Tuesday, November 10, 2020

 गतकाळाची गाज – नीलिमा गुंडी

एखाद्या व्यक्तीच्या जीवनाची कहाणी म्हणजे त्या त्या काळाची,त्या समाजाची कहाणी सुद्धा असते.खूप वेळा काहीजणांकडे सांगण्यासारखे खूप असते आणि ते सांगावे असे आतून वाटल्यामुळे आत्मकथने लिहली जातात. वाचकांनाही ती आवडतात.पण महाराष्ट्रात स्त्रियांनी लिहलेल्या आत्मकथनाचा स्वतंत्र अभ्यास फारसा कोणी केलेला वाचनात आला नव्हता. “गतकाळाची गाज” या पुस्तकात तो अभ्यास ज्याला लेखिकेने तिरपा छेद असे म्हटले आहे. कारण त्यांनी स्त्रीलिखित आत्मकथनाचा विविध दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे.या आत्मकथनाच्या आधारे लेखिकेने सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतराची प्रक्रिया उलगडून दाखवली आहे. साधारणपणे आत्मकथनात त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत घडामोडी येतात,पण लेखिकेने त्या घडामोडीमध्ये सामाजिक-सांस्कृतिक परिवर्तन कसे दिसते याचे चित्रण केले आहे.त्यामुळे आपण त्या आत्मकथनाकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतो.ती कहाणी फक्त त्या व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही,तर त्यावेळच्या समाजाचे कंगोरे सुद्धा दिसू लागतात.कारण आत्मकथनात कुटुंब,समाज,राजकारण,अर्थकारण,शिक्षण,संस्कृती या सगळ्याच गोष्टींचा समावेश असतो.
या पुस्तकात लेखिकेने लिहलेले मनोगत सुद्धा वाचण्यासारखे आहे.त्या म्हणतात, ‘रमाबाई रानडे यांच्या ‘माझ्या आयुष्यातील काही आठवणी ( १९१० )या मराठीतल्या पहिल्या स्त्रीलिखित आत्मकथनाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माझा हा अभ्यास सुरु झाला.’मिळून साऱ्याजणी’ वर्षभर लेखमाला सुरु झाली.सुमारे १५० वर्षाचा महाराष्ट्रातील आधुनिकतेच्या सुरुवातीपासूनचा कालखंडाचा अभ्यास यात केलेला आहे.या अभ्यासामुळे ‘आपण साऱ्याजणींशी जोडलेलो आहोत अशी भावना अनुभवता आली असे लेखिकेचे म्हणणे आहे.
हे पुस्तक लिहतांना लेखिकेने अनेक आत्मकथनांना असलेल्या विचारवंतांच्या,समीक्षकांच्या प्रस्तावना,पत्रे, भाषणे,मुलाखती आदि दस्तऐवजांचा उपयोग केला आहे.त्यामुळे या सगळ्या लेखनाला एक मूल्य प्राप्त झाले आहे.लेखिकेने लेखांचीविषयवार मांडणी केल्यामुळे वाचकाला ते समजून घेणे सोप्पे जाते.स्त्रियांचे शिक्षण ही गोष्ट आज एवढी अवघड वाट नाही. पण एकेकाळी सावित्रीबाई फुल्यांना त्यासाठी संघर्ष करावा लागला होता.शिवीगाळ ऐकावी लागली होती. काशीबाई कानिटकरांना काही काळ त्यांचे पती शिकवत.पण कसे?तर चिडचिड करीत, त्यांना ‘दगड’संबोधित. यातून स्त्री-पुरुष नात्याची गुंतागुंत आपल्या लक्षात येते. आगरकरांनी आपल्या पत्नीला बरोबरचे स्थान मिळावे म्हणून प्रयत्न केले. अशा प्रकारे स्त्रीलिखित आत्मचरित्रात सामाजिक संदर्भ आढळतात.
या पुस्तकात ‘नाते स्त्रीचे स्त्रीशी’ असा एक लेख आहे.तो विस्ताराने लिहलेला आहे.यामध्ये अनुताई वाघ, डॉ.शोभना गोखले यांच्या लिखाणाचा संदर्भ आहे. तसनीम पटेल यांच्या ‘भाळआभाळ’ मध्ये आई मुलीकरिता धावून आली असा अनुभव आहे. लेखीका या लेखाच्या शेवटी म्हणते की, ‘स्त्रीचे स्त्रीविषयक संवेदन अधिक बळकट करून कौटुंबिक आणि सामाजिक नातेसंबंदहाचे दृढ असे जाळे विणणे शक्य आणि आवश्यक आहे.
आपण पुस्तक वाचत जातो तेव्हा लक्षात येते की, यात उल्लेख केलेली काही आत्मकथने आपण वाचलेली नाही.त्यानिमित्ताने ती ही माहित होतात.स्त्रीचा राजकीय प्रवास ही आपण लेखिकेबरोबर पाहतो. ‘स्त्रीच्या नव्या वाटा,नवी आव्हाने’हे प्रकरण आपल्याला विचार करायला लावते.लेखिकेने स्त्री आत्मकथनात येणाऱ्या अनेक गोष्टींचा वेध घेतला आहे. जसे की स्त्रीची निवेदनशैली,मौखिक परंपरा,त्यांचे उपजत मानवी सहसंवेदन याचाही उल्लेख लेखिका करते.खरंतर आत्मकथनाकडे कोण कोणत्या दृष्टिकोनातून पाहता येते हे ही आपल्याला हे पुस्तक वाचून समजते. तसेच कोणतेही आत्मकथन केवळ वाचक या नात्याने वाचून पुस्तक बंद करून ठेवावे.हे यातून कळते.कारण त्या आत्मकथनाचा सामाजिक दस्तऐवज म्हणून त्यांचे मॉल आपण समजून घ्यायला हवे.हे लेखिका आपल्या लक्षात आणून देते.
या पुस्तकात “तवा चुल्यावर”या पुस्तकाच्या प्रास्ताविकात समाजशास्त्रज्ञ फ्रान्सिस यासास यांनी लिहलेला महत्वाचा विचार उद्धृत केला आहे,त्यावरून आपल्या लक्षात येते की,अशी आत्मकथने का जरुरी आहेत. ते म्हणतात, “ प्रत्यक्ष जीवन जगत असतांना स्त्रिया अनुभव घेतात,त्यावर चिंतन करतात, त्याला शब्दरूप देतात. या साऱ्याचा उपयोग करून आजच्या पुरुषप्रधान समाजात स्त्रीला लाभलेल्या कनिष्ठ स्थानात फार मोठी सुधारणा करता येईल.या सुधारणेमुळे कल्पनांच्या,ज्ञानाच्या,इतिहासाच्या,प्रत्यक्ष कृतीच्या आणि संशोधनाच्या क्षेत्रातही महत्वाची क्रांती घडवता येईल.”
इथे आपल्याला निरनिराळी आत्मकथने विविध दृष्टिकोनातून जशी समजून घेता येतात,तसेच त्यांची एकत्र यादीही उपलब्ध होते.त्या मूळ लेखनाकडे सुद्धा आपण वळतो. मला आवडले हे पुस्तक.
Image may contain: text that says "गतकाळाची गाज नीलिमा गुंडी"
Chaitali Ranbhor, Alka Jatkar and 14 others

No comments:

Post a Comment