Wednesday, September 16, 2015

पेरते व्हा.

                                  







  गेल्या तीन महिन्यांपासून रोज सकाळ संध्याकाळ “ पेरते  व्हा” चा गजर होत आहे. पानांच्या आडून तो सारखा ओरडत असतो म्हणून त्याला शोधत अनेक झाडांना  दुर्बिण लावली.मग दुर्बिणीपेक्षा स्वतःच्या डोळ्यावरचा विश्वास अधिक वाटला म्हणून ती बाजूला ठेवली आणि डोळे ताणून ताणून त्याला शोधलं.तर तो पानांच्या गर्दीत लपून आपलं काम करत होता.हो खरच तो “पावशा” होता.सगळ्यांना “पेरते व्हा” ची हाक देण्याचे काम पोटतिडकीने करत होता.त्याला बघून माझ्या डोळ्यात खरं तर पाणीच आलं. खूप दिवसापासून त्याला शोधत होते.आजूबाजूला चाललेल्या या गोंधळात त्याचीच हाक जणू मला वाट  दाखवत आहे  असंच वाटते . तो आहे आणि काहीतरी चांगलं पेरायला सांगत आहे हे ऐकून तर मन खुश होत होतं.वाटायचं हाच एकमेव असा आहे की ज्याला कोणत्याही अभिनिवेशा शिवाय काहीतरी चांगलं पेरायचं आहे.मन हलकं झालं, आणि त्याच बरोबर मनाला  वस्तुस्थितीची करकरीत जाणीव झाली.
    हो जून महिन्यापासून पावसाळा सुरु झाला पण पाउस काही नीट पडला नाही.रस्ताही ओला झाला नव्हता.कुंडीतली झाडे सुद्धा वरून दिलेल्या पाण्यात खुश नव्हती त्यांना रिमझिम सरीच हव्या होत्या.विहिरीतल्या पाण्यावर लावलेला सोयाबीन सुद्धा वर तोंड करून बसला होता.पण पाउस रुसलाच होता.तो भरून येत होता पण हट्टीपणे तो ढगांचा हात सोडत नव्हता. जणू खाली आल्यावर आम्ही त्याला खुशाली विचारणारच नव्हतो.त्याची ठेप ठेवणार नव्हतो.असं वाटत होतं का त्याला?की तो यावा असं आम्हांला वाटत नाही अशी आमची वागणूक होती.खरंतर सगळेचजण मनोमन सारखी त्याची आराधना करत होते पण तो कोणत्याही प्रार्थनेला फसायचं नाही असंच जणू ठरवत होता. वर्षोनुवर्षे आम्ही जे वागत आहोत त्याचं फळ तो अशारीतीने आम्हांला देणार होता.   
 पाउस असा हट्टीपणा करत होता आणि पावश्याही  हट्टीपणे “पेरते व्हा” असं सारखं सांगत होता.बी पेरण्यासारखी परिस्थिती नसतांना हा आणखी काय पेरायला सांगत असावा कोण जाणे? अर्थात सगळीकडे अनेकजण विशिष्ट चौकटीत असणारी आपली ठाम मते   आपल्या परीने पेरत  आहेत .,पण त्या सगळ्या विचारांचा सर्व सामान्य माणसाला उपयोग  होईल का? की त्रास होईल.?विरोधी मते असणारी माणसे एकमेकांच्या मतासाठी किंचितशी तरी जागा देतील का?थोडं वेगळ्या वाणाचे बी पेरून बघतील का? असा विचार कोणी करत असेल का?तो त्यांनी करावा हेच तर पावशा सांगत आहे असं मला वाटतं.एवढ्या मतमतांतरे असलेल्या समाजात तो फक्त “पेरते व्हा” ची हाक देतो आहे हेच खूप सकारात्मक आहे. असे मला वाटते.