Friday, October 2, 2015

डेस्टिनेशन सेवाग्राम


  












“अपनी आवश्यकताए बढाते रहने की पागल दौड में जो लोग आज लगे है; वे निरर्थक मान रहे है की, इस तरह खुद अपने स्वत्व में, अपने सच्चे ज्ञान में वृद्धी  कर रहे है. उन सबके लिए “हम यह क्या कर बैठे”? ऐसा पुछने का समय एक दिन आए बगेर रहेगा नही. एक के बाद एक अनेक संस्कृतियां आयी और गयी, लेकिन प्रगती के बढाई के बावजूद भी मुझे बार बार पुछने का मन होता है की यह सब किसलिए ? इसका प्रयोजन क्या? डार्विन के समकालीन वालेस् ने कहा की, तरह तरह की नयी नयी खोजो के पश्चात पचास वर्ष में मानव जाती की नैतिक उंचाई एक भी इंच बढी नहीं. तोलस्तोय ने यही बात कही. इसामसीह, बुद्ध और मोहम्मद पैंगबर सभी ने एकही बात कही है.”
                                                    म. गांधी
   हे सर्व म. गांधीच्या सेवाग्राम येथील कार्यालयाच्या बाहेर बोर्डावर हिंदी आणि इंग्लिश मध्ये लिहीलेले आहे. आज आपण सर्वजण त्याच समस्येला तोंड देत आहोत. आम्हीही या पागल दौड मधून थोडं थांबू शकलो. पण या पागल दौड मधून मुळातच नसलेल्या काही व्यक्ती तिथे भेटल्या. गांधीजीनी सांगितल्याप्रमाणे ते आचरण करत आहे. बाहेरच्या धावत्या जगापासून लांब राहून स्वतःला नक्की काय करायचं आहे हे त्यांना लवकर कळल्यामुळे त्या स्थिर नजरेने आणि बापूजींच्या विचाराने जगाकडे पाहण्याचा प्रयत्न करतांना दिसतात.
  आम्ही सेवाग्राम पोहचलो तेव्हा रस्तावर आदल्या दिवशी उडालेल्या दिवाळीच्या फटाक्यांच्या खुणा आजूबाजूला दिसत होत्या. पण जसजसे बापुकूटीच्या दिशेने गेलो तसतसा शांत झालेला रस्ता अनुभवता आला. खुद्द बापूजींच्या आश्रमात गेलो तेव्हा प्रत्येकजण स्वतःची कामे शांततेने करत होता. तिथे कोरीयाहून तरुण मुलं-मुली आले होते. ते वर्षातून तीन वेळा ८-८ दिवसांची भेट देतात. तिथेच राहतात. आश्रमाच्या पद्धतीने जीवन जगतात. शिवाय गांधीजींचे विचार आजच्या काळात कसे उपयोगी आहेत याचा अभ्यास करतात आणि चर्चेद्वारे एकमेकांना सांगतात.
   आश्रमात गांधीजी जेव्हा सर्वप्रथम आले तेव्हा ते ज्या ठिकाणी राहिले ती जागा आजही तशीच सुव्यवस्थित ठेवलेली आहे. घराच्या पांढऱ्या मातीच्या भिंती, जमीन आणि लाकडी खांब हे त्याच परिसरात उपलब्ध असणाऱ्या साधनांपासून बनवलेले आहे. त्याला ‘आदिनिवास’ असे म्हटले जाते. आपण त्या ठिकाणी शांत बसू शकतो आणि आपल्या आतल्या आवाजाला साद घालू शकतो. काहीशा प्रयत्नाने तो आपल्याला नक्कीच ऐकू येईल. पण त्यासाठी प्रयत्न हवेत. कारण आजच्या गोंगाटाच्या काळात त्याला आपल्या सादेची सवयच नाही. म्हणून रोजच्या हळूहळू प्रयत्नाने तो आपल्याला निश्चितच ऐकू येवू शकतो. ‘आदिनिवास’ सारखेच ‘बा’ कुटी ही तिथ आहे. त्यांचे न्हाणीघर, त्यांनी वापरलेल्या वस्तू, गांधीजीचे ‘बा’ ला लिहिलेले पत्र ज्यात “तुझ्याशिवाय मी असूच शकत नाही” हे सांगितले आहे. तसेच त्यांनी “बा” ची केलेली सेवा याचेही वर्णन तिथे लिहिले आहे. तिसरी कुटी आहे- बापूजींचे दप्तर. तिथे पुस्तके ठेवलेली आहेत. ते वापरत त्या वस्तू- उदा.-दगडाचा पेपरवेट,-पेनपात्र इ. एका कुटीला ‘आखरी निवास’ म्हटले आहे. गांधीजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उसळलेली दंगल शांत करण्यासाठी इथून गेले ते परत आलेच नाहीत. ह्या सगळ्या कुटी मध्ये आपण बापूजींना अनुभवू शकतो. कारण आपण त्यांच्या बद्दल वाचलेलं असतं आणि एका ऐतिहासिक वस्तुत उभे असतो.
   एका साध्या माणसाने आपल्या सोप्या सहज वाटणाऱ्या पण आचरण्यास अवघड अशा विचारानी सारा देश ढवळून काढला. जगाला अचंबित केले. कोणती शक्ती होती त्यांच्याजवळ? या विचाराने आपण त्यांच्याविषयी अधिक जागृत होतो. ते फक्त राजकारणासाठीच केवळ आपला आदर्श ठरत नाहीत, तर पार स्वयंपाक घरापर्यंत ते आपल्याला आदर्शवत वाटतात. जेवतांना कोणते नियम पाळायचे हे त्यांनी सांगितलेले आहेत. ते तिथल्या जेवणघरात लिहून ठेवले आहेत. साध्या गोष्टी पण त्याचा समोरच्या माणसावर कसा परिणाम होईल याची अचूक जाण त्यांच्या जवळ होती. अत्यंत साधं जेवण, शिवाय त्या आश्रमाच्या शेतात पिकलेला भाजीपाला, धान्य यांचा योग्य वापर तिथे होतांना दिसतो. गांधीजी म्हणत की एखादी भाजी कच्ची राहिली असेल तरी ती तशीच सोडून द्या. त्यामुळे तुम्ही काही अर्ध पोटी राहणार नाही. जेवणात काय कमी आहे किंवा त्रुटी आहेत हे नंतर चिठ्ठी लिहून त्या व्यक्तीजवळ सांगा. पानावरच रागवू नका. आज घराघरातल्या सर्वांनी ही सवय अंगिकारली पाहिजे. नाहीतर आपल्याला जेवणावर टीका-टिप्पणी करण्याची कोण घाई होते. तीच तत्परता मात्र आपण कौतुक करण्यावेळी दाखवत नाही.
    आश्रमात पहाटे ४.४५ वा. प्रार्थना होते. त्या प्रार्थनेत संस्कृत श्लोका बरोबर, मुस्लीम, ख्रिश्चन या धर्मातील प्रार्थनांचाही समावेश आहे. पहाटेच्या वेळी नुकतेच उजाडायच्या वेळी सर्वत्र शांतता असतांना म्हटलेली प्रार्थना हा एक चांगला अनुभव आहे. आपण ज्या रस्त्यावरून जाणार आहोत त्या रस्त्यावर गांधीजींच्या या प्रार्थना सोबत करतात असे वाटते.
   आश्रमात  सकाळी ७ वा. नाष्टा असतो. नंतर आपण आश्रमाच्या कामात मदत करायची. शेतात, गाईचे करण्यासाठी, स्वयंपाकघरात किंवा इतर ठिकाणी मदत करायची. ते आपल्याला सांगत नाहीत. आपण होवूनच ती करायची. नंतर ११वा. जेवण १२वा. विश्रांती. नंतर परत काम. ५ वा. जेवण. संध्याकाळी ५.३०ला प्रार्थना असते. असा सर्वसाधारण दिनक्रम तिथे आहे. वेगवेगळ्या धर्म-जातीतील लोक तिथे सतत भेट देत असतात. उत्सुकतेने आपले प्रश्न तेथील कार्यकर्त्यांना विचारतात. ते ही त्यांचे समाधान करण्याचे प्रयत्न करतात. अन्यथा कोणत्या पुस्तकात याबद्दल लिहिले आहे ते सांगतात. तेथे राहणारे कार्यकर्ते हे देशाच्या विविध भागातून आलेले आहेत आणि तरुण आहेत. ”पागल दौड” मधून बाजूला झालेले आहेत.
    मालती देशमुख ह्या गेल्या १२ वर्षांपासून तिथे राहत आहेत. मालतीताई लहानपणापासूनच गांधीजीबद्दल ऐकत होती, वाचत होती. ती सुरुवातीला थोड्या दिवसासाठी आश्रमात राहियला आली आणि नंतर कायमचे इथेच राहायचे असे तिने ठरवले. अत्यंत साधा पोषाख, आश्रमातील सर्व बारीकसारीक गोष्टींकडे परिपूर्ण लक्ष आणि काम करण्यात आणि मदत करण्यात तत्परता. गांधीजीविषयीच्या गोष्टी ती जशी आपल्याला छान सांगते, तशी आश्रमातील गोठ्यातील गायींचे कौतिकही ती फार प्रेमळपणाने करते. गायीबद्दल तिचा जिव्हाळा प्रत्यक्ष पाहण्यासारखा आहे. गाईचा गोठा म्हंटले की आपण नाकावर लगेच रुमाल धरतो. पण आश्रमातील गाईंच्या गोठ्यात गो पूजनाच्या दिवशी एक छान गाण्याचा कार्यक्रम होवू शकतो. तिथे पाच पन्नास जण ऐसपैस मांड्या घालून बसू शकतात. इतका स्वच्छ तो गोठा आहे. येथील प्रत्येक कार्यकर्त्याला दरवर्षी एक काम सोपवले जाते. त्याचे वर्षाच्या शेवटी मुल्यांकन होते. यावर्षी सडा आणि गाईचे काम मालती कडे आहे.
    इथे मालतीताई बरोबरच जेनी व ललिता या आसामहून आलेल्या मुली आहेत. जेनी ९ वर्षापासून एकटी राहते तर ललिता ५ वर्षापासून . तसेच विनोद भाई पण एकटे राहतात. या सगळ्यांनीच आश्रमाचे जीवन कंटाळा न करता स्वीकारले आहे असे त्यांच्या वर्तनातून दिसते. प्रत्येकजण गांधीजींनी केलेल्या विविध प्रयोगात जाणकार आहेत. कोणी आपल्याला ‘नई तालीम’ विषयी माहिती देतात, तर कोणी गांधीजींच्या अहिंसे विषयी सांगतात. आपल्या प्रश्नांना ते त्यांच्या परीने भिडतात. या ठिकाणी आपल्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची गुंतवळ सोडविण्यास हा परिसर नक्कीच मदत करतो. फक्त आपल्याला ‘पागल दौड’ मधून थोडेसे बाजूला सरकावे लागते. त्यामुळे आपण नकी मागे पडणार हे मात्र नक्की.