Tuesday, November 10, 2020

   #वारी 


किती दिवस आपण चालत आहोत, आज किती तारीख आहे याचा काहीच पत्ता मला नव्हता. याशिवाय दुसरे जग कुठे असेल का ? हाही विचार माझ्या मनात येत नव्हता. इथे सारखं काहीतरी घडत होतं.माझ्या डोळ्यांचे भिरभिरे झाले होते. इकडे पाहू की तिकडे असे मला होत असे.कारण सगळंच नवीन होतं माझ्यासाठी.माझ्या बरोबर चालणाऱ्या माउलीच्या पायात जाड असे चांदीचे तोडे होते.तिला चालतांना ते टोचत असावे , कारण ते गोल नव्हते, दन्डगोल होते. त्यामुळे तिला जखमाही झाल्या होत्या. मग तिने त्याला फडके बांधले आणि चालू लागली. मुखात ज्ञानोबा माउली तुकाराम चा जप होता.मस्त हसत होती. मला कळले नाही ती का हस्ते आहे. तर तिच्या मैत्रिणीने सांगितले की ती गाण्यांची चाल या जपाला लावते आहे. मलाही मजा वाटली.कोणत्याही साधना शिवाय गंमत करण्यात आणि ती घेण्यात या माउली कशा वाकबगार आहेत.हे ही मला कळले.

आम्ही सगळेजण माउलीचे गोल रिंगण जिथे होणार आहे तिकडे चाललो होतो. सदाशिवनगर येथे ते होते. तिथे गेलो तर गाव पूर्ण सजले होते. पताका सगळीकडे लागल्या होत्या.ठिकठिकाणी उंचावर माध्यमांची माणसे आपले कॅमेरे घेवून बसले होते.वारकरी मात्र गोल रिंगण करून जमिनीवर मस्त बसले होते. आम्हीही जागा धरून बसलो.कोणालाही पुढे उभे राहू द्यायचे नाही , हे प्रत्येकाने ठरवले होते. गोलाकार करून सगळेजण बसलो होतो. त्या मधल्या गोलात काही लोक ज्यांनी वारीत टाळ विकत घेतले होते, ज्यांचा तंबोरा नवीन होता, ज्यांनी चिपळ्या विकत घेतल्या होत्या अशी माणसे ज्या रिंगणात माउलींचा घोडा येणार तिथे ते त्या वादयाची सेवा देत होते. स्त्री पुरुष आपलं आपलं काम करत होते. एवढ्या गर्दीत मी कशी टाळ वाजवत गोल फिरू याची लाज, भीती स्त्रिया बाळगत नव्हत्या.मला त्यांचे हे धाडस जे इतर ठिकाणी सहज आढळत नाही त्याचे फार कौतुक वाटत होते. इथे सगळेच माउलीची लेकरं होती. त्यामुळे आम्ही सगळेचजण लहान होतो.एकमेकांकडून शिकत होतो.
माझ्या शेजारी श्रीगोंद्याच्या माउली बसल्या होत्या. त्यांच्या तोंडात शेख महमदचा अभंग होता.मला तो पूर्ण आठवत नाही. त्या म्हणत होत्या.
“ शेख महमंद अविंध,
ह्रदयी त्याच्या गोविंद “
अजून बरेच काही त्या म्हणत होत्या. आणि मला परत परत कळत होते की पुस्तकी ज्ञानाशिवाय माझ्याजवळ काही नाही. अजून थोड्या दिवसाने तेही उरणार नाही. या साध्यासुध्या माणसांनी मला सहजता शिकवली. अजून एक गोष्ट मी यांच्याकडून मला नीट समजली.ती म्हणजे आपण नामदेव, ज्ञानेश्वर,चोखामेळा, कबीर, तुकाराम, नरसी मेहता, शेख महमंद, यांच्या सारख्या विशालह्रदयी माणसांचे वंशज आहोत. खरी सांस्कृतिकता यांनी आपल्याला त्यांच्या जीवनातून शिकवली आहे.
या सगळ्या अंभंगांच्या गर्दीत सगळ्यांचे लक्ष माउलींच्या पालखीकडे होते. “आल्या का माउली, आल्या का माउली” असे सगळेजण एकमेकांना विचारत होते. मानाचा नगारखाना आला, तो वाजला.आणि लोकांनी ओळखले माउली थोड्याच वेळात येतील. माउली माउलीचा गजर चालू झाला. प्रत्येकजण भारावलेल्या अवस्थेत होता. मला त्यांचा भारावलेला आवाज ऐकून असे वाटत होते की हे सगळेजण मनाने माउलींची किती वाट पाहत आहे.त्या पालखीत माउली आहेतच.एक चोपदार सगळे रिंगण फिरून गेला. नंतर त्याने माउलींच्या घोड्याच्या कानात काहीतरी सांगितले.आणि माउलींचा घोडा पुढे आला आणि त्याने वेग पकडला. हजारो माणसे रिंगण करून बसली होती. सगळेजण माउली माउली म्हणत होते. जणू त्या घोड्यावर माउली त्यांना दिसत होते. घोड्याने तीन फेऱ्या मारल्या आणि तो थांबला. त्या रिंगणातली माती अनेकांनी आपल्या कपाळी लावली.तो अनुभव त्यांच्यासाठी थरारक होता.मी लोकांच्या या भावना पाहून हेलावून गेले होते. इतके समर्पण ? कसे ?कळत नाही.ज्याची उत्तरे तेही देऊ शकत नाही.
रिंगण संपल्यावर वारकरी त्या मैदानावर विविध खेळ खेळतात.त्यात आपण सुद्धा सहभागी होऊ शकतो. कोण कोणत्या दिंडीचे, कोणाला काय येते हे प्रश्न कोणालाही पडले नाही. कोणतेही गटतट तिथे नव्हते. ठिकठिकाणी असे खेळ सुरु झाले. सगळे पारंपारिक खेळ होते. त्यात थोडी अंग मेहनत होती. मुख्य म्हणजे कोणता ठेका कधी वाजणार आहे याचा सराव नव्हता तरी सगळेजण आपले वाद्य मग ते टाळ असो की चिपळ्या सुरात वाजवत होते.सगळ्या खेळात स्त्री पुरुष होते. समजा फुगडी खेळायची झाली , तर माउली माउली म्हणत एक स्त्री उठे मग तिकडून पुरुष उठे. आधी फक्त माउली माउली म्हणत एक हात धरायचा,मग गोल फिरायचे, मग दुसरा हात आणि हळू हळू फुगडीला वेग यायचा. इकडे बघणारे माउली माउली म्हणत जोर धरायचे.दुसरा खेळ होता टाळ वाजवत वाजवत खाली वाकत वाकत जायचे , मग वर याचे. होडी करायची, बैल जुंपायचे.हे खेळ नेहमी बघितलेले नव्हते मी.वारीमध्ये जितकं स्वतःचे लहानपण मी अनुभवलं तितकं मी कधी अनुभवलं नव्हतं. मनात कोणतीच तक्रार उमटत नव्हती, किंबहुना तेवढा अवसरच नव्हता.
असं भरपूर खेळ खेळत आणि अभंग म्हणत आम्ही पुढच्या मुक्कामाला गेलो. आता पंढरी जवळ आली होती. असं म्हणतात की तोंडल्याबोंडल्याला तुकारामांना पांढरी दिसली आणि ते धावत सुटले.आम्हीही ते धावले म्हणून धावलो.पण मला तर वाटते वारकऱ्यांना खरच पंढरी दिसत असेल.त्यामुळे त्यांच्या पायात अधिक बळ येत असावे. सगळ्यांचे लक्ष आता त्या विठूराया कडे होते पण मुखात त्याच्या भक्तांची नावे होती.
तुका म्हणे धावा ,पुढे पंढरी विसावा”
असे विसाव्याचे ठिकाणाकडे आम्ही मार्गक्रमण करत होतो. माळशिरस, वेळापूर, भेंडीशेगाव आणि वाखरीचे गोल रिंगण बघून आम्ही पंढरपूरच्या दिशेने चालत होतो.भेंडीशेगावहून अगदी पहाटे चार वाजता आम्ही निघालो.रस्त्यावर अनेकजण आपली सेवा देत चालले होते. बाहेर सतत जाग होती, आतल्या जागेला हाकारे घालत होतो.ती एवढ्या तेवढ्या कष्टाने मिळेल का? हे कोणालाच माहित नसावे.आपण आपला प्रयत्न करायचा.कोणाला किती पळावे लागेल माहित नाही.कारण इथे कोणीच पुढे मागे नाही. कोणी हुशार नाही.आपणच आपला अभ्यास निवडायचा आणि तो पूर्ण करायचा. या सगळ्यांच्या अभ्यासाच्या /साधनेची मी थोडीशी चुणूक अनुभवली. आळंदी ते पंढरपूर जणू एक गाव झाले असे मला वाटत होते.पहाटे निघालेलो आम्ही सकाळी आठ वाजता पंढरपूरला देवळाच्या समोर जावून उभे राहिलो. वारकऱ्याचे बघून आम्हीही आमचे कान पकडले आणि उठ्याबशाकाढल्या. एवढ्या गर्दीत सगळ्यांसमोर उठबशा काढतांना फारच मजा आली. आता आपल्याकडे कोणी बघेल या लाजेची भिंत मी केव्हाच पार केली होती.आजूबाजूला स्वच्छ दिसत होते. “लोक काय म्हणतील” ही भीती गळून पडली. वारी असं बरंच काही माझ्या मनात साठवत होती आणि मी ही साठवून घेत होते कारण माझी झोळी तशीही रिकामीच होती.
ज्या विठ्ठलाच्या मूर्तीला अनेक संताचे हात लागले ज्यांनी त्यांचे मस्तक ज्या पायावर टेकवले त्या पायांना स्पर्श करणे हा एक वेगळा अनुभव आहे. त्यावेळी आपण आजच्या काळात नसतो , या वारकऱ्यांच्या सहवासाने त्यांच्यासारखेच होऊन जातो आणि स्वतः कडे नव्याने बघण्याची खरी आतली वारी सुरु होते. तिथे मात्र जाम दुखापत होईल.असे वाटते.पण आता खरच थांबते.

No comments:

Post a Comment