Wednesday, January 3, 2018

चेहरा

चेहरा
  तुमच्या चेहऱ्यावरून तुमचे मन वाचता येते. चेहऱ्यावरून लोक भविष्य सांगतात. त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. तिचा चेहराच पडला.असं आपण सारखं येता-जाता चेहऱ्यावरून बोलत असतो आणि स्वतःच्या चेहऱ्यावर हात फिरवत असतो. ज्याला दाढी असते तो दाढी कुरवाळतो, ज्याला  मिशी असते तो मिशी सारखी करतो. ज्याला दोन्ही नसेल तो स्वतःच्या गालावरून हात फिरवतो. स्त्रिया घाम पुसतात, स्वतःच्या गालावरून हात फिरवतात, कानातलं नीट करण्याच्या बहाण्याने गालावरून हात फिरवतात. स्वतःचा चेहरा नीट ठेवण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करत असतो.
     राजकारण्यांविषयी इथे काही बोलायला नको खरं तर. पण मला हे पटलंय की आपल्या संपूर्ण जीवनात राजकारण असतंच.  आज आपण सत्ताकारणाला राजकारण म्हणतो. पण तसं काही नाही. राज्यात, देशात चाललेल्या प्रत्येक घटनेला,प्रसंगाला, त्यामागच्या कारणांना राजकारण म्हणतात. ते सकारात्मक पद्धतीने कसं होईल हे सुद्धा एक प्रकारे राजकारणच असतं . विषयांतर झाले खरे. पण राजकारणी सुद्धा आपला चेहरा लपवतात किंवा त्यांच्या पक्षाचा जो अजेंडा असतो तोच त्यांचा चेहरा असतो.
     असं हे सगळं चेहरापुराण सांगायचं कारण म्हणजे माझं होस्टेल. मी आठवण म्हणून माझ्या होस्टेल मध्ये गेले आणि मला आमच्या गंमतीजंमती आठवल्या. आम्ही सगळ्याजणी नोकरी करणाऱ्या होतो. आमच्या पैकी बऱ्याचजणींना सकाळी दहा वाजता ऑफिस गाठायचं असायचं . त्यामुळे आमची धावपळ व्हायची . त्यात काही अशा मुली होत्या की त्यांना सकाळी सकाळी विशिष्ट मुलीचाच चेहरा पहायचा असायचा. म्हणजे त्यांचा दिवस चांगला जाईल असा त्यांना विश्वास होता. त्यामुळे त्या रूम मधून बाहेर पडतांना टॉवेल घेवून बाहेर पडायच्या.आपल्याला हवा तो चेहरा समोरून येतोय असं दिसलं की त्या त्या चेहऱ्याकडे बघून हसायच्या आणि मगच पुढचं आवरायला घ्यायच्या. काहीजणी तर तो चेहरा ज्या रूम मध्ये राहतो  तिथलं दार ठोठवायच्या .तीच मुलगी दार उघडायला आली तर बरं नाहीतर पंचाईत व्हायची. अशा खूप गंमतीजंमती होस्टेल मध्ये चालायच्या .
     आमच्या बरोबर जरा प्रौढ बाई राहत होत्या. त्यांना संजय दत्त फारच आवडायचा.त्यामुळे त्यांनी संजय दत्तचे मोठं पोस्टर लावून ठेवले होते.त्यामुळे उठल्यावर संजयचा  हसरा चेहरा त्यांना दिसायचा. मग त्या खुश होत असत. त्यांनी त्यांचा प्रश्न असा सविनय सोडवला होता. त्यांना अंघोळीला मात्र वेळ लागत असे. त्यांनी बाथरूम अडवून ठेवू नये व लवकर बाहेर यावे म्हणून आम्ही , ज्यांना घाई आहे अशा तिथेच गप्पा मारत बसायचो.त्यात मुद्दाम संजय दत्तचा उल्लेख करायचो. मग कधी त्याची गाणी लागली आहेत, सिनेमा लागला आहे, अशा चाटा मारत असायचो. आतली कडी उघडण्याचा आवाज यायला लागला की पटकन पळून जायचो. त्या बाई टीव्ही रूम मध्ये जावून बघायच्या की खरच गाणी लागली आहेत की नाही तोपर्यंत आम्ही बाथरूम गाठत असू. आम्ही त्यांची अशी गंमत करत असू पण त्यांनी आमच्यावर खूप माया केली. आम्ही कामावरून जर कधी उशिरा आलो तर त्या आमचे वाळलेले कपडे गोळा करून आण्याच्या, त्यांच्या व्यवस्थित घडी करून ठेवायच्या.आम्ही thank you म्हटलं तर त्या म्हणायच्या, ‘ एक संजय दत्तचा सिनेमा दाखव म्हणजे झालं.’असं म्हणतांना त्या खूप गोड हसायच्या.त्यावेळी त्यांचा चेहरा पाहत रहावा इतका देखणा दिसायचा.अशावेळी मला बोरकरांच्या कवितेची ओळ आठवायची,”  देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे’आम्ही त्यांच्या पेक्षा वीस वीस वर्षाने लहान होतो.त्यांचं दुःख त्या कधी बोलून दाखवत नसत.पण कळत असे त्यांचे एकाकीपण.हे  एकाकीपण त्यांना परिस्थितीमुळे आलं होतं की , त्यांना कोणी बळजबरीने स्वीकारायला लावलं होतं,की त्यांनी आपणहून स्वीकारलं होतं कोण जाने. संजय दत्त मागचा हा त्यांचा चेहरा असा कधी कधी आम्हांला दिसत असे.
    होस्टेल मधील ज्या मुलींना सकाळी सकाळी विशिष्ट चेहराच पाह्याचा असायचा , त्या जर आम्हांला कधी भेटल्या तर आम्ही त्यांना म्हणायचो,
“ मेरे चेहरे पे क्या जादू है”
किंवा
“चेहरा क्या देखते हो ,दिल में उतर कर देखो ना’
    आमच्या अशा टवाळीने त्या अधिकच चिडायच्या.मग आमचा चेहरा कधीच दिसणार नाही याची काळजी त्या घ्यायच्या.

     आज मी पाहिलं तर होस्टेलचा चेहरा-मोहरा पार बदलला आहे. पूर्वी आठ वाजे पर्यंत बाहेर राह्यची परवानगी होती.नर्सेसना त्यांच्या दवाखान्यातून शिफ्ट चे पत्र आणावं लागत असे.पण आता बहुतांशी मुली बीपीओ ट काम करतात.आय टि क्षेत्र विस्तारत आहे.त्यामुळे होस्टेल रात्री सुद्धा जागंच असतं .नवीन येणाऱ्या मुली आता होस्टेलचा मूळ शांत आणि सुरक्षेचा चेहरा बदलतील. तो अधिक वेगाचा आणि आधुनिक होईल.अर्थात असा वरवरचा कितीही बदल झाला ,नवीन रंग रंगोटी झाली, सुरक्षेची विविध साधन आली तरी आपण आतून अधिक मजबूत आणि उदार होत आहोत का? आम्ही सुरक्षेच्या नावाखाली चिखलात स्वतः ला रोवत नाही ना? हे ही पाह्यला हवं. मग आमचा स्वतःचा आणि रक्षकांचा चेहरा लक्षात येईल. असं वाटतं .