Monday, April 27, 2015

व्यक्त होण्याचा सुंदर मार्ग


  आपल्याला सगळ्यांनाच चित्र काढायची, गाणी म्हणायची खूप हौस असते. लहानपणी काहींची कमी अधिक प्रमाणात ती पूर्ण होते. ज्यांना घरून चांगला पाठींबा मिळतो आणि कला जोपासायची संधी मिळते त्या व्यक्ती पुढे त्या त्या कलांमध्ये नावही कमावतात.पण आपल्या सगळ्यांनाच रंग पाहिले की त्यांचे काहीतरी सुंदर करावे असे वाटते.मग मुलांच्या हातातच असे रंग,ब्रश आणि भिंती सारखा मोठा कॅनव्हास मिळाला तर? मुलं  खूप खुश होतील.असा अनुभव सोलापूर येथे  बालभवनच्या मुलांनी घेतला.
   मुलांनी एक संपूर्ण भिंत आपल्या विविध कलाकृतींनी सजवली.प्रत्येकाने आपल्या भावविश्वाला जवळचे चित्र काढले,त्याला हवा तो रंग दिला. सूर्य,डोंगर,फुले,पाने, मांजरे,उंदीर,घर,झाडे,कार्टून,असा सगळ्यांचा समावेश असलेली ती भिंत म्हणजे आम्हांला व्यक्त व्हायचे आहे ही  सांगणारी हाक आहे. मुलं जेव्हा चित्रे काढत होती तेव्हा ती सगळ्या गोष्टींचे भान विसरली होती. त्या रंगाची ,चित्रांची झाली होती. मला तर कळले की एक लहान दीड- दोन वर्षाची मुलगी तर आपले भावंड चित्र काढत आहे हे पाहून स्वतः चित्र काढायला पुढे झाली. तिच्या हातात रंग आणि ब्रश दिला तेव्हा ती मनापासून त्यात रमली. चित्र काढून एक हात दुखायला लागला तर दुसऱ्या हाताने कामाला सुरुवात केली.कोणी तिला मागून विचारले की तू काय काढतेस? तर त्या व्यक्ती कडे एक दृष्टी टाकून त्या मुलीने आपली चित्र काढायची जागा बदलली.कामात कोणताही व्यत्यय तिला  मंजूर नव्हता.
  आपण नेहमीच म्हणतो की मुलं मन लावून काही करत नाहीत पण ती जेव्हा मन लावून काम करतात तेव्हा आपणच त्यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडत असतो.मुलं एखाद्या गोष्टीत मग्न असतील तेव्हा आपण मोठी माणसं त्यांना म्हणतो,’चला आता उठा, दुसरं काही तरी  करा, किंवा आता झोपायची वेळ झाली किंवा आता हे करा आणि ते करा. का आपण असं वागतो?विचार करायला हवा ना? ही मुलं कसं शोधणार त्यांना काय आवडत ते? ती कशात रमतात हे त्यांचे त्यांनाच कळायला हवे ना? मग आपण तशी संधी त्यांना द्यायला हवी नाही का?
         सोलापूर येथे बालभवनने  अशी संधी मुलांना दिली.पण आपण सगळ्यांनी ठरवले तर अशी सुंदर चित्रे काढायची संधी मुलांना देवू शकतो. आपला बंगला असेल तर त्याची कंपाऊंडची भिंत असेल, सोसायटीची  भिंत असेल ,त्या त्या भागातल्या मुलांना गोळा करून त्यांचा सुट्टीचा काळ मजेत आणि सर्जनशिलतेत त्यांना घालवता येईल.आपण काढलेली चित्रे रोज बघतांना मुलांच्या मनावर आपोआपच परिसर नेटका ठेवण्याचा संस्कार होईल. काय हरकत आहे असे बालभवन सोसायटी सोसायटीत आपापल्या पातळीवर निर्माण झाली तर?माझ्या डोळ्यासमोर एक आख्ख शहरच अशा चित्रांनी रंगल्याचे दिसत आहे.मग आपोआपच कोणता रंग कोणत्या समाजाशी जोडला गेला आहे हे विसरायला होईल आणि त्या रंगाची खरी मजा घेता येईल.आपण भाषा,प्रदेश,कपडे,आणि रंगाची फार विभागणी केली आहे. ती आपली व्यक्त होण्यातल्या  उदारतेला मर्यादा आणते.पण ही मुलं रंगाचा रंग म्हणून वापर करतील. त्यात सगळेजण समान असतील आणि एकमेकांचा मान ठेवतील आदर करतील.आपले मत वेगळे आहे हे सांगण्यासाठी हातात दगड,बंदुक,घ्यावे लागत नाही हे त्यांना कळेल.चित्रासाठी ,सुंदर चित्रासाठी, कलेसाठी सगळ्या रंगाची तेवढीच गरज आहे हे त्यांना आपोआपच कळेल.कोणताही एकच रंग हे जग सुंदर करणार नाही. सगळ्यांना एकमेकांचा हात धरला तर आनंदाने फेर धरता येईल.हा विश्वास त्यांना ही चित्रे देतील.

   एखाद्या शहरात मुलांनी चित्रे काढावी म्हणून त्यांना आख्खी भिंत मिळावी या सारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही.ही भिंत सोलापूर मधील संगमेश्वर महाविद्यालयाने बालभवनच्या मुलांसाठी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचेही कौतुक आहेच. समाजातील सगळ्यांनीच मुलांसाठीच्या कामात आपापला सहभाग नोंदवला की निरोगी ,परिपक्व समाज घडण्यास फारसा उशीर लागणार नाही.मुख्य म्हणजे अशा समाजाची ,ज्यात एकमेकांना व्यक्त होण्याची संधी मिळते आणि दुसऱ्याचा मताचा आदर केला जातो अशा वातावरणाची आपण सगळेचजण  खूप वाट पहात आहोत.अर्थात असा समाज  आपल्या वागणुकीतून आणि दुसऱ्याला व्यक्त होण्यास किती संधी देतो यावर अवलंबून आहे.त्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच प्रयत्न करायची गरज आहे. पण मुलांचे हे चित्र मात्र माझ्या मनात खूप आशा निर्माण करत आहे.