Saturday, December 20, 2014

आपलं जीवन


    निर्मात्याने स्त्री आणि पुरुषाला हेतुपूर्वक थोडेसे अपूर्ण बनवले असावे ,त्यामुळे ते एकमेकांना स्वीकारतील आणि पूर्ण करतील.असं मला वाटते.आताही विचार करतांना मला असेही वाटते आहे की,अनेक शतकांपासून पती आणि पत्नी अशा परिभाषेत त्यांना अडकवले गेले आहे,ज्यातून खूप संकुचित अर्थ ध्वनित होतो.त्यामुळे नात्याची व्याप्ती कमी होते. समजा आपल्या  शब्दकोशातून पती-पत्नी हे शब्द काढून टाकले  आणि त्या जागी “जीवनभराचे मित्र” हे शब्द टाकले तर ?.आपण आपापल्या भूमिका जशा कधी आईची ,वडिलांची ,तर कधी छोट्या मुलाची ,शिक्षकाची ,सल्लागाराची भूमिका करत असतोच ना.,आणि अर्थात आपण    पती –पत्नी सुद्धा असतोच. .ह्या नात्याची व्याप्ती जर वाढवली  आणि ती वाढविण्यास मोकळीक दिली तर ?
    वैवाहिक नात्याची प्रतिष्ठा ही यातच असेल ,जेव्हा आपण आपल्या  जोडीदाराला केवळ शरीर न मानता एक पूर्ण,स्वतंत्र्य व्यक्ती मानली. एकमेकांची विचार करण्याच्या पद्धतीचे निरीक्षण केले ,वैयक्तिक मुल्यांवर ,दृष्टीकोनांवर ,श्रद्धावर चर्चा केली , आणि एकमेकांच्या भावनाविषयी संवेदनशील झालो ,सुसंगत भावना विकसित केल्या ,आणि एकमेकांबरोबर शांततेने बसून अध्यात्मिक बैठक विकसित केली .व्यक्तीच्या पूर्णतेचा आदर केला  आणि त्या व्यक्तीच्या गौण बाजू,त्याचे शरीर याचा विचार न करता त्या संपूर्ण व्यक्तीला जोडून घेतले तर नक्कीच सकारात्मक सुंदर नातं निर्माण होईल.
   हे सगळे जे दहा वर्षात करायचे आहे ते सगळे एका वर्षात करण्याचा प्रयत्न करून चालणार नाही ,तसेच जे एका वर्षात करायचे आहे ते एका महिन्यात करण्याचा प्रयत्न करून चालणार नाही .खुपजण  या गोष्टी सुरुवातीला काही महिन्यात करतात आणि नंतरच्या जीवनात ह्या गोष्टी सोडून दिल्या जातात.ते मेलेल्या नात्या बरोबर रहातात.जर रोपटे लहान असतानाच मेले तर झाडाचे काय होईल.म्हणून या गोष्टी हळूहळू करायला हव्या  आणि अधिक काळ टिकतील.
     जीवनात आणि चांगल्या नात्यात भूतकाळ हा अप्रासंगिक असतो.वर्तमान हा इमारत उभी करतो. भविष्य काळ हा खूप महत्वाचा असतो,ज्यात तुम्ही दोघं प्रवास करणार आहात.दैनदिन क्षुल्लक गोष्टीवर चर्चा केली तर तुम्ही प्रेमात पडाल. भविष्यावर बोला,स्वप्नांवर बोला,महत्वकांक्षे वर बोला. एकेमेकांच्या वाढीत वस्तुनिष्ठ पणे आणि आतून सहभागी व्हा.हा प्रेम वाढण्याचा मार्ग आहे.
   वैश्विक संकल्पना अशी आहे की लग्नानंतर दोन जीव एकमेकात मिसळून जातात आणि त्यांचा एक जीव होतो.याचा परिणाम असा असतो की स्त्री ला लग्नाच्या नांवाखाली  नेहमी पुरुषाची सावली बनून रहावे लागते. त्यांना त्याग करावा  लागतो  मग त्या व्यक्ती  निराश होतात ,स्वतः वर द्या करतात.  अशी  स्थिती  ही “तुझे”जीवन आणि “माझे”जीवन असे वेगवेगळे असते तेव्हा अधिक होतांना दिसते.” अर्थात काही ठिकाणी नात्यात तशी सकारात्मकता येणं काही कारणांमुळे फार अवघड होवून बसते.पण   “आपले जीवन” हे त्या अवकाशाला छेद्णारी गोष्ट आहे ज्याला लग्न म्हणतात. वैवाहिक जीवनातला आनंद हा दोघे “आपल्या” अवकाशाशी कसे संबधित आहेत आणि तो अवकाश जाणाऱ्या वर्षाबरोबर कसा वृद्धींगत  होतो यावर अवलंबून असतो.नाहीतर तो त्याचे जीवन जगेल आणि ती त्याचे जीवन जगेल.वस्तुस्थिती अशी असेल की ती तिच्या उत्तम “आपल्या” अवकाशात असेल जेव्हा तो ही त्याच्या  स्वतःच्या अवकाशात जाईल. यातून हा विश्वास मिळेल की तुम्ही एकमेकांच्या अवकाशाचा आदर करतात. तसेच एकमेकांच्या आवडी-निवडी,प्राथमिकता यांचा तुम्ही आदर करतात ,सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रेमाच्या नावाखाली तुमची घुसमट होणार नाही.
   विवाहाचा खरा अर्थ असा होतो की ज्या जीवनात तुम्ही दोघं गुंतले आहात त्याची गुणवत्ता वाढवणे होय.विवाह जीवनभर सातत्याने राहू शकेल,आणि दोघां साठी चांगल्या शक्यता निर्माण करेल.

  चांगला विवाहाचे नीट संगोपन करावे लागते, तो विकसित करावा लागतो.वैवाहिक नातेसंबंध हे सुंदररीतीने गुंफणे ही एक कला आहे,म्हणून आपण  कलाकार होवू या.