Sunday, May 10, 2015

असाही एक रस्ता रोको.











    सकाळी/पहाटे फिरायला जाशील तेव्हा छत्री घेऊन बाहेर पड.एक सल्ला. आमच्या कॉलनी ही एक अखंड सल्लागार मंडळ आहे. इथे तुम्हांला कशावरही आणि कोणीही सल्ला देवू शकते.प्रत्येकाच्या क्षमता अप्रतिम आहेत. अर्थात त्याबद्दल परत नंतर कधीतरी.
  छत्री?उद्या पाऊस पडणार आहे का?
नाही.पण ती आवश्यक आहे.
एकतर  पावसाळ्यात सुध्दा माझी छत्री मला सापडू नये अशी मी ठेवलेली असते आणि भर उन्हाळ्यात मी ती  नी ईइ ट ठेवलेली छत्री कशी सापडणार.?पण माझं छोटंसं दुःख मी कोणाला सांगायचा प्रयत्न करत नाही.
तर छत्री का?
आमच्या घरासमोर च्या आंब्यावर कावळ्यांनी घरटी केली आहेत. काही दिवसांपूर्वीच सामुदायिक सोहळा झाल्याचे मला आठवले. कारण एका घरट्यात कावळा किंवा कावळी आपल्या घरट्यात बसली होती आणि त्यांचे बांधव अभिनंदन करण्यास मोठ्या संख्येने जमले होते. मुल जन्माला येण्याचा आनंद ते कॉलनीत प्रचंड कावकाव  करून साजरा करत होते. कदाचित ते हे माणसांकडूनच शिकले असतील. ती नाही साधा सत्यनारायण ,वाढदिवस असेल तरी मोठा भोंगा लावून गाणी ऐकवतात.
    त्या आंब्याच्या झाडावर चार पाच घरटी असतील, त्यामुळे आम्ही झाडाखालून  जात असतांना ते सगळे जण जोरजोरात ओरडायचे.नंतर आम्ही आमच्या डोक्यावर एक काडी, जाड काडी.मोठी काठी असे अनुक्रमे कावळ्यांच्या जोरा नुसार घेऊन जावू लागलो. चालतांना काठी डोक्यावर घेऊन हलवायची.म्हणजे कावळा आमच्या डोक्यापर्यंत यायचा नाही.तरी घाबरून आम्ही पळत पळत ती जागा पार करत असू. ज्या लोकांना माहित नव्हते त्यांना कावळ्यांनी टोच्या मारल्या. काहींना त्यांची चोच डोक्याला जबरदस्त लागली,त्यामुळे जखम झाली. कॉलनीतले काहीजण तर घमेले डोक्यावर घ्यायचे,काहीजण कुंचा घ्यायचे.असे आम्ही सगळेजण छत्रपती होत होतो .
   आम्ही गच्चीतून दुर्बीण घेऊन पाह्यचो कावळ्यांच्या  घरट्यात पाह्यचो  तर ते आमच्या भोवती कलकलाट करायचे.आम्हांला पाह्यचे होते की, खरच कोकिळा त्या घरट्यात अंडी घालते का?पण कावळ्यांना त्यांच्या खाजगी प्रश्नात लक्ष घातलेले आवडत नव्हते.ज्यांच्या अंगणात आंब्याचे झाड होते त्यांना तर घराबाहेर, गच्चीवर सुद्धा जाणे मुश्कील झाले होते. त्यांनी कावळ्यांना कितीही हाकलायचा प्रयत्न केला तरी ते मुळीच दाद देत नव्हते. शिवाय घरातील काही सदस्य कावळीण व तिच्या पिल्लांच्या बाजूचे होते.कॉलनीत एक शाळा आहे, त्या शाळेच्या भिंतीवर अनेकजण कोणी पाहत नाही असं बघून भात,पोळ्या ठेवत होते. त्यामुळे कावळ्यांची खाण्यापिण्याची सोय झाली आणि सगळ्या कॉलनीभर खरकटे सांडू लागले.आपल्या घराच्या स्वच्छते इतका बाहेरचा परिसर काहींना महत्वाचा वाटत नाही. तरी ग्रामपंचायतीने कचरा टाकण्याची उत्तम सोय केली आहे.पण तिथ पर्यंत जाणे लोकांना आवडत नसावे.तर कावळे-कावळीण चांगली धष्टपुष्ट झाली ,त्यांची बाळही अंड्यातून बाहेर आली .त्यामुळे तर आवाजात आणखीनच वाढ झाली.कावळ्यांनी मग त्या झाडा खालून कुत्री ,मांजरे, डुक्करे आणि माणसं जाण्यास मनाई करणे सुरु केले म्हणून ती छत्री.
  मी छत्री घेऊन गेले तर कावळ्याने छत्री वर हल्ला केला. बाळाची सुरक्षा सर्वात महत्वाची होती.पण त्यामुळे सगळीकडे त्यांची दहशत पसरली होती. शाळेची लहान मुले धावत पळत जीव मुठीत घेऊन शाळेत जात होती. आधीच ती लांबून पायी चालत येत आणि या कावळ्यामुळे अजून लांबचा रस्ता त्यांना धरावा लागत असे.

     एक दिवस कसे ते माहित नाही पण कावळ्याची पिल्ले झाडावरून खाली पडली आणि सगळा कावळा समाज रस्त्यावर येऊन उभा राहिला. मग त्या रस्त्यावरून गाड्या जाणे मुश्कील झाले. गाडीवाल्याच्या पाठी २०-२५ कावळ्यांचा समुदाय लागे, त्यामुळे तो गाडी चालवू शकत नसे. एकजण तर गाडीवरून पडला, त्याने तोंड आणि डोळे झाकून टाकले म्हणून ते कसेबसे वाचले पण त्या माणसाच्या डोक्याला जबर जखमा झाल्या.कावळे कुत्र्यांवर चोची मारू लागले.दिवसभर असं काही ना काही होतच होते.पण त्या दिवशी अचानक पावसाचे खूप भरून आले,अंधार झाला तसा कावळ्यांचा आवाज शांत झाला. मधून मधून ते रस्त्यावर आहेत याची जाणीव करून द्यायचे.पण पावसामुळे रहदारी कमी झाली होती.रात्र झाली तसे सगळ्याचेच तिथले लक्ष कमी झाले. जो तो आपल्या घरच्या चौकटीत आणि टीव्हीच्या चौकटीत नेहमीपेक्षा वेगळ्या दुनियेचा आस्वाद घेत झोपी गेला.

     सकाळी मैदानावर जाण्यासाठी बाहेर आले तर झाडाखाली दोन्ही पिल्ले मेलेली होती.ती पावसाच्या पाण्याने मेली होती की गाडीच्या धक्क्याने हे कळायला मार्ग नव्हता.बाळांचे आई वडील हताशपणे त्यांच्याकडे पाहत होते. आपल्या बाळांसाठी त्यांनी जीवाच्या परीने सगळे केले होते.पण निसर्गाच्या पुढे आणि सत्ते पुढे त्यांचे काही चालले नाही. सांत्वन करायला सगळेजण पुढे होते, त्यात चढाओढ लागली होती पण त्यासाठी ठोस कृती कोणीच करायला आले नाही. कारण सत्ता कोणाच्या हातात आहे आणि त्याचे श्रेय कोणाला मिळणार हे नक्की होत नव्हते. माणसांच्या रास्तारोको सारखाच हे ही आंदोलन त्यांना गुंडाळावे लागले.