Wednesday, October 4, 2017

मौन

मौन
     मौन म्हणजे शांत बसणे , न बोलणे, गप्प राहणे.एवढाच अर्थ मला माहित होता. घरच्या घरी मौन ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते होत नसे.प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया दिली नाही तर जणू माझं अभिव्यक्त स्वातंत्र धोक्यात येईल असेच मला वाटत असे.
   मौन पाळणारी फारशी माणसं मला माहित नव्हती.काही माणसं जेवतांना बोलत नाहीत ,पण ते खाणाखुणा करून जाम त्रास देतात. त्यांच्या बरोबर जेवायला बसल्यावर आपल्याला त्यांच्याकडेच सारखं बघावं लागतं.मौन म्हटल्यावर मला गांधीजींच मौन आठवलं. ते त्या काळात कोणाशीही बोलत नसत. मी वर्धाला त्यांच्या आश्रमात गेले होते तेव्हा तिथे जेवणाच्या खोलीत एक पाटी लावलेली होती.त्यावर लिहलेलं होतं,जेवणा बद्दल काही सांगायचे असेल तर नंतर एक चिठ्ठी लिहून द्यावी. प्रत्यक्ष कोणालाही काही सांगू नये.म्हणजे स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला वाईट वाटणार नाही.म्हणजे शांत बसून समोर आलेलं अन्न शांतपणे  खाणं  आलं .तेव्हापासून मला मौनाचे जास्तच आकर्षण वाटू लागले.आपणही एकदा मौन पाळले पाहिजे असे वाटत होते पण ते कसे साध्य होणार हे माहित नव्हते.
     आपल्याला गांधीजी आणि विनोबा भावे यांचेच मौन माहिती आहे. इतर हजारोंच्या संख्येने असणारे बाबा लोक दुसऱ्याला मौन पाळायला सांगतात. स्वतः मात्र काहीही फेकत असतात. गांधीजी आणि विनोबाजी ही  खऱ्या अर्थाने महान माणसे.मला त्यांच्या सारखे कठोर मौनात  रहाणे कसं जमणार? शिवाय घरातील माझी माणसे? येणारी जाणारी, पत्ता विचारणारी? विक्रेते यांना मी मौनात आहे हे कसं कळणार?पण तरीही मला मौन पाळायचे होते. म्हणून मी विपश्यनेचा मार्ग निवडला. दहा दिवस तिथे रहायचे आणि मौनात रहायचे.
     मी ज्या दिवशी त्या शिबिराला गेले तेव्हा तिथे सांगितले की , मौन म्हणजे बोलणे तर बंदच ,पण त्याच बरोबर खाणाखूणा ,स्मित , डोळ्यांची उघडझाप हे काहीच करायचे नाही. फक्त श्वासावर लक्ष ठेवायचे.तिथे आलेल्या सगळ्याजणी माझ्या सारख्या नवीन होत्या. त्या त्यांच्या मैत्रिणींबरोबर आलेल्या होत्या. मी एकटीच गेले होते. मला त्यांच्या जवळ जावून बोलावेसे वाटायचे.मग मी विचार करायचे की , आता बोलणं गरजेचे आहे का?या सगळ्याजणी मला इथे भेटल्या नसत्या तर मी काही त्यांना शोधून काढले नसते.तर आता शांत रहायचे.बाहेर आणि आत काय चालू आहे हे फक्त बघायचे. पहिल्या दिवशी मला त्रास झाला.शब्द पार ओठापर्यंत येऊन पोहचायचे आणि मग त्यांना कळायचे की , बाहेर येण्याची गरज नाही.
   मग माझ्या लक्षात आले की, काहीवेळेस म्हणजे बहुतांशी वेळा मी उगीचच बोलत असते तेवढे बोलण्याची गरज नाही.बघा मौन होते त्यामुळे माझी निरीक्षण शक्ती वाढली.मला इतर लोक कसे बोलतात हे ही आठवले.लोकांचे चेहरे मी वाचू लागले.
    आपल्या अवतीभवती लोक सतत बोलत असतात. प्रत्येकाची बोलण्याची तऱ्हा वेगळी असते.कोणी इतके घाईत बोलतात   की, शब्दांचे पाय एकमेकांत अडकून ते एकमेकांवर आदळतात.समोरच्याला फक्त एक आवाज येतो बस.तर काहीजण एक शब्द आत्ता तर दुसरा शब्द एक की.मी. अंतर चालून झाल्यावर. मध्ये एक मोठी शांतता.तर काहीलोक माझ्याशी बोलत आहेत की समोरच्या सोफ्याशी मला कळत नाही.मग मी सोफ्यावर जावून बसले तर ते खुर्चीकडे पाहतात. ही माणसे कधीही डोळ्यात डोळे घालून बोलत नाही.काही लोक तर निष्कारण आपण खूप महत्वाचे आणि समाजाचे भले करणारे बोलत आहोत असे तावातावाने कपाळावर आठ्या पाडून बोलतात. काहींना फक्त सूत्र सांगायची सवय असते.आपण बाकी गणित सोडवत बसायचे.
    दहा दिवस मौनात रहाण्याचा मला खूप फायदा झाला.मी लोकांचे बोलणे अधिक लक्षपूर्वक ऐकू लागले.त्यावेळी मला जाणीव झाली की आपण खूप वेळा निरर्थक बोलत असतो.सोलापूरला आमच्या शेजारी होते,ते बोलत असतांना प्रत्येक दोन तीन शब्दा नंतर ,’काय आलं का लक्षात ? असं विचारायचे.माझ्या मुलाचे शिक्षक होते ते नेहमी ‘साधारणतः ‘ असे म्हणायचे.मुलगा लहान होता त्यालाही तशीच सवय लागली होती.काहीजण तर अरे व्वा! असं म्हणून आपल्याला गोंधळून टाकतात.
    मौनाने मला शहाणं करण्याचे व्रतच घेतले.आपल्यातलं क्षुद्रत्व समजण्यास मदत केली.आजूबाजूला शब्दांचे डोंगर उभे करणारी माझ्या सारखी सामान्य माणसे तरहोतीच पण  नेते मंडळी मोठ्या प्रमाणावर होती.खरच ह्या शब्दांचा प्रत्यक्ष कचरा झाला असता तर ?म्हणजे कागद, भाजीपाला,इतर प्लास्टिक,इतर नको असलेल्या वस्तू,ज्या आपण कचरा कुंडीत फेकतो तसा कचरा. जो जागा व्यापतो.अशी जागा शब्दाने व्यापली असती तर  आपल्याला रहायला जागाच राहिली नसती.आपण विनाकारण घरात, बस मध्ये, रस्त्यावर मधोमध गाड्या उभ्या करून,व्यासपीठावर,शब्द फेकत असतो.ते कितीतरी वेळा उपद्रवी,दुबळे आणि निष्क्रिय असतात.पण आपल्याला वाटते की आपल्या हालचालींनी त्यांना जिवंत करू.मग आपण जोरजोरात हालचाली करतो. नाहीतर त्या शब्दांवर जोर देतो आणि बोलत सुटतो.
   आपण ऐतिहासिक वास्तू पाहायला जातो तेव्हा तर बोलण्याचा अगदी कळस करतो. त्या वास्तूचा अनुभव न घेता आपली छाप त्यावर मारायला बघतो.तिथे बोलून गोंधळ माजवतो.खरं तर असं आणि इतकं बोलणाऱ्याला काही शिक्षा करायला हवी.म्हणजे न बोलण्याची वगैरे.
  मौनात असलं की निसर्गातील भाषा कळायला लागते.फुलणाऱ्या फुलात, हिरव्यागार वनराईत भाषेचे सौंदर्य लपल्याची जाणीव होते.ते आपल्या रंगाने,  गंधाने एकमेकांशी बोलतात.वारे  ही आपल्याशी बोलत असते.निसर्गाकडे  शब्द नाहीत पण आपण शांत असलो की आपल्याला कळते त्याला काय म्हणायचे आहे ते.पण तेवढा अवसर आपण स्वतः ला देत नाही आणि इतरांच्या अवकाशवरही आपण गोंधळ घालतो.
सण ,उत्सवाच्या वेळी तर विचारायलाच नको.मोठ मोठ्या आवाजात बोलणे, गाणी वाजवणे.त्याबद्दल कोणी चुकून काही म्हटले तर आमची अस्मिता लगेच दुखावते. काय असते ही अस्मिता? ती फक्त सण , उत्सव आणि त्या समाजातील थोर व्यक्तींच्या जन्म , मृत्यूदिनीच का असते? आपण रस्तावर आलो म्हणजे आपण काहीतरी करतो आहोत हे इतरांना सांगण्यासाठी आपण असे करतो का?आतून आपण सुधारत आहोत का?खरच आपल्याला अस्मिता आहे? एखादा सण, उत्सव,आपण डॉल्बीच्या कर्कश आवाजात जेव्हा साजरा करतो तेव्हा मात्र आपली माणसं काय म्हणत आहे हे ही जसं आपल्याला कळत नाही तसंच आपलं मन नक्की काय बोलत आहे हे ही ऐकू येत नाही.थोडं तरी शांत व्हा आणि दुसरं काय म्हणत आहे हे ऐका तरी .ही माझी विनंती आहे.’आवश्यक असेल तरच बोला.’आपण एकमेकांना समजून घेऊ या.