Thursday, December 10, 2015

दुपार


    “दुपार” कसा वाटतो हा शब्द?.असं मी बस मधल्या माझ्या शेजारणीला  विचारलं , तर तिने (स्वतःच्या ) कपाळावर( स्वतःच ) आठ्या आणल्या आणि  माझ्याकडे पाहिले. त्यामुळे मला समजले स्वनिर्मिती (आठ्या )ही अशी एक गोष्ट आहे जी आपल्या आतच असते. तिच्या उस्फुर्त निर्मिती कडे पाहून क्षणभर मला तिचा हेवा सुद्धा वाटला. वाटल की चित्रकलेच्या वर्गात “दुपार” ची चित्रनिर्मिती करण्याच्या विषय न देता हा सोपा विषय दिला असता तर? पण “आठ्यांचे “चित्र काढणे हे कपाळावर आठ्या आणण्यापेक्षा काहीसे अवघडच आहे. पण तरीही तिच्याजवळ दुपार होती आणि तिने मला तिच्या पद्धतीने दाखवली.मी तिला मनापासून धन्यवाद दिले.कारण तिच्यामुळे मी दुपार कोणकोणत्या रुपात पाहू शकते हे मला कळले.
   एरवी “दुपार “ या नैसर्गिक घटनेकडे मी शब्द म्हणून पाहत होते. कधी कधी तिच्यापासून जो त्रास होत असे त्याचे वर्णन मी शब्दात करत असे.पण त्याचे  चित्र माझ्या दृष्टीने  पाहिले नव्हते. म्हणून वहिनीने जेव्हा  चित्रविषय “दुपार” सांगितले तेव्हा माझ्यापुढे आला “टळटळीत “हा शब्द,नंतर कडकडीत,शांत,भकास,दुपारची ही  शाब्दिक विशेषणे आणि वर्णने माझ्या अनुभवांना धरून येत होती.पण ती तेवढीच पुरेशी नव्हती.अर्थात काहीशा प्रयत्नाने ती अप्रतिम अशी जमली असती.पण त्या दुपारच्या अनुभवाचे वर्णन जे मी शब्दाने उभे करू शकत होते ते मी स्वतःच्या हाताने  चित्र काढण्यासाठी  मी पाहिले नव्हते. याची स्पष्ट जाणीव मला झाली.मग हळू हळू हे ही कळले की  त्यांच्यातले रंग मी बघितले नव्हते. त्यांच्या शाब्दिक रंगाचा खेळ माझ्या आसपास होता पण त्यातले आकार आणि रंगाचे खोल स्तर तर मी अनुभवलेच नव्हते.मी दुपार या शब्दाच्या चित्राला घाबरले होते. आपण उगीच यात पडलो असे वाटायला लागले होते कोणाला विचारावे तर ते ही शक्य नव्हते.पण आशा माझा हात कधी सोडत नाही म्हणून लगेचच मनात विचार आला ,आता  पडलोच आहोत  तर जसे जमेल तसे पूर्ण प्रयत्नांशी करून बघू. एका चित्रासाठी मी माझ्या विचारांचा लंबक नाही पासून हो पर्यंत जोरजोरात फिरवत होते. शेवटी तो हातात धरून मी म्हटले स्वतःशीच “मला हे चित्र काढायचे आहे” असं म्हणतांना मला स्पष्ट जाणीव होती की ,’माझ्या बोटात अजून ती जादू नाही”चित्र काढायला मी शिकत आहे.चित्र काढण्याचे जेव्हा ठरवले तेव्हा दुपार माझ्या समोर वेगवेगळे रंग घेवून  येवू लागली.म्हणजे तिला रंग होते पण मी आज तिच्याकडे अधिक सजगतेने बघत होते.
     दुपारी बस पुलाखालून जात होती ,त्यावेळी मला कळलं की यावेळी रस्त्यावर गर्दी नसते आणि पुलाखाली काही माणसं बिनधास्त डुलकी घेत होते.. गाड्यांचे आवाज येत होते ,अंगावर धूर आणि धूळ दोन्ही उडत होते पण ते गाढ निद्रेत होते.आज आत्ता मला या सगळ्याचे एका विशिष्ट चौकटीतले चित्र दिसत होते.कुठून कसे चित्र पाहायचे, ते आपल्याला कोणत्या चौकटीत बसवायचे आहे आणि ती चौकट आपल्याला झेपणार आहे की नाही हे सुहास वहिनी जे क्लास मध्ये सांगत असते ते आताशा जरा कळू लागले होते.पण हे एवढेच पुरेसे नव्हते. त्याच्या पुढचा प्रवास मला घाम आणणार होता.असंच मला वाटत होते.
    दुपारच्या वेळी बसमधून उतरतांना फारशी घाई नसते. आम्ही सावकाशपणे गाडीतून खाली उतरत होतो.रिक्षा निवांतपणे उभ्या होत्या.काही रिक्षावाले आपापल्या रिक्षेत झोपले होते.फळ विक्रेता संध्याकाळची तयारी करत होता.तो फळं वैशिष्ट्यपूर्णरीतीने मांडत होता. त्याची बायको पाण्याची बादली आणून ठेवत होती.तिच्या अंगावर चमचमणारी डोळ्यात भरणारे रंग असणारी साडी होती. तिच्या कपाळावर सिंदूर होता. तो उन्हामुळे काळपट झाला होता आणि ओघळत होता.आजची दुपार मला हे काय दाखवत होती.माझंच मला आश्चर्य वाटत होते.
      रस्त्यावर एका घरा शेजारी असणाऱ्या झाडाच्या आडोशाला मुली सागरगोटे खेळत होत्या.वर उडणाऱ्या सागरगोट्या कडे त्यांचे आशेने बघणे आणि त्याच बरोबर हातात अचूक पकडण्याचे त्यांचे कसब मला मोहवून टाकत होते.मी मनातल्या मनात त्या खेळात भाग घेतला तर सागरगोट्या बरोबर मी ही वेगळ्याच विचारात गुंतले आणि शेवटी त्या  हाता बाहेर पडल्या .या दुपारीने मला अगदीच शहाणे करून सोडायचे ठरवले की काय?कोणाला कधी आणि कसे शहाणपण येईल हे काही आपल्या हातात नसते.ओट्यावर बायका गहू चाळत होत्या.नेहमीचे दळण असणार हे. गप्पा मारत मारत काम चालले होते.थोडे पुढे गेल्यावर केस विंचरणे आणि उवा काढण्याचे काम मन लावून चालले होते. आमच्या कॉलनीत पाण्याची लगबग चालली होती.कोणी हिरामणशी बोलत होते तर कोणी बागेला पाणी घालत होते.कोणी टाक्या भरत होते.अजून रस्त्यावर पाणी आले नव्हते.
   रिक्षाचा भोकाड पसरल्या सारखा आवाज आणि धूर दिसत होता. शाळेतील मुलं घरी आनंदाने आली होती.रिक्षेत भरपूर मोकळी जागा होती.पण मला फक्त रिक्षावाल्याचे पाय दिसत होते.लांबसडक पायाचा तळवा.घोट्यापर्यंत दिसत होते. त्याचा चेहरा मला दिसलाच नाही.अचानक मला अशा लांबसडक अनवाणी पायांची आठवण झाली.पंढरपूरला मी हे पाय पाहिले आहेत, एका दुकानदाराच्या दुकानात त्यांची फ्रेम होती. हो ते हुसेन साहेबांचे पाय होते.हुसेन साहेब पंढरपूरचे आहेत.त्या माणसाचा त्यांच्यावर पार जीव होता.

  अशी ही दुपार मला हुसेन साहेबांचा साक्षात्कार घडवणारी.मला तर मजा आली. हे मी आज म्हणते आहे कारण उद्या माझ्या समोर काय आव्हान आहे हे मला माहित नाही.