Friday, March 27, 2015

“आला वसंत आला “




“अग आज आता  पहाटे मी मिस्टर कोकीळ यांचा आवाज ऐकला “पहाटेच चार वाजता फोनवरच हा आवाज ऐकून माझ्या लक्षात आले की ,कालच मी दिलेल्या माहितीचा कोण कसा वापर करेल हे मला सांगता येणार नाही. वसंतातील कविता वाचनासाठी आम्ही जमलो होतो.मी सहज सांगतिले की खूप कवींनी कोकिळा  वसंतात गाते असे वर्णन केले आहे पण खरं म्हणजे कोकीळ गात असतो. कोकिळेचा आवाज हा अत्यंत कर्कश असतो.तिला गाता येत नाही. काहीजणांसाठी ही माहिती नवीन होती. त्यांनीच मला मिस्टर कोकीळ गात आहे हे आनंदाने सांगितले . त्याच वेळी माझ्या डोळ्यासमोर सुटाबुटातला आणि त्याला अनुरूप असा टाय घातलेला कोकीळ आला. तो बाजूच्या शांततेचा अदमास घेत ,कोणाची झोपमोड होणार नाही ना असा नवीन जगाचा कानोसा घेत गात आहे. भरीला त्याने काळ्या फ्रेमचा चष्मा घातला आहे हे ही दिसले.
   तर मि.कोकीळ यांचा आवाज जेव्हा मी ऐकला तेव्हाच  माझ्या मनाने  मान्य केले की ,आला वसंत आला.” एवढ्या शांततेत तुझा मधुर  आवाज वसंताची चाहूल देतो तेव्हा आपल्यालाच नवीन पालवी फुटत आहे असा भास व्हायला लागतो.खरंतर बागेतला आंबा कधीच मोहरला होता पण तुझ्या सादे शिवाय त्या मोहराच्या सुवासाला सुद्धा मी नकार देत होते.तुझी ती गोड साद ऐकून आंब्याला  आपण मोहरलो याचे सार्थक झाले असे वाटले असेल. हो तसा सार्थकतेचा श्वास सोडल्याचे मी ऐकले. पहाटेच्या अशा आपणच आपल्या बरोबर असण्याच्या वेळीच श्वास निःश्वासचा हळूवार नाद ऐकू येतो.कधी कधी आपलाही श्वास त्या बरोबर जोडला जातो आणि एका अवर्णनीय मैफिलीला सुरुवात होते. पहाटेच असे सूर जुळल्यावर मग दिवसभराच्या ओरखडे सुद्धा सुरात येतात.

 कोकीळ असा जेव्हा स्वतःच्या गळ्यातून वसंताच्या आगमनाची बातमी चहूकडे देतो आणि स्वतः बरोबर सर्व सृष्टीला नादावतो.तेव्हा आणि तेव्हाच चैतन्याची पालवी सगळीकडे फुटू लागते.वसंतातले दिवस हे चैतन्याचे दिवस आहेत. पानगळ झालेल्या शिशिरा नंतर तो येतो तेव्हा नवे जीवन घेऊन येतो. बागेतला गुलमोहर, बहावा, जकरांडा,आपल्या फुलांच्या रंगाने सृष्टीला नटवतात.आधीच ती सुंदर आहे या रंगांनी तिची शोभा अधिक वाढते.रानात पळसही आपले लालचुटूक अस्तित्व मिरवत असतो.

सृष्टी जशी कोकीळ च्या गाण्याने नादावते तसेच कवी सुद्धा या पक्षाच्या आवाजाने बहरतात. हा पक्षी वसंतातला आनंद घेवून येतो.तो झाडांच्या पालवी बरोबर आपल्याही आशा पल्लवित करतो. हा ऋतू, हे विविध रंग आणि कोकीळचा सूर आपल्या आयुष्याला एक वेगळीच गोडी देतात.आंब्याच्या मोहराचा गंध,मोगऱ्याचा सुगंध आपल्या मनाचा ठाव घेतात. साऱ्या इंद्रियांसकट हा ऋतू अनुभवावा असाच असतो. यावेळी मला कवी ए.पा.रेंदाळकर यांच्या काव्याची आठवण येते. ते म्हणतात,
 फुलास हसवित,तरूस डुलवित   
कुरवाळीत वेलिंना
वायुलहरिवर बसून आला
वसंत ऋतू आज ना?
भालदार नव पिकराजा हा
ललकारित चालला
थरारवी नीज गानरवाने
ह्या दुर्भग सृष्टिला !

  आहे की नाही या वसंतात मजा.  त्याचं नातं सृष्टीशी, सृजनाशी आहे.म्हणूनच तो चैतन्य घेऊन येतो असं मला वाटतं.ते कसं हे आपल्याला मि.कोकीळ सांगतातच ना?

No comments:

Post a Comment