Friday, March 27, 2015

“आला वसंत आला “




“अग आज आता  पहाटे मी मिस्टर कोकीळ यांचा आवाज ऐकला “पहाटेच चार वाजता फोनवरच हा आवाज ऐकून माझ्या लक्षात आले की ,कालच मी दिलेल्या माहितीचा कोण कसा वापर करेल हे मला सांगता येणार नाही. वसंतातील कविता वाचनासाठी आम्ही जमलो होतो.मी सहज सांगतिले की खूप कवींनी कोकिळा  वसंतात गाते असे वर्णन केले आहे पण खरं म्हणजे कोकीळ गात असतो. कोकिळेचा आवाज हा अत्यंत कर्कश असतो.तिला गाता येत नाही. काहीजणांसाठी ही माहिती नवीन होती. त्यांनीच मला मिस्टर कोकीळ गात आहे हे आनंदाने सांगितले . त्याच वेळी माझ्या डोळ्यासमोर सुटाबुटातला आणि त्याला अनुरूप असा टाय घातलेला कोकीळ आला. तो बाजूच्या शांततेचा अदमास घेत ,कोणाची झोपमोड होणार नाही ना असा नवीन जगाचा कानोसा घेत गात आहे. भरीला त्याने काळ्या फ्रेमचा चष्मा घातला आहे हे ही दिसले.
   तर मि.कोकीळ यांचा आवाज जेव्हा मी ऐकला तेव्हाच  माझ्या मनाने  मान्य केले की ,आला वसंत आला.” एवढ्या शांततेत तुझा मधुर  आवाज वसंताची चाहूल देतो तेव्हा आपल्यालाच नवीन पालवी फुटत आहे असा भास व्हायला लागतो.खरंतर बागेतला आंबा कधीच मोहरला होता पण तुझ्या सादे शिवाय त्या मोहराच्या सुवासाला सुद्धा मी नकार देत होते.तुझी ती गोड साद ऐकून आंब्याला  आपण मोहरलो याचे सार्थक झाले असे वाटले असेल. हो तसा सार्थकतेचा श्वास सोडल्याचे मी ऐकले. पहाटेच्या अशा आपणच आपल्या बरोबर असण्याच्या वेळीच श्वास निःश्वासचा हळूवार नाद ऐकू येतो.कधी कधी आपलाही श्वास त्या बरोबर जोडला जातो आणि एका अवर्णनीय मैफिलीला सुरुवात होते. पहाटेच असे सूर जुळल्यावर मग दिवसभराच्या ओरखडे सुद्धा सुरात येतात.

 कोकीळ असा जेव्हा स्वतःच्या गळ्यातून वसंताच्या आगमनाची बातमी चहूकडे देतो आणि स्वतः बरोबर सर्व सृष्टीला नादावतो.तेव्हा आणि तेव्हाच चैतन्याची पालवी सगळीकडे फुटू लागते.वसंतातले दिवस हे चैतन्याचे दिवस आहेत. पानगळ झालेल्या शिशिरा नंतर तो येतो तेव्हा नवे जीवन घेऊन येतो. बागेतला गुलमोहर, बहावा, जकरांडा,आपल्या फुलांच्या रंगाने सृष्टीला नटवतात.आधीच ती सुंदर आहे या रंगांनी तिची शोभा अधिक वाढते.रानात पळसही आपले लालचुटूक अस्तित्व मिरवत असतो.

सृष्टी जशी कोकीळ च्या गाण्याने नादावते तसेच कवी सुद्धा या पक्षाच्या आवाजाने बहरतात. हा पक्षी वसंतातला आनंद घेवून येतो.तो झाडांच्या पालवी बरोबर आपल्याही आशा पल्लवित करतो. हा ऋतू, हे विविध रंग आणि कोकीळचा सूर आपल्या आयुष्याला एक वेगळीच गोडी देतात.आंब्याच्या मोहराचा गंध,मोगऱ्याचा सुगंध आपल्या मनाचा ठाव घेतात. साऱ्या इंद्रियांसकट हा ऋतू अनुभवावा असाच असतो. यावेळी मला कवी ए.पा.रेंदाळकर यांच्या काव्याची आठवण येते. ते म्हणतात,
 फुलास हसवित,तरूस डुलवित   
कुरवाळीत वेलिंना
वायुलहरिवर बसून आला
वसंत ऋतू आज ना?
भालदार नव पिकराजा हा
ललकारित चालला
थरारवी नीज गानरवाने
ह्या दुर्भग सृष्टिला !

  आहे की नाही या वसंतात मजा.  त्याचं नातं सृष्टीशी, सृजनाशी आहे.म्हणूनच तो चैतन्य घेऊन येतो असं मला वाटतं.ते कसं हे आपल्याला मि.कोकीळ सांगतातच ना?

Thursday, March 5, 2015

कैदी


कोण आहे? एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत विनू ओरडला. तरी खिडकीवरची टकटक कमी झाली नाही.**** भलत्यावेळी कोण आलं? आज घरात कोणी नाही तर निवांत झोपू म्हटलं तर.
दार उघड दार .मी मी
ए मी काय ढकंबाहून आलोय का? दार उघड म्हणे.एवढ्या रात्री तू कशाला आलास? तुला काही घरदार आहे की नाही? *******
ए शिव्या देवू नकोस हं. मी पण... तुला माहित नाही मी कोण आहे ते? नाहीतर खिडकीतून बोलला नसता माझ्याशी.
कोण आहे तू? एवढा घाबरला आहे ते ? आता सामान्य माणसाने आपल्याच सावलीला घाबरण्याचे दिवस आले आहेत.

अरे लोक ध्यानीमनी ज्याचा जप करतात,ज्याला पाहण्याची इच्छा व्यक्त करतात तो आहे मी?
कोण? पैसा?****** काय फेकतो यार,पैशाने काय माणसांचा अवतार घेतला की काय?
दुसरं काही सुचत नाही का तुम्हां माणसांना ? मी विठ्ठल ,विठोबा.
तू मला काय वेडा समजतोस? त्या माणसाला स्वतःच्या कंबरेवरचे हात अठ्ठावीस युगापासून काढता येत नाही. तो एवढा लांब पळून आला? हास्यास्पद वाटतयं.
का? मी येवू शकत नाही?
माहित नाही. कारण आपलं काही तुझ्याशी कनेक्शन नाही.
म्हणजे तुझा विश्वास नाही?
तो वेगळा मुद्दा आहे बाबा,ते जावू दे तू का आलास ते सांग. मुख्य म्हणजे तू आला तसा निघून जा. माझी बायको फार कजाग आहे हं,ती तुझ्यासमोर माईक धरेल आणि तुला लगेच विचारेल ,विठोबाजी तुम्हांला गाभाऱ्या बाहेर कसं वाटतयं? तुमचे आणि रुक्मिणीचे संबंध बिघडले की काय? जा बाबा तू.मी तिच्या पत्रकारितेला पार वैतागलो आहे आणि खरं आणि जाहीरपणे न लाजता सांगायचे तर ती मला आवडते आणि मी तिला घाबरतो.कळलं? .तर तू जा.
अरे आधी दार तर उघड. मग बायकोचे कौतिक सांग.
वेडा आहेस का? माझ्या खिडकीपर्यंत आला त्याचे दोनशे रुपये दे आधी.दारात यायचे असेल तर अजून शंभर आणि दारातून घरात येवून बसायचे असेल तर सर्व मिळून पाचशे.
अरे तिथे या पैशांच्या गप्पांनी जीव घुसमटला म्हणून आलो तर इथेही तेच.
अरे विठोबा ही सर्व तुझी लेकरे आहेत.सगळीकडेसारखेच.
पण मला हे सहन होत नाही .
अरे पण सांगता येतं ना? सांग ना मग. जरा आळस झटक,ते कंबरवरचे हात काढ आणि ते पाडून तुझ्या आजूबाजूच्या चौकटी.
बोलणं फार सोप्पं आहे.
हो ना? तू स्वतःला देव समजतोस ना? मग तुला काय अशक्य आहे.अर्थात तुझं वागण तसं दगडासारखच आहे म्हणा.
ए तू काय बोलतो ते तुला समजतयं का?
हो चांगलच... तू एक कर. तुझ्यासाठी कोणी पैसे घेतलेले दिसले की गालात मार. अदृश्य होवून कर बर हे. नाहीतर ते बडवे तुला सोडायचे नाहीत.भक्तमंडळीबाहेर गेली की तू त्यांच्याच ताब्यात असतो.अभिषेक चाललाय असं सांगून तुझे हाल करायला ते कमी करणार नाहीत. मला तर कल्पना करूनच फार गंमत वाटतेय.
पुरे.दुसरंकाही तरी सांग.
मग संपूर्ण देवळालाच हादरा दे आणि तू अंगावरचे दागिने वगैरे काढून फेकून दे आणि वाळवंटात जावून बस. आता माझ्या लक्षात आलं म्हणून सांगतो ते दागिने नदीत फेकले तरी परत मिळण्याची आशा करू नको. ते परत पाण्यावर तरंगतील वगैरे .इथं लोकांना खायला प्यायला मिळत नाही आणि दागिने घालून मिरवतो. असा कसा रे तू? गरिबांचा देव म्हणे.
टीका नको.पुढे सांग.
वाळवंटात जावून बसला की आपोआप मोठा हो.एवढा मोठा की तुझ्या भोवती भिंती उभारू शकणार नाही. लोकांना लांबूनच तुझे दर्शन होईल म्हणजे तुझ्याभोवती ची ब्युरोक्रसी आपोआप नष्ट होईल.बघ पटतय का?
हं.विचार करायला हरकत नाही. पण मी बसू का?
बस की. पण काय ओशट वास येतोय रे? शी दूधट,आंबटवास येतोय तुझ्या अंगाला.
ए तुझ्या घरात आलो म्हणून वाटेल ते काय बोलतोय.
नाहीतर काय,रोज रोज दुधा-तुपाने आंघोळ करतो,त्यावर साबण नाहीतर शिकेकाई लावत जा. म्हणजे जरा चांगला वास येईल. नाही तर मुंग्या लागतील .बघ तुझ्या आजूबाजूला केवढ्या माशा आहेत.सगळीकडे घाण नुसती.
त्याला मी काय करणार?
तू कशाला काय करतोस? तुझे ते कंबरेवरचे हात काढले तरी पुरे.
अरे मी माझं दुःख तुला सांगायला आलो तर तूच मला ऐकवतो.अरे २८ युगं कोण कैदेत राहिलाआहे का? सांग.सगळेजण माझ्या पायावर डोकं टेकवून सारखं काहीतरी मागत असतात.मीच स्वतः एवढा घुसमटतोय ,मला आधी बाहेर काढा,मग बघू एकेकाकडे.पण कोण ऐकतोय*********च्यायला मला दागिने काय घालतात,टोचणारे कपडे काय घालतात? अत्तराची फवारणी काय करतात?नुस्ता वैताग ****.आजकाल तर वैताग जास्तच वाढलाय. आता पाउस आला नाही,शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या,दहशतवादी हल्ले झाले तर लोक मलाच येवून साकडे घालतात.अरे मीच सा कड्यातअडकलेला मी काय कोणाला सोडणार?अरे तुमची आंघोळीची जागा मोठी असेल बघ. माझ्याभोवती माणूस धड उभा सुद्धा राहू शकत नाही. बाहेरून हे एवढं मोठं मंदिर दिसत ना? ते म्हणजे मोठं घर आणि पोकळ वासा.तू येवून बघ किती एकामागोमाग काचा लावल्या आहेत त्या. माणसं माझ्यापर्यंत सरळ येवूच शकत नाही.पार वाकड्या वाटेने.जणू ते तुमचं भुलभुलैय्याच.******माझा घाम माझ्याशरीरातून येतो म्हणून नाहीतर तो येण्यासाठी सुद्धा पैसे घेतले असते. अरे लोक माझ्या पायाला हात लावणार ,मी गपगार उभा राहणार आणि पैसे मात्र बडव्यांचे? हा काय न्याय झाला? वरून म्हणतात त्याचा उपयोग मंदिर सुधारण्यासाठी करणार.सुधारणा म्हणजे काय तर मी अधिक जखडला जाणे होय.
अरे हे सगळं तुझ्यासुरक्षेसाठीच आहे.
सुरक्षा? आणि माझी?कोणापासून? दोन-दोन दिवसमाझ्या पायावर केवळ डोकं टेकवाव म्हणून रांगेत ताटकळणांरयापासून ? अरे माझ्या पुढे असा विचित्र चौथरा बांधलाय की कमी उंचीच्या माणसाला थोडीशी उडी मारून पायावर डोकं ठेवण्यासाठी लटकाव लागतं. त्यात माझ्या शेजारी बसलेला आणि तो पोलिस पटकन त्याचंडोकं बाजूला करून सरकवतो.हजारो मैल चालत येवून त्यांना मला नीट पाहता सुद्धा येत नाही.
पण अलिकडे तुझ्याकडे येणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. तुही तुझं शक्तिप्रदर्शन करू शकतो राजकारण्यासारखं .
तू मला चिडवतोय का? म्हणे भक्तमंडळी वाढली? अरे नवीन लग्न झालेली जोडपी म्हणे हिलस्टेशनला हनीमूनला जायचं सोडून वारीत येतात.माठ साले.आजकल वारीला जाणं ही फशन झालीआहे.नेते,पुढारी,परदेशी आणि इतर सगळे.त्यामुळे माझ्या वारकऱ्याना जास्त त्रास होतो.
तरी बरं मी येत नाही त्या घाणीत.
ए तू मनाला येईल ते बोलतोस. तोंड संभाळून बोल जरा.
ए तू माझ्या घरात बसलाय.इथेच कैद करून ठेवेन.मग कशी सगळ्यांचीच फा फा होईल ते
ठेवतर खरं.बघशीलच तू राज्यात कसा गोंधळ होईल ते. सत्तापालट होईल.
तो काय तुझ्यामुळे? अरे तू गाभाऱ्यात नाही म्हटलं तर  कोण फिरकणार त्या पंढरीत? पैसा मिळणार नाही,अनुदान मिळणार नाही.तुझा तिथं साक्षात्कार होतो म्हणून नाही जमत ही मंडळी.तू काय साक्षात्कार दाखवणार म्हणा.चल खाली सोड ते कंबरेवरचे हात.
अरे माझे कंबरे वरचे हात म्हणजे अध्यामिकदृष्ट्या पाहिलं तर भवसागर
सॉरी ,माझ्या घरात हे असं चालत नाही.तू शांत रहा,तुझ्या जीवनाचे गुढ इतर बाबा लोक सांगतात तेही गुढ पद्धतीने,होवू दे त्यांचा धंदा.तू नको पाय देवू त्यांच्या पोटावर.
तुलाएक दिवस चांगली अद्दल घडेल मग कळेल.
चल कळूच दे.आधी ते हात खाली कर आणि तुझी घुसमट कमी झाली असेल तर निघ.
अरे चहापाणी तर विचार. बाकी सोयी कुठे आहेत ते सांग.कळला ना करंगळीचा अर्थ की..
तुझ्या पंढरीत आहेत का या सोयी? एवढाले  कोटी रुपये मिळतात तुझ्या नावाने पण धड शौचालये नाहीत,हॉटेल नाहीत.जिकडे तिकडे घाण फक्त घाण. जावू दे ते. तू निघ आता. मला शांतपणे झोपू दे,पुढच्या जन्मी मी तुझं देवूळ बांधीन आणि मस्त आरामात जगीन.प्रॉमिस ..
पण तुझा विश्वास नाही ना?
तुझ्यावर नाही पण लोकांवर आहे आणि त्यांचा तुझ्यावर.मग पैशाला काय कमी? फक्त तुला तेव्हां माझा कैदी म्हणून राहावं लागेल.चल आजच्या दिवशी माझ्या घरात आल्याच्या बदल्यात पैसे न देता एवढं प्रॉमिस कर .
सॉरी.आता मीच इथून गायब होणार आहे,तुलाच काय परत कोणालाच दिसणार नाही.घुसमटून जगण्यापेक्षादर-दर की ठोकरे खाकर मरना पसंद करूंगा.
विन्याऊठ,पेपरला काय आलंय बघ, ‘बडव्यांच्या कैदेतील विठ्ठल पळालाय.
ए चल तू पण मस्त झोप काढ आणि टीव्ही लावूनको.आपण God must be crazy पाहू.च्यायला विठोबाने खरच करून दाखवलं. यार मानलं तुला.