Tuesday, November 10, 2020

  #वाचावंजनाचंलिहावं मनाचं 

 ( या सदराखाली मी फेसबुकवर लेख लिहले होते.ते पुनः इथे देत आहे.) 


समतानंद’ अनंत हरी गद्रे –भानू काळे

आपण जसं जसं वाचत जातो तसं तसं आपल्या लक्षात येतं की,आपल्याला जगाची फार कमी माहिती आहे. आणि एवढं एकच कारण पुरेसं आहे सतत काही ना काही वाचण्यासाठी. हे नमनालाच घडाभर तेल का? तर मी वाचलेलं हे पुस्तक. आजच्या काळात आपण झुणका-भाकर केंद्र हा शब्द सर्रास वापरतो.पण त्याचे जनक अनंत हरी गद्रे यांच्याबद्दल आपल्याला फारसे काहीच माहित नसते.लेखक भानू काळे यांनी सात प्रकरणामध्ये हे पुस्तक लिहले असून ,त्यांनी सगळ्यात जास्त भर हा गद्रे यांच्या सामाजिक कामावर दिला आहे. गद्रे यांच्या ‘झुणकाभाकर प्रसाद सत्यनारायण महापूजे’च्या अभिनव प्रयोगाबद्दल लेखकाने सविस्तर लिहले आहे.
डॉ.आंबेडकरांनी अस्पृश्यतेविषयी जे विधान केले त्यामुळे श्री.गद्रे –पुस्तकाचे नायक खडबडून जागे झाले आणि त्यांनी अस्पृश्यता निवारणाच्या कामाला वाहून घेतले. हिंदू समाजातील अस्पृश्यता ही अमानवी प्रथा नष्ट झाली पाहिजे असे समतानंदांना मनापासून वाटत होते. म्हणून ते गावोगाव फिरले आणि त्यांनी महार दांपत्याच्या हस्ते महापूजा आयोजित केल्या आणि प्रसाद म्हणू झुणकाभाकर वाटली.एवढेच नाही तर त्या दांपत्याच्या पायाचे तीर्थ सर्वासमोर प्राशन केले. असे ते का करतात ?यावर त्यांचे उत्तर होते की, “ स्वतः जन्माने ब्राम्हण असल्याने माझ्या पोटातील अहंकाराचे पाप मारून टाकण्यासाठी मी हरिजनांच्या पायाचे तीर्थ घेतो.जातीजातीतील भेदभाव नष्ट होवून सर्व समाजात समताभाव नांदो अशी त्या वेळी हरीजवळ शुद्ध मनाने प्रार्थना करतो.या तीर्थप्राशनाबद्दल मी इतकेच सांगतो की, फक्त ब्राम्हणांनीच हरिजनांच्या पायाचे तीर्थ घ्यावयाचे आहे. कारण त्यांनीच पूर्वी सगळ्यांना स्वतःच्या पायचे तीर्थ पाजलेले आहे!”
पुस्तकाचे नायक श्री.गद्रे हे देवरुख येथे राहत असत.लेखकाने देवरुख आणि गद्रे परिवाराची माहिती आपल्याला दिली आहे. तसेच समतानंद यांची पत्रकारिता, संपादन कार्य,नाटिकालेखन, जाहिरातकौशल्य यावर एक प्रकरण लिहले आहे. समतानंद याचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते.त्यांना नाटक-रंगभूमी,चित्रपट उद्योग,पत्रकारिता याविषयी आकर्षण होते. ते उपहासात्मक असे स्तंभलेखन करत.जाहिराती करत,तसेच सभा संमेलनांना जात आणि सडेतोड मत मांडत.त्यांची आचार्य अत्रे,सोहराब मोडी यांसारख्या दिग्गज मंडळींशी मैत्री होती आणि ‘जाहिरात जनार्दन’म्हणून लोक त्यांना ओळखत असत.आपल्याला खूप जणांना माहीत नसेल की ते ‘मौज’ चे साप्ताहिकाचे आद्य संपादक होते. त्यांनी चालक-मालक-संपादक अशा अनेक जबाबदाऱ्या सहजतेने पार पाडल्या. अनेक टक्के टोणपे खात त्यांनी आपले काम चालूच ठेवले. त्यांच्या दोन्ही भावांनी त्यांना सांभाळून घेतले. कारण त्यांची समाजप्रबोधनाची तळमळ त्यांना कळत होती.
हे पुस्तक मुळातून वाचायला हवे असेच आहे.कारण आजूबाजूची परिस्थिती त्यांच्या विरुद्ध होती तरी त्यांनी तारेवरची कसरत करत आपले काम नेटाने पुढे नेले.त्यांनी एक नवीन मार्ग शोधला आणि आपल्या मनाचे ऐकत ते पुढे गेले. आपण जे काम मनापासून करतो ते काम सतत आपल्याला काहीतरी नवीन देत असतं.हे आपण लक्षात घ्यायला हवं. आपण आपल्याच तपासून बघायला हवं नाही का? अजून एक श्री.गद्रे हे आपल्याला माहीत असणाऱ्या व्यक्तीचे आजोबा आहेत.कोण ती व्यक्ती ?पुस्तक वाचा म्हणजे कळेल.
Image may contain: 1 person, text that says "समतेच्या लढ्यातील अनाम शिलेदार समतानंद अनंत हरी गद्रे भानू काळे ভলাসর मायमगाम मकय www.akshardhara.com"
Vandana Khare, Sanjay Kawale and 10 others

No comments:

Post a Comment