Tuesday, November 10, 2020

 कृष्णा सोबती 1

एखाद्या लेखिकेपर्यंत किंवा एखाद्या पुस्तकापर्यंत आपण कसे पोहचतो ही सुद्धा एखादी घटना होऊ शकते , असे मला वाटते. बघा ना कृष्णा सोबती यांना ज्ञानपीठ मिळण्याच्या आधी मला विक्रम सहानी यांनी मला त्यांच्या लिखाणाबद्दल सांगितले होते. मी हिंदी पुस्तके वाचण्याची माझी ओढ त्यांना सांगत होते आणि ते म्हणाले की तू कृष्णा सोबती यांचे वाचलेस की नाही ? मी खूप काही वाचलेले नाही, हे मी त्यांना स्पष्ट सांगितले. त्यामुळे मला त्यांनी अनेक हिंदीतले लेखक, गुजराती लेखकांची नावे सांगितली.शिवाय मी त्यांनी सांगितलेली पुस्तके वाचते की नाही याचीही अधूनमधून ते चौकशी करत असतात.त्यामुळे माझ्या वाचनाला वेग आणि वेगळेपण येईल याची मला खात्री वाटते.
कृष्णा सोबती यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. जसे जिंदगीनामा, मित्रो मरजानी, ए लडकी,दिलोदानिश,समयसरगम, यारों के यार, सूरजमुखी अंधेरे में इत्यादी.त्यांच्या साहित्यात त्यांनी सामाजिक संदर्भ मांडले, तसेच माणसा –माणसांमधले सबंधांचेही चित्रण केले आहे.त्यां त्यांच्या विविध लेखनातून वाचकाला आशयसंपन्न तर करतातच पण त्यांनी वापरलेली भाषाशैली आणि ग्रामीण भागातील वातावरणाचा संपन्न असा अनुभव सुद्धा त्या आपल्याला देतात.
कृष्णा सोबती यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२५मध्ये चिनाब नदीकाठी वसलेल्या गुजरात या गावात झाला. हे गुजरात आता पाकिस्तान मध्ये आहे. त्यांचे शिक्षण लाहोरला झाले. फाळणीनंतर त्या दिल्लीला आल्या.त्यांना कोणी तरी विचारलं होतं की , तुमच्या लेखनात फाळणीचं दुःख आणि धार्मिक दंगलींची खोल वेदना जाणवते.’ यावर त्या म्हणाल्या, “स्वातंत्र्य आणि फाळणीचा अनुभव जवळून घेतलेली माणसे मी पाहिली आहेत, ते एवढी वर्ष उलटली तरी अजूनही त्या दुःखद आठवणी विसरलेली नाहीत की फाळणीशी जोडलेलं देशाचं स्वातंत्र्यपर्व विसरली नाही.त्यावेळचा तिरस्कार,खूनमारामाऱ्या काही नको.आपल्या मुल्यांसोबत आपल्याला जगायचं आहे ही जाणीव मनात होती. त्याकाळात त्यांनी सिक्का बदल गया “ ही कथा लिहली. त्यावरून असे वाटते की कोणीही माणूस वैयक्तिक दुःख विसरू शकत नाही.
कृष्णा सोबती म्हणतात की “ माझ्या आजूबाजूच्या वातावरणाने माझं सृजन आणि भाषा निश्चित केली.जे मी जगले तेच मी लिहलं. मी नेहमीच असा प्रयत्न केला की माझी पात्र सदैव माणुसकी आणि निसर्ग याच्या जवळ असतील. वास्तवापासून, सत्यापासून दूर पळणार नाहीत.”
मी जेव्हा त्यांची “ए लडकी “ ही दीर्घकथा वाचली. तेव्हा मला ती खूप आवडली. कारण या कथेत सारं काही होतं. या कथेत काव्य, नाटक, आयुष्यातील सगळे रंग, गंध, एखाद्या माळेसारखे एकत्र गुंफले आहेत. ही कथा मरणाच्या भीतीबद्दल बोलत नाही तर त्याच्याशी दोन हात करण्या विषयी, त्याच्याशी लढण्याविषयी बोलते.यातील स्त्री सांगते की , “जगणं आणि आयुष्य म्हणते प्रतारणा नव्हे तर उलट या दुनियेतून निघून जाणे म्हणजे फसवणूक आहे . हे जग खूप सुंदर आहे. वारा, ऊन, ढग .पाऊस, अंधार,प्रकाश,सारंच सुदंर आहे. इथले सारेच खेळ विलक्षण आहेत. या कथेतील स्त्री जीवनातील आठवणींचा आनंद, सुख अतिशय असोशीने भोगते. या कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ही कथा संवादातून सांगितली आहे,आईमुलीचा संवाद यात आहे.आई मुलीला आठवणीतील अनेक गोष्टी सांगते. पण तिला आपल्या एकट्या मुलीची काळजी आहे.म्हणून ती मुलीला विचारते,” तुझ्या एकटीच्या जगण्यात तू काय सिद्ध करणार? एकमेकांबरोबर राहतांना, जगतांना काहीतरी शिल्लक राहातं, काही वाहून जातं, एकटं असल्यावर काहीच शिल्लक राहत नाही की वाहुनही जात नाही.गरज पडली तर कोणाला हाक मारशील ?” आपल्याला आणि आपल्या आयांनाही हा प्रश्न पडतोच नाही का ?
पण यातली मुलगी म्हणते, “ मो कोणाला हाक मारणार नाही. जो मला हाक मारेन त्याला उत्तर देईन.” या एका छोट्याशा गोष्टीभोवती गोष्ट लिहलेली आहे.या कथेत खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सापडतात.जसे की स्त्री-पुरुष सबंध,नाती, स्त्रीचे स्थान, तिचे हक्क, स्वातंत्र्य, बंधनं,या सर्व मुद्दांवर इथे चर्चा आहे.तीही एका जिवंत भाषेत केलेली आहे असे जाणवते.
त्यांच्या सगळ्याच लेखनाबद्दल लिहू तेवढे थोडे आहे. त्या म्हणजे फक्त एक नाव नाही तर एक ओळख आहे.त्यांनी मागील पन्नास वर्षात अनेक कथा कादंबऱ्या लिहल्या.त्यांचे एक म्हणणे मला फार आवडते, त्या म्हणतात की, धर्मग्रंथ आणि साहित्यिक कृती यात अंतर आहे . ते दोन्ही एकत्र जोडून विचार करू नये कारण साहित्य आणि कलेचे आपले नियम आणि शिस्त असते.”
त्यांना वयाच्या ९२व्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांचे साहित्य वाचून आपण समृद्ध तर होतोच. पण एखादे मूल्य जपतांना कितीही संकटे आली तरी मागे हटायचे नाही हेही आपण त्यांच्याकडून शिकतो.
Image may contain: 1 person, glasses and close-up
Sanjay Kawale, Drpriti Mangesh Kulkarni and 34 others
20 comments
Like
Comment
Share

  शेतीविषयी प्रश्नांचे सत्य समजून सांगणारे पुस्तक

शेतकरी दिल्लीला,मुंबईला मोर्च्यासाठी निघाल्यावर,त्यांनी दूध,कांदे,टमाटे रस्त्यावर फेकले की त्याची बातमी होते,मग त्यावर महाचर्चा होते.तेव्हाच कुठे जनतेच्या ध्यानी शेतकऱ्यांचे प्रश्न येतात. तोपर्यंत ते आपापल्या घरी महाजेवणे घेत असतात,देत असतात.शिवाय रस्त्यावर फेकलेले अन्नधान्य पाहिले की सगळ्यांनाच वाटत राहते की “हे अशी नासाडी करतात म्हणूनच त्यांना पुरेसे पैसे मिळत नाही,शापच हो तो एक प्रकारचा” जेव्हा खायला काहीच राहणार नाही तेव्हा शेतकऱ्यांना मिळालेल्या शापात हेही येतील.हे फक्त बातम्या पाहणाऱ्यांच्या लक्षात येत नाही. तसेच जेव्हा शेतमालाला भाव मिळतो(तो कधी मिळतो हेच मला माहित नाही.)तेव्हा जनता त्याचा भाव करते आणि पाडून किंमत मागते.शिवाय शेतकरी माजले आहेत असे एकमेकांना सांगत सुटते.हे एवढे लिहण्याचे कारण म्हणजे “पोशिंद्याचे आख्यान एक प्रश्नोपनिषद” हे रमेश जाधव यांचे पुस्तक होय. मला स्वतःला शेतकरी,त्याने पिकवलेला माल,आणि त्यासोबत येणारे अनेक प्रश्न हे समजून घेणे फार फार जरुरीचे वाटते.कारण शेतकऱ्यांचा प्रश्न आपल्या सगळ्याच प्रश्नाचे मूळ आहे.हे आपल्याला लक्षात येते.ते हे पुस्तक वाचल्यावर.
‘ शेतीचा प्रश्न हा शेतकरी आणि त्यांचे कुटुंब, कर्जमाफी यापुरता मर्यादित नाही. तो राजकीय असून आपण शहरात असो की खेड्यात, शेतकरी असो की आयटीतले कामगार,प्रत्येकाच्या जीवनाशी तो संलग्न आहे. रमेश जाधव यांनी त्यांच्या “पोशिंद्याचे आख्यान ,एक प्रश्नोपनिषद” या पुस्तकात वरील मुद्दा वाचकांना समजावून सांगितला आहे. त्या त्या प्रसंगानुसार जरी हे लेख लिहलेले असले तरी त्यातून शेती संबधित आपले गैरसमज दूर होण्यास मदत होते.ते या पुस्तकात म्हणतात की, “ बिगर शेतकरी समाजाचा शेती प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन आणि आत्मघातकी आहे. तर राजकीय व्यवस्था या प्रश्नाला साचेबद्ध प्रतिसाद देत असते.” पोशिंद्याचे आख्यान एक प्रश्नोपनिषद” हे रमेश जाधव यांचे पुस्तक होय.
या पुस्तकात गेल्या पाच वर्षातील शेतीप्रश्नांचे परखड वास्तव मांडण्यात आले आहे.यामध्ये शेतकऱ्यांसाठीच्या दुप्पट उत्पन्न,स्वामिनाथन आयोग,दीडपट हमीभाव,कर्जमाफी,दुष्काळ,दुधाचा प्रश्न,कृषी विकास दर यांसारख्या प्रमुख मुद्दयावर प्रकर्षाने भर देण्यात आला आहे. या मुद्द्यासंदर्भात निवडणुकीपूर्वीची आश्वासने आणि निवडून आल्यानंतर सरकारची प्रत्यक्ष कृतीतील तफावत तपासून पाहण्यात आली आहे.साधना,ॲग्रोवन,बोलभिडू,राईटअँगल्स येथे प्रकाशित झालेल्या लेखांचा हा संग्रह आहे.
शासनाच्या निर्णयामुळे अनेक क्षेत्रांचे शोषण होवू शकते आज त्यात शेतकरी प्रामुख्याने दिसतो आहे.याची जाणीव शेती उत्पादनावर जगणाऱ्या प्रत्येक समाजघटकाला व्हावी, शेतीच्या गंभीर प्रश्नांचे वास्तव लक्षात यावे. यासाठी लेखक रमेश जाधव यांच्या लेखांचा हा संग्रह आहे. आपण वर्तमानपत्रात ज्या बातम्या वाचतो त्यामागील सत्य सांगण्याचे काम हे पुस्तक करते. त्यामुळे आपण सगळ्यांनीच हे पुस्तक वाचायला हवे. असे मला वाटते.
No photo description available.
Asha Sathe, Akshay Prabhakar Watve and 3 others
1 share
Like
Comment
Share

 गतकाळाची गाज – नीलिमा गुंडी

एखाद्या व्यक्तीच्या जीवनाची कहाणी म्हणजे त्या त्या काळाची,त्या समाजाची कहाणी सुद्धा असते.खूप वेळा काहीजणांकडे सांगण्यासारखे खूप असते आणि ते सांगावे असे आतून वाटल्यामुळे आत्मकथने लिहली जातात. वाचकांनाही ती आवडतात.पण महाराष्ट्रात स्त्रियांनी लिहलेल्या आत्मकथनाचा स्वतंत्र अभ्यास फारसा कोणी केलेला वाचनात आला नव्हता. “गतकाळाची गाज” या पुस्तकात तो अभ्यास ज्याला लेखिकेने तिरपा छेद असे म्हटले आहे. कारण त्यांनी स्त्रीलिखित आत्मकथनाचा विविध दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे.या आत्मकथनाच्या आधारे लेखिकेने सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतराची प्रक्रिया उलगडून दाखवली आहे. साधारणपणे आत्मकथनात त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत घडामोडी येतात,पण लेखिकेने त्या घडामोडीमध्ये सामाजिक-सांस्कृतिक परिवर्तन कसे दिसते याचे चित्रण केले आहे.त्यामुळे आपण त्या आत्मकथनाकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतो.ती कहाणी फक्त त्या व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही,तर त्यावेळच्या समाजाचे कंगोरे सुद्धा दिसू लागतात.कारण आत्मकथनात कुटुंब,समाज,राजकारण,अर्थकारण,शिक्षण,संस्कृती या सगळ्याच गोष्टींचा समावेश असतो.
या पुस्तकात लेखिकेने लिहलेले मनोगत सुद्धा वाचण्यासारखे आहे.त्या म्हणतात, ‘रमाबाई रानडे यांच्या ‘माझ्या आयुष्यातील काही आठवणी ( १९१० )या मराठीतल्या पहिल्या स्त्रीलिखित आत्मकथनाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माझा हा अभ्यास सुरु झाला.’मिळून साऱ्याजणी’ वर्षभर लेखमाला सुरु झाली.सुमारे १५० वर्षाचा महाराष्ट्रातील आधुनिकतेच्या सुरुवातीपासूनचा कालखंडाचा अभ्यास यात केलेला आहे.या अभ्यासामुळे ‘आपण साऱ्याजणींशी जोडलेलो आहोत अशी भावना अनुभवता आली असे लेखिकेचे म्हणणे आहे.
हे पुस्तक लिहतांना लेखिकेने अनेक आत्मकथनांना असलेल्या विचारवंतांच्या,समीक्षकांच्या प्रस्तावना,पत्रे, भाषणे,मुलाखती आदि दस्तऐवजांचा उपयोग केला आहे.त्यामुळे या सगळ्या लेखनाला एक मूल्य प्राप्त झाले आहे.लेखिकेने लेखांचीविषयवार मांडणी केल्यामुळे वाचकाला ते समजून घेणे सोप्पे जाते.स्त्रियांचे शिक्षण ही गोष्ट आज एवढी अवघड वाट नाही. पण एकेकाळी सावित्रीबाई फुल्यांना त्यासाठी संघर्ष करावा लागला होता.शिवीगाळ ऐकावी लागली होती. काशीबाई कानिटकरांना काही काळ त्यांचे पती शिकवत.पण कसे?तर चिडचिड करीत, त्यांना ‘दगड’संबोधित. यातून स्त्री-पुरुष नात्याची गुंतागुंत आपल्या लक्षात येते. आगरकरांनी आपल्या पत्नीला बरोबरचे स्थान मिळावे म्हणून प्रयत्न केले. अशा प्रकारे स्त्रीलिखित आत्मचरित्रात सामाजिक संदर्भ आढळतात.
या पुस्तकात ‘नाते स्त्रीचे स्त्रीशी’ असा एक लेख आहे.तो विस्ताराने लिहलेला आहे.यामध्ये अनुताई वाघ, डॉ.शोभना गोखले यांच्या लिखाणाचा संदर्भ आहे. तसनीम पटेल यांच्या ‘भाळआभाळ’ मध्ये आई मुलीकरिता धावून आली असा अनुभव आहे. लेखीका या लेखाच्या शेवटी म्हणते की, ‘स्त्रीचे स्त्रीविषयक संवेदन अधिक बळकट करून कौटुंबिक आणि सामाजिक नातेसंबंदहाचे दृढ असे जाळे विणणे शक्य आणि आवश्यक आहे.
आपण पुस्तक वाचत जातो तेव्हा लक्षात येते की, यात उल्लेख केलेली काही आत्मकथने आपण वाचलेली नाही.त्यानिमित्ताने ती ही माहित होतात.स्त्रीचा राजकीय प्रवास ही आपण लेखिकेबरोबर पाहतो. ‘स्त्रीच्या नव्या वाटा,नवी आव्हाने’हे प्रकरण आपल्याला विचार करायला लावते.लेखिकेने स्त्री आत्मकथनात येणाऱ्या अनेक गोष्टींचा वेध घेतला आहे. जसे की स्त्रीची निवेदनशैली,मौखिक परंपरा,त्यांचे उपजत मानवी सहसंवेदन याचाही उल्लेख लेखिका करते.खरंतर आत्मकथनाकडे कोण कोणत्या दृष्टिकोनातून पाहता येते हे ही आपल्याला हे पुस्तक वाचून समजते. तसेच कोणतेही आत्मकथन केवळ वाचक या नात्याने वाचून पुस्तक बंद करून ठेवावे.हे यातून कळते.कारण त्या आत्मकथनाचा सामाजिक दस्तऐवज म्हणून त्यांचे मॉल आपण समजून घ्यायला हवे.हे लेखिका आपल्या लक्षात आणून देते.
या पुस्तकात “तवा चुल्यावर”या पुस्तकाच्या प्रास्ताविकात समाजशास्त्रज्ञ फ्रान्सिस यासास यांनी लिहलेला महत्वाचा विचार उद्धृत केला आहे,त्यावरून आपल्या लक्षात येते की,अशी आत्मकथने का जरुरी आहेत. ते म्हणतात, “ प्रत्यक्ष जीवन जगत असतांना स्त्रिया अनुभव घेतात,त्यावर चिंतन करतात, त्याला शब्दरूप देतात. या साऱ्याचा उपयोग करून आजच्या पुरुषप्रधान समाजात स्त्रीला लाभलेल्या कनिष्ठ स्थानात फार मोठी सुधारणा करता येईल.या सुधारणेमुळे कल्पनांच्या,ज्ञानाच्या,इतिहासाच्या,प्रत्यक्ष कृतीच्या आणि संशोधनाच्या क्षेत्रातही महत्वाची क्रांती घडवता येईल.”
इथे आपल्याला निरनिराळी आत्मकथने विविध दृष्टिकोनातून जशी समजून घेता येतात,तसेच त्यांची एकत्र यादीही उपलब्ध होते.त्या मूळ लेखनाकडे सुद्धा आपण वळतो. मला आवडले हे पुस्तक.
Image may contain: text that says "गतकाळाची गाज नीलिमा गुंडी"
Chaitali Ranbhor, Alka Jatkar and 14 others

 शुभबुद्धीचे उपासक- रवींद्रनाथ ---आशा साठे

रवींद्रनाथ,विवेकानंद यांच्याबद्दल मराठी मनाला एकप्रकारची ओढ आहे असे मला वाटते. त्यांच्या विषयी आपण माहिती करून घ्यावी,त्यांचे साहित्य वाचावे असे वाटत असते.मला तर त्यांचे घर पाहावे,शांतीनिकेतन मध्ये जावून राहावे असेही वाटते.एकदा गेले तरी समाधान होत नाही म्हणून परत परत तिथे जाऊन त्या काळातल्या खुणा शोधाव्या असेही वाटते. तिथे राहणारी काही मंडळी सांगतात की आता पूर्वी सारखे तिथे काही नाही,पण मनाने तिथे काय होते हे बघता येते असे मला वाटते. आपल्याला भौतिक जगात काय मिळते यापेक्षाही तुमचे अंतरंग काही एका विचाराने उजळून निघते का? तिथे काहीतरी असे मिळते की ते सांगता येत नाही फक्त अनुभवता येते.असे वाटते.आणि रवींद्रनाथ नेहमी असेच म्हणायचे हे “शुभबुद्धीचे उपासक रवींद्रनाथ” हे पुस्तक वाचले की कळते.
लेखिकेला सुद्धा रवींद्रनाथ यांच्याबद्दल एक वेगळी आत्मियता आहे. त्यांचे आनंदाने जगाकडे बघण्याची दृष्टी तिला खूप आवडते म्हणूनच ती तिच्या भोवतीच्या रसिक मंडळीना त्यांच्याबद्दल सांगू लागली. त्याविषयी लिहू लागली.तिला उमगलेले रवींदनाथ हे एक ‘आनंदघन’ आहेत.
लेखिकेने रवींद्रनाथांचे कुटुंब ,त्यांचे बालपण फार सुंदर शब्दात मांडले आहे. जेव्हा रवींद्रनाथांना बाराखडी वाचता यायला लागली आणि ज्यादिवशी त्यांनी वाचन सुरु केले,तेव्हा त्यांनी काय वाचले होते याची लख्ख आठवण त्यांना होती. ते म्हणतात की,’जल पडे,पाता नडे’ ‘पाणी पडते ,पान हलते’ हे वाचतांना होणारा आनंद त्यांना आठवतो.ते म्हणतात,’माझ्या आयुष्यातील हीच आदिकवीची पहिली कविता,’.रवींद्रनाथांनी त्यांच्या बालपणातील आणि युवावस्थेतील आठवणी ‘जीवनस्मृती ‘या पुस्तकात सांगितल्या आहेत. लेखिका म्हणते की साधारणपणे अशा पुस्तकांमध्ये नाराजीचा सूर असतो.पण रवींदनाथांची काळाकडे पाहण्याची धारणाच वेगळी आहे.सतत कुरुबुर करणाऱ्या माणसांनी तर जरूर वाचावे असे लेखन त्यांनी केले आहे. आणि हे सगळे आपण आशा साठे या लेखिकेमुळे सहज वाचू शकतो आणि समजून घेवू शकतो.
शांतीनिकेतन बद्दल वाचतांना,समजून घेतांना आपणही त्याठिकाणी जावून काही शिकायला हवे असे आपल्या प्रत्येकाला वाटते. कारण ती एक फक्त शाळा नव्हती तर गुरुदेवांच्या सर्जनशील विचारांची जिवंत प्रयोगशाळा होती. लेखिकेने गुरुदेवांच्या प्रत्येक पैलूची ओळख करून देतांना आजचे काही संदर्भ फार सहज दिले आहे.जसे की त्या लिहतात, “मुलाला आपल्या संस्कृतीचा वारसा साहित्यांतून,सर्व कलांतून आणि जीवनाच्या सगळ्या उद्योगातून मिळाला पाहिजे;पण त्याच परिणाम संकुचित राष्ट्रवादात होता कामा नये.” हे सगळं वाचतांना मला तर सारखी “आजची “ आठवण येत होती.किती आणि काय काय मी यातून घेवू आणि लक्षात ठेवू असे मला झाले होते.
आजचे आपले विद्यापीठ बघितले की रवींदनाथांचा विचार किती अमुल्य होता हे ही पटते.आपण कसं कमी पडतो आहोत सगळ्याच साठी याची खंत मनात दाटल्याशिवाय राहत नाही.ते म्हणतात,
“विद्यापीठे म्हणजे ज्ञानाचे एकत्रीकरण आणि वितरण एवढ्याच ढोबळ उद्देशाने एक यांत्रिक संघटना म्हणून तयार होऊ नयेत. त्याद्वारे लोकांना बुद्धी,विचारांची देवघेव करता आली पाहिजे. त्यातून मानवी स्वभावाच्या विविध छटा जाणता आल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांनी स्वयंसिद्ध,समर्थ बनले पाहिजे. बुद्धीने विचार करण्याचा आळस करणे म्हणजे एक पाप आहे.
असा आळस तर आपण सर्रास करतो आहोत.हे संपूर्ण पुस्तक वाचत असतांना मला सारखं वाटत होते की, हे मी सगळ्यांना सांगायला हवं,मग लक्षात आले की मी जर असे करू लागले तर अख्ख पुस्तकच मला इथे लिहून काढावे लागेल.
आपण मानुषेर धर्म समजून घेवू या आणि अधिक संवेदनशील होऊ या.मनुष्याच्या विशेषत्वाचा आदर करू या, मतभेद व्यक्त करतांना सुद्धा दुसऱ्याचे स्वातंत्र्य मान्य करू या. आणि आपल्यातील आनंदाला जागतं ठेवू या.रवींद्रनाथांनी व्यक्ती आणि समाज यांच्या संपूर्ण विकासाचा आराखडा समोर ठेवणारी प्रार्थना लिहली आहे त्याच्या सर्वच ओळी खूप सुंदर आहेत.मनाने पुनःपुन्हा त्याचा विचार करावा आणि आचारात आणण्यासाठी झटावे.त्यातल्या शेवटच्या दोन मला सारख्या म्हणाव्या वाटतात, त्या म्हणजे
जेथे तुझ्या प्रेरणेने मन विकसित होऊन प्रगतिशील विचार व आचार सदैव समृद्ध होत आहेत;
अशा त्या स्वतंत्र्यतेच्या स्वर्गलोकात हे पित्या, माझा देश जागृत होवो!
आशा साठे यांनी लिहलेले हे पुस्तक वाचतांना आपल्याला त्यांचं रवींद्रनाथां वरचे प्रेम आणि त्यांचा अभ्यास याची जाणीव करून देते.त्यामुळेच हे पुस्तक मनाला आनंद देणारे आणि डोक्याला विचार देणारे आहे असे मला वाटते.
No photo description available.
Alka Jatkar, Sujata Babar and 12 others
12 comments
1 share
Like
Comment
Share