Tuesday, November 10, 2020

 #वाचावं जनाचं लिहावं मनाचं 


हमरस्ता नाकारतांना – सरिता आवाड

हमरस्ता नाकारतांना” हे अगदी ताजं पुस्तक आहे. आत्ताच म्हणजे १७ ऑगस्टला हे पुस्तक प्रकाशित झाले.“मिळून साऱ्याजणी” च्या तिसाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून या पुस्तकाचे प्रकाशन नंदिता दास हिच्या हस्ते करण्यात आले. हे पुस्तक प्रकाशित होत असतांना मी तिथे होते म्हणून मला खूप उत्सुकता होती पुस्तकाबद्दल .म्हणून आज ताज्या वाफेचे पुस्तक.पुस्तक प्रकाशनाच्या वेळी त्यावेळी सरिता ताई अगदी कमी शब्दात बोलल्या पण त्यात बऱ्याच गोष्टींचा समावेश होता.त्यांनी हे पुस्तक जेव्हा सही करून दिलं तेव्हा मला खरच खूप आनंद झाला.त्या स्वतः खूप साध्या आहेत आणि सतत दुसऱ्याचा विचार करण्याची त्यांना सवय आहे असे वाटते.कोणी आपल्याकडून दुखावून जाऊ नये असेही त्यांना वाटते.
पुस्तकाचे मुखपृष्ठ खूप बोलके आहे.त्यावरूनच कळते की आतली गोष्ट ही नेहमीच्या वाचनातली नाही.ती वेगळी आहे.आणि खरेच तसेच आहे.कारण हे पुस्तक म्हणजे जरी आत्मचरित्र असले तरी ते नेहमीच्या पद्धतीने पुढे जात नाही. यात सरिता ताईंनी तीन स्त्रियांची कहाणी सांगितली आहे. त्यांची आजी,आईची आई.तिचे लग्न ,घर बांधण्यासाठी तिने केलेला आटापिटा,मुलांचे शिक्षण, तिची त्या त्या काळानुसार झालेली ठाम मते याबद्दल सरिता ताई लिहतात. त्यांच्या आजीला आयुष्यभर वाचनाची गोडी होती. शिक्षणाकडे ओढा होता.म्हणूनच तिने पुण्यातच स्थायिक व्हायचा हट्ट धरला. सरिता ताई आजीचे एक वाक्य आपल्याला या पुस्तकात सांगतात, ती म्हणायची, “ माझ्याकडे पैसे आहेत, पण ते कशासाठी हवेत यावर ते पैसे असणं किंवा नस्त्न्म अवलंबून असतं. टिवल्याबावल्या करायला एक रुपया माझ्याकडे नाही.पण पुस्तकं घेण्यासाठी दहा रुपये मागा, ते आहेत.” आजीचा हा स्वभाव आपल्या आईमध्ये तंतोतंत उतरला असे सरिता आवाड आपल्याला सांगतात कारण त्यांच्या आईने सुद्धा पुस्तके घेतांना कधी अडवले नाही.अशा अनेक गोष्टी सांगतांना त्या आपल्या आईची वाढ कोणत्या परिस्थितीत झाली ते ही सांगतात.
लेखिका तिच्या आई बद्दल म्हणजे सुमती देवस्थळे यांच्याविषयी जेव्हा काही सांगू पाहते तेव्हा आपल्या लक्षात येते की,त्या या स्त्री कडे जी आपल्याला लेखिका म्हणून माहित आहे तिच्याकडे सुरुवातीला एक फक्त आई म्हणून बघत होती.सुमती देवस्थळे यांनी टॉलस्टॉय एक माणूस,पुष्किन,एमिली ब्रॉटे,डोस्टोव्हस्की,निकोलाय गोगोल,एमिल झोला,,मोपांसा,बाल्झक आणि चेकॉव्ह, छाया आणि ज्योती, डॉ.अल्बर्ट श्वाईटझर,सप्तर्षी आणि अरुंधती अशी भरपूर पुस्तके लिहली आणि आपल्यासमोर पाश्चात्य लेखकांना आणून ठेवले.लेखिकेची आई या सगळ्या लिखाणाकडे का वळली हे सांगतांना लेखिका एक दिवस आईला म्हणते की, “आई, तू का लिहिलंस सांगू ?You never wanted to live as a clerk’s wife and you never want to die as clerk’s wife म्हणून लिहलं ना तू?” क्षणभर आईने नाही म्हणावं असं लेखिकेला वाटत होतं,पण आई “हो” म्हणाली. अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून लेखिका आपल्यासमोर तिच्या जवळच्या माणसांची चित्रे उभी करतात. खरतर ही सगळी चित्रे म्हणजे मला साधी घरगुती वाटत नाही. त्यामागे स्त्रियांना हवा असणारा अवकाश त्यांना कशा पद्धतीने मिळवावा लागत होता याचे उदाहरण वाटते.
पुस्तक वाचतांना असं कुठेही जाणवत नाही की,लेखिकेला हमरस्ता नाकारायचाच होता.तिने प्रवासाला सुरुवात केली आणि तिच्या समोर एक वेगळे आयुष्य येवून उभे राहिले.ती कशी प्रेमात पडली,आईचा कसा नकार होता. हे सगळं ती खूप अलिप्तपणे सांगते. ती आपल्याच आयुष्याकडे मागे वळून बघते, एखाद्या कथेसारखे. मागच्या सर्व गोष्टी आठवल्या तर आपल्याला त्रास होईल असा विचार न करता मागच्या गोष्टींकडे नव्याने बघण्याची ती एक संधी आहे असेच जणू तिला सुचवायचे आहे असे वाटते.कारण म्हणूनच ती कुठेही स्वतःचे समर्थन,आत्मस्तुती ,रागराग,अपमान यावर भाष्य करतांना दिसत नाही. तिला कोणाची सहानुभूती नको आहे.ती फक्त झालेल्या गोष्टींकडे बघते आहे. माणसांकडे माणूस म्हणूनच बघते आहे.
चार भिंतीतलं आपलं आयुष्य फक्त व्यक्तिगत नसतं , तर चार भिंतीपलीकडच्या सामाजिक, राजकीय प्रवाहांचा त्यावर परिणाम होत असतोच. हे लेखिकेने जाणलं म्हणूनच तिला स्त्रियांच्या प्रश्नावर काम करणे आवडू लागलं.ती लेखिका युवक क्रांती दलाच्या शिबिरात गेली आणि तिच्या आयुष्यात एक महत्वाचं परिवर्तन झालं असं तिला वाटत. तिथेच ती तिच्या जोडीदाराला प्रथम भेटते. रमेश आवाड अतिशय हुशार,आय.आय.टी.मध्ये शिकणारा, चळवळीत काम करणारा असा मुलगा.त्याच्याशी गाठीभेटी होऊ लागल्या.त्याने एक वेगळे अनुभवविश्व लेखिकेसमोर उभं केल जे तिला सर्वस्वी अपरिचित होतं. या सगळ्या बद्दल खूप आत्मीयतेने लिहले आहे. हे सगळं सांगतांना स्वतःचे दोष सुद्धा लेखिका सांगते.तिचं उत्कठ प्रेम, ते निभावून नेण्यासाठी केलेली धडपड याबद्दल जेव्हा ती सांगते तेव्हा आपल्या लक्षात येते की तिने किती मनापासून हे सगळं स्वीकारलं होतं.तो तिला तिच्या जातीवरून अनेकदा झोडपून काढे.पण शेवटी त्याने त्याला तिच्या विषयी खात्री वाटली.तेव्हा एखादी गार झुळूक आपल्यावरून गेली असे लेखिका म्हणते.
हे पुस्तक पूर्ण वाचून लेखिका चळवळीतून काय शिकलीहे जेव्हा मांडते तेव्हा ते वाचायला खूप चांगले वाटते.पण काही लोक चळवळीतून खरच काही शिकतात का? की ते फक्त बाहेर बोलातात? घरात मात्र पारंपारिक असतात ? हे प्रत्येकाने तपासावे असेच आहे.लेखिका तिचे अनुभव प्रामाणिकपणे मांडते.
आता वयाच्या ६४ वर्षीही ती नवीन स्वप्ने पाहते.म्हणूनच ती “फिरून नवी जन्मेन मी “ असे म्हणू शकते.अजूनही तिला खूप चांगलं करण्याची तळमळ आहे.या वळणावर ती नवीन आयुष्याला सुरुवात करते आहे. ते सुद्धा ती आपल्याला मोकळेपणे सांगते.
लेखिकेचे आयुष्य हे नेहमीच्या चौकटीतले नाही.त्यामुळे तिने कसा आणि काय त्रास सहन केला असेल हे आपल्याला सहजासहजी कळणे अवघड आहे.तरीही ती आपल्याला तिच्या आयुष्यातल्या आनंदाच्या गोष्टीही सांगते.ते कशा हे वाचण्यासाठी पुस्तक वाचायलाच हवं.खरंतर चळवळीतून एकमेकांशी ओळखी होऊन लग्न झालेल्या मंडळीनी स्वतः लिहायला हवं असं हे पुस्तक आहे. कारण ही मंडळी सुद्धा वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जात असतात.त्यांनी काही सांगितलं तर अजून इतरांची समजूत वाढेल असे वाटते.
No photo description available.
Sanjay Kawale, Drpriti Mangesh Kulkarni and 18 others
16 comments
1 share
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment