Thursday, March 10, 2016

शोध

  ज्या काळात ,ज्या समाजात , ज्या वर्गात, ज्या कुटुंबात आपला जन्म होतो त्यातून जगण्याकरता बरेच काही  मिळते. पण ते पुरेसे नसते. विशेषतः  सामाजिक आणि वैयक्तिक संक्रमण काळात त्याचा अपुरेपणा जास्त जास्त जाणवू लागतो. तो  जाणवल्यावर जी अस्वस्थता निर्माण होते  ती वाढता वाढता कधी ती तुमच्या आयुष्याला मुळापासून हादरा देते, अशावेळी तुम्हांला  चौकटीबाहेरचा आधार शोधावा लागतो. तो आधार कधी एखादी व्यक्ती असते, एखादी विचारप्रणाली असते किंवा एखादे पुस्तक असते. मग आपण त्या पुस्तकाला आपल्या मिठीत घेतो, आपलेसे करतो, सामावून घेतो. त्यातून मिळालेल्या नवीन उर्जेने प्रेरित होवून दुसऱ्या पुस्तकाचा शोध घेतो.
  अवघ्या विश्वाविषयी --- त्यातल्या सगळ्या बऱ्यावाईटा सकट ---आजही मला लहान मुलासारखी निरागस कुतूहलाची भावना टिकवून धरता आली आहे. त्यामुळे उत्सुकतेने आपोआपच वाचन होते.
     या वाचन आणि लेखनाने मला काय दिले याचा मी विचार करते तेव्हा लक्षात आले की, मी स्वतःच अंशाअंशाने स्वतःला मुक्त करायला शिकते आहे. अंतर्विरोधाशी मुकाबला करीत हे साधता आले तर पाहायचे.माझ्या मनात त्याबद्दल काय आहे याविषयी आज मी लिहित आहे.
      मी विवाहित स्त्रीवादी आहे.म्हणजे नेमके काय?तर दोन दिशांमध्ये माझी ओढाताण होते. एका बाजूला परंपरागत मुल्ये,संकेत,रीतीरिवाज ,आणि दुसऱ्या बाजूला स्त्रीवादी विचारप्रणालीशी असलेली माझी बांधिलकी- विश्वास म्हणू हवे तर.मला रीतीरिवाजांत एक प्रकारची सुरक्षितता ,स्वस्थता जाणवते.पण या रीतीरिवाजांनीच स्त्रीला दुय्यम नागरिकत्व दिले, ही गोष्ट आवडत नाही. मला पुरुषाशी असलेले दिर्घकालीन ,दृढ नाते आवडते,पण तिला कुणी ‘अर्धांगी’ म्हटले, की मला  आवडत नाही.पूर्ण पुरुष असतो, मग पूर्ण स्त्री का नाही?मला कुटुंब, कुटुंबातील विविध नात्यांनी आपल्याजवळ आलेली माणसे हवीशी वाटतात.इथे मला माझ्या स्त्री वादी  विचारांनी खूप मदत केली. माझी आई,बहीण,आत्या, मावशी काकू  आणि माझ्या सासवा, नणंदा ,जावा यांच्या कडे मी व्यक्ती म्हणून पाहायला शिकले.कोणाच्याही वागण्याचे विश्लेषण करतांना त्यांच्या आतल्या अंतर्विरोधाचा मी विचार करू लागले.आणि त्यातून मी त्यांना किती समजून घेऊ शकले ते माहित नाही पण मला स्वतःला समजून घेण्याच्या प्रक्रियेत मी अधिक सजग झाले.मग मात्र मला स्त्री वादा पेक्षा मानवतेची कल्पना अधिक व्यापक आहे, हे पटले.पण तरीही  माझ्या मनात प्रश्न येतो की,या जाणीवा बऱ्याच आधी झाल्या असत्या, तर त्यामुळे चित्र फार बदलले असते का? हे अंतर्विरोध नाहीसे झाले असते का? मला तसे वाटत नाही. कारण तो स्त्री जाणीवेचाच एक शाश्वत भाग आहे.मला वाटते आपल्याला मुळे ( रुट्स )हवी असतातच.पण त्या मुळांनीच जर करकचून बांधले ,तर म्हणजे A married feminist wants roots,but doesn’t want to feel rooted”. पण त्यातील अमुक बंधने नकोत, या भावनेतून तर विविध प्रकारचे अंतर्विरोध तयार होतात.

  तरीही प्रश्न राहतोच,मग याला मार्ग कोणता? मार्ग एकच. गुंता सोडवत राहायचे,आपले कुटुंबाशी, व्यवसायाशी, समाजाशी असलेले नाते शोधत राहायचे. समांतरपणे  शरीराशी- आणि फक्त स्वतःशी असलेले नातेही. कारण ते अधिक महत्वाचे. तो शोध लागत राहिला, तर मग फार ओढाताण होणार नाही. फार तुटल्यासारखेही वाटणार नाही. हा शोध घेणे सोपे नाही. त्यामुळे सापडलेले मार्ग नि:शंकपणे चोखाळणे हे ही सोपे नाही.हे ठाऊक असले, तरी थांबायचे नाही.मला वाटते शोधातूनच आपले दुभंगलेपण,गोंधळलेपण कमी होत जाईल. विरोधातून विकास साधत जाईल.जीवनाच्या या वाहत्या प्रवाहात आपणही अखंडपणे बदलत राहावे आणि अखेर कुठेतरी आपल्या ‘स्थायी’पणाला भिडावे. तसे कधीतरी घडेल या विचारानेच मी फार सुखावते, थरारून जाते.