Wednesday, August 7, 2019

 वारी १

  


     भोवंडून टाकणारी गर्दी कापत मी अनेकांच्या मागे चालले होते.सगळेजण देवळाकडे  निघाले होते. मी ही त्यांच्यामागे गेले. ज्ञानेश्वरांच्या समाधीकडे आम्ही धावत होतो. माउलींचा गजर होत होता. लोक असतील तिथून हात जोडत होते. एकमेकांना  सांभाळत, तर कधी धडपडत आम्ही पुढे सरकत होतो.माझ्यासाठी हे सगळेच नवीन होते. कोणीही ओळखीचे माझ्या बरोबर नव्हते. त्यामुळे माझी अधिकच मजा होती. विचारांचे कोणतेही ओझे बाळगायचे नाही. चूक कि बरोबर मला माहित नाही.पण एवढ्या लोकांना कोणती प्रेरणा  वारी करायला लावते याचे मला कोडे होते आणि ते मला समजून घ्यायचे होते.कोणाचाही सल्ला मी मानला नाही.त्यामुळे माझ्या मित्र मैत्रिणी म्हणायला लागल्या की बाई ग आनंदाचे निधान शोधता शोधता तुझे निधन व्हायचे .कोणाचे तोंड थोडेच धरता येते.पण
टाळी देण्यासाठी मात्र हात धरता येतो.मी ही हसून टाळी दिली आणि माझ्या शोधाला सुरुवात केली.
  पाठीवर एक पिशवी  घेवून मी आळंदीला येवून पोहचले.आळंदी ते पुणे असा पायी प्रवास करून बघायचा.मग पुढचे पुढे बघू.सकाळी लवकर उठून मी इतरांच्या मदतीने तयारीला लागले. इंद्रायणीला पाणी सोडलेले होते ,मस्त पाण्यात आंघोळ केली, तरी शेजारीण म्हणाली, चल पाण्यात लई खेळू नकोस, लवकर निघायला हवं.तिचं ऐकून मी ही शाळकरी पोरी सारखी निघाले.कारण एवढ्या माणसांत अंघोळ करण्याचे तंत्र तिनेच मला शिकवले होते.मला कुठे काय येत होते. अंघोळीच्या वेळी  ती अभंग म्हणत होती, माउलीला आळवत होती. सारखं तोंडात गाणं होतं. तिचा आनंद सगळीकडे भरून राहिलेला होता.कोण कुठून आले याची आम्ही काहीही चौकशी केली नाही. आधी कळसाला नमस्कार करायचा होता. माउलींच्या आजोबांच्या घरी जायचे होते.सगळी रीत तिला माहिती होती.मी फक्त अनुकरण करत होते.
    पालखीच्या सोबतीने आम्ही पुण्याच्या दिशेला निघालो. सगळं शिस्तीत चालू होते. गर्दी होती पण ती आपल्या मस्तीत होती.तिला फक्त माउली दिसत होती.आणि मला या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद.नक्की काय मिळणार मला याचा मला काही तासातच विसर पडला होता.मी तिथे होते फक्त बास. दुसरे काहीही नाही.माझं नाव, गाव,काम काहीही माझ्या बरोबर नव्हते. कोणाला त्याच्याशी घेणेही नव्हते. चला सुरुवात तर छान झाली. पाऊले मार्गी लागली म्हणायची.