Friday, June 19, 2015

बा मना









    आज सगळ्यात जास्त कसली गरज आहे? आजूबाजूला चाललेल्या अनेक घटना आपल्याला सगळ्यांनाच अचंबित करत आहेत. मोठ्या संख्येने लोक हातात शस्त्र धरू लागले आहेत. कोणी कोणाचे जराही बोलणे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नाही. अरे ला कधी एकदा कारे म्हणतो याची घाई झाली आहे. एखादा विचार का पटतो आणि एखादा का पटत नाही याची कारण मीमांसा करायला वेळ नाही.आपल्याला एखादा विचार पटत नाही मग त्या विचाराचे खंडन करण्या ऐवजी तो विचार, मत मांडणाऱ्या व्यक्तीलाच संपवणे सोपे वाटत आहे. असं काय झालं आहे आपल्याला की आपण इतके हायपर होतो आहे. का कोणाचे ऐकून सुद्धा घ्यायला तयार नाही? चर्चा सुद्धा नको आपल्याला? असं म्हणतात की आजचे युग अधिक उदारीकरणाचे आहे, आधुनिक विचाराचे आहे?मग यात दुसऱ्यांच्या विचाराला काहीच जागा नाही का? असे कसे आपण उदार, आधुनिक, मग जुनी माणसे परवडली ना? ते निदान ऐकून तर घेत होते,कोणाचा जीव घेत नव्हते. एखाद्याच्या घरा  समोर जाऊन तमाशा करण्यापेक्षा एकमेकांचे विचार समजावून घ्यायला आपण भेटू शकत नाही का? एकमत होणार नाही पण हे तर मान्य करू आपली मते भिन्न आहेत पण ती आहेत. हे स्विकारूया.काय वाटते. पण यासाठी आपल्याला गरज आहे सुंदर मनाची. खरच आपल्याला फार गरज आहे सुंदर मनाची.
   आपण एखादे ठिकाणी काम करतो आणि ते काम व्यवस्थित व्हावे म्हणून जशा आपल्याला वेगवेगळ्या कार्यशाळेला हजर राहावे लागते. त्यामुळे आपण आपल्या कामात काही बदल करतो,सहकाऱ्याला समजावून घेतो तसे हा समाज वेगवेगळ्या विचारांचा आहे,आणि तो तसा वेगळा विचार करण्याची संधी प्रत्येकाला मिळायला हवी, त्यातच समाजाचा  जिवंतपणा आहे.तो जिवंतपणा टिकवण्यासाठी आणि समाजात चैतन्य राहावे म्हणून आपले मन सुंदर असणे गरजेचे आहे असे मला वाटते. ते सुंदर होण्यासाठी आपण काही गोष्टी मुद्दाम शिकायला हव्यात. ते कसे?
२.कसे मान्य करायचे विचार.
   सुंदर मनासाठी तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात,किवा एखाद्या  व्यक्तीचे विचार,मत,भावना यातील कोणते मुद्दे तुम्हांला  मान्य होत आहे ,याचा शोध घ्यायला हवा. खरंतर हे खूप अवघड काम आहे.
    हे अवघड आहे कारण तुम्हांला सहमत असणारे मुद्दे हे खऱ्या अर्थाने मान्य असायला हवे,त्यात वरवरची/खोटी मान्यता नको. म्हणजे त्या व्यक्ती समोर हो हो म्हणायचे पण मनात मात्र  नकारात्मक विचार करायचा.एखाद्याचे  मत मान्य असणे फार अवघड आहे याचे मुख्य कारण प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकते. तुमचे बालपण, तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती,तुम्ही राहता ती जागा, शहर,गाव, तुमचे शिक्षण. प्रत्येकाची आपल्या विचारामागे काही पार्श्वभूमी असते.काही लोक मतभेद नोंदवतात तर काही लोकांचा सर्व गोष्टी मान्य करण्याचा कल असतो.
     एखाद्या विचाराशी ,एखाद्या मताशी सहमत आणि असहमत असण्याची दोन टोक असतात.
जसे काही म्हणतात...
 तुम्ही एकदम बरोबर आहात...
मला तू म्हणतो ते सर्व मान्य आहे...
मी पूर्णपणे तुझ्याशी सहमत आहे...
एकदम बरोबर..
 मला शंभर टक्के मान्य आहे     
      असे जर तुम्ही सर्वच गोष्टीशी सहमत असाल तर तिथे चर्चेला काहीच वाव नसतो. जागा नसते आणि मतांची देवाणघेवाण करता येत नाही. एकादी व्यक्ती एखादे व्याख्यान देत आहे , ते छान असेलही,पण तुमच्या सहभागाला त्यात काहीच महत्व नसेल तर तुम्ही त्यातून काहीच मिळवू शकणार नाही. तुमच्या प्रतिसादाची वक्त्याला जर गरज वाटली नाही तर त्याचा विचार तुम्ही समजावून घेऊ शकणार नाही.
    अशा वेळी अजून दुसरे टोक दिसते.
हो.पण .....
मला हे पूर्णपणे मान्य नाही....
तू त्या ठिकाणी चुकीचा आहे.....
 हे असे नाही.......
        या ठिकाणी व्यक्ती जे जे काही सांगितले आहे, त्या सर्व गोष्टी अमान्य करतो आहे. अशी व्यक्ती असहमती दर्शवून हा प्रचंड युक्तीवादी  व्यक्ती स्वतःचे श्रेष्ठत्व  प्रस्थापित करू इच्छितो. उच्चशिक्षित माणसं सुद्धा नेहमी अशा प्रकारे वागतात. कारण तसं वागण्याचं त्यांना धैर्य असतं. अशा प्रकारचे मन हे तीव्र संताप आणणारे असते आणि ते सुंदर मनापासून फार दूर असते.
    आपण  या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी असायला हवे. आपण  सगळ्या गोष्टी मान्य करू नये  आणि सगळ्या गोष्टी अमान्यही करू नये.असे मला वाटते .





  योग्य असण्याची गरज-
            या ठिकाणी आपण अहंकाराने बांधले गेलेलो असतो. युक्तिवाद हा दोन अहंकारामधील युद्ध असते. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल सहमती दर्शवतात तेव्हा तुम्हांला वाटते की तुम्ही मुद्दाच्या दुसऱ्या बाजूने विचार करत आहात. म्हणून तुम्ही स्वतःला गमावतात. जेव्हा तुम्ही असहमती दर्शवतात तेव्हा तुम्ही तुमचा अहंकार ठासून सांगतात आणि तुम्ही श्रेष्ठ असल्याचे सुचवतात. शाळेत, समाजात युक्तिवादाला आणि वादविवादावर अधिक जोर दिल्यामुळे अशा प्रकारच्या अमान्यता  अधिक मजबूत होतात,अशाच प्रकारचे वर्तन सरकारात,न्यायालयात आणि प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा दिसते. सरकारात  सुद्धा विरुद्ध पार्टी नेहमी सत्तेत असणाऱ्या पार्टीला विरोध करते.मग परिस्थिती कशीही असो. अनेक लोकांना यात मुर्खपणा दिसतो.
    जर तुम्ही विजयी युक्तिवाद करतात असे सुचवित असाल, तर तुम्ही  युक्तिवादाला जिथून सुरुवात करतात तिथेच शेवटी येतात यात तुम्ही फक्त  तुमची युक्तिवाद करण्याची क्षमता दाखवतात. जर तुम्ही युक्तिवादात हरलात तर तुम्हांला नवीन काहीतरी मुद्दे सापडण्याची शक्यता असते. नेहमी आपलेच बरोबर असणे ही महत्वाची गोष्ट नाही आणि ती निश्चितपणे सुंदर नाही.

      चर्चा  ही प्रामाणिकपणे खरी असावी, त्यात अहंकारातील भांडणापेक्षा विषयाला महत्व द्यायला हवे.