय तेच तेच क्षण परत परत येण्यात काय मजा,शिवाय परत परत तीच घडी आल्याने पहिल्यांदा आयुष्यात आलेल्या घडीची किंमत कळत नाही.अजून एक जीवनाची ही घडी आपल्या म्हणण्यावर थोडीच चालते,ती पुढे जातच राहते.सतत पुढे आपल्या वेगाने जात राहणे ही नैसर्गिक घटना आहे.ती आपण थांबवू शकत नाही.शिवाय सारखं बरोबर राहून प्रेमाचा वसंत भांडण्यात आहे हे आपोआपच त्या घडीला कळतं.
  माझ्या या तात्विक बैठकीने बाई माझा नाद सोडतील असं मला वाटलं आणि म्हणूनच केवळ मी मनात येईल ते मी बोलत गेले.तर बाईंना त्यात माझा समंजसपणा  दिसला आणि जीवनाची घडी समजून घेण्यासाठी मला विशेष निमंत्रित केलं.मी ही मग हे राम मनात म्हटलं आणि जरूर  हे जनात म्हटलं आणि एक दिवसाचा नवरा आणि मुलं यांचाही दुपारचा नाष्टा माझ्या पदरात पाडून घेतला.जीवनाची ही घडी म्हणजे त्यांचा शिपाई आमच्या घरच्यासाठी पदार्थ करतो आहे ही  अशीच राहिली तरी चालेल असं मनात म्हणत मी बाईंचा निरोप घेतला

Thursday, September 11, 2014

चला चांगल्याचा आवाज करू या


  एक तरुणी  दैनिकामध्ये उमेदवारी करत होती.तिचे तीन महिन्याचे कठोर प्रशिक्षण संपल्यावर तिला  फिल्ड वर जाऊन एक छापण्यायोग्य स्टोरी आणायला सांगितली होती.सहा तास उन्हात फिरून प्रंचड मेहनत घेवून ती  आपल्याला काहीच करता आले नाही या भावनेने ऑफिस मध्ये पोहचली . ती शहरातल्या एका चौकातून आली होती, तेथे तिने  बघितले की दोन बस विरुद्ध दिशेने रस्त्यावर येत आहेत आणि आता त्या  एकमेकांवर आदळतीलआणि  अपघात होईल..पण या तरुण पत्रकाराने प्रसंगवधान राखले आणि ती  जिथे दोन रस्ते मिळतात तिथे पळत गेली  आणि जोमदारपणे दोन्ही हात पसरवले आणि थांबा असं जोरात किंचाळली.त्यामुळे बस थांबल्या. .अनेक प्रवाशांनी तिचे  हात हातात घेतले कारण तिने  त्यांचा जीव वाचवला होता,अनेक स्त्रियांनी तिच्या  हाताचे चुंबन सुद्धा घेतले आणि तिला  धन्यवाद म्हटले.तिची  ही धाडसी स्टोरी तिने तिच्या संपादकाला  सांगितली ,ते ऐकून  संपादक तिला  म्हणाला,” तू या स्टोरीची  नाट्यात्मकशीर्षक सांगायची सोनेरी संधी चुकवलीस “  
     आपण वाईट जगात राहत नाही .हे खरं आहे की वाईट गोष्टींचीच बातमी होते.जगात वाईट गोष्टींचा फार आवाज होतो,आपण अधिकाधिक असा रस्ता बनवण्याची गरज आहे की,ज्यामुळे चांगल्याचा आवाज होण्याची सुरवात होईल. आता आपण अजिबात अबोल राहयचे नाही.सिगरेट पिणे,दारू पिणे,चुईंगम चघळणे आणि इतर सवयी ज्या अपायकारक आहेत त्यांच्या जाहिराती आपण भरपूर केल्या,पण जगाचे ब्रेनवॉश करण्यासाठी कोणत्या चांगले उपक्रम उपलब्ध आहेत?
    कर चुकविण्याऱ्यांची पहिल्या पानावर ठळक अक्षरात बातमी येते,त्याऐवजी कर भरणाऱ्याची बातमी का येत नाही.खुनी लोकांचे फोटो येतात,त्याऐवजी जीव वाचविणाऱ्याचे फोटो का नाही छापत ?प्रत्येक दिवशी सैनिकाची गोष्ट का नाही सांगत?
  आपण जगभर फिरायला हवे  आणि आपल्याला  माहित असलेल्या चांगल्या लोकांबद्दल बोलायला हवे..आपल्या  मित्रांना आपल्या  पालकांचे सद्गुण सांगायला हवेत . क्लब मध्ये,कट्टयावर,देवळात,मित्रमंडळीत  सांगायला हवे की,,तुम्हांला तुमच्या मुलांविषयी किती अभिमान वाटतो ते? आपल्या  शिक्षकाचे गुण जे आपल्याला  आवडतात ते सांगुयात . आपल्या  भोवतीचे सामान्य लोक त्यांच्या रोजच्या आयुष्यात ज्या असामान्य गोष्टी करतात त्याबद्दल गॉसिप करुयात .आपल्या  सासरच्या लोकांना लिहा की तुमच्या मुला-मुली सारखा जोडीदार मिळाल्याने मला कसं छान  वाटते.किंवा त्याबाबतीत मी भाग्यवान आहे.तुम्ही ज्या काही चांगल्या गोष्टी पाहत आहात त्याबाबतीत  ओरडा,किंचाळा ,लिहा,बोला,तुतारी फुंका, आणि आवाज करा,

  आपलं जग हे चांगल्याचं जग आहे असा प्रभाव सगळ्यां मिळून टाकूया आणि  जगाला प्रभावित करू या.