Tuesday, November 10, 2020

   #वारी 

संध्याकाळी प्रवचन होते. त्यांनी संपूर्ण वारीत या ओवीवर प्रवचन दिले. तुम्ही वारीतून ही ओवी घेवून जाल . ती ओवी पाठ होईल असा त्यांचा विश्वास होता आणि तो खरा ठरला .ज्ञानेश्वरीमधिल १५ व्या अध्यायातील ३०० वी ओवी वर त्यांनी प्रवचन दिले. ते म्हणायचे सेवा रुजू करतो.

” पै आघवेचि आपुलेपणे !नुरेचि जया अभिलाषणे !
जैसे येथूनि पऱ्हा जाणे ! आकाशा नाही.!
सर्वव्यापक आकाशाला जसे अलिकडे किंवा पलिकडे जाणे संभवत नाही, ते सगळीकडे असते. एका गावाला आहे आणि दुसरीकडे नाही असे होत नाही. त्याप्रमाणे सर्व माझे आहे असा सर्वात्मभाव जागृत झाल्यावर अभिलाषा संपते. द्वंद संपते.सांग भावाचा सुकाळ होतो. माउली आकाशाचा दृष्टांत देतात . आकाश सगळीकडे आहे. आकाशाचे गुण काय आहेत तर सर्वाठायी समत्व , गुरुत्व ,असंगत्व ,निर्मलत्व .म्हणजे आकाशा सारखे व्यापक व्हा. एवढं व्यापकत्व आलं की मग भेदाभेद काही रहात नाही. सगळे आपलेच वाटू लागतात. ते आणि आपण असं न रहाता आपण सगळे एक होतो.एक होऊन पांडूरंगा कडे जातो.पायी जातो. कर्मयोगाने माणूस काळवंडतो .कर्मयोगाची कृष्ण छटा आणि ज्ञानयोगाची धवल छटा हे दोन रंग एकत्र येतात तो पांडुरंग.
सर्वांभूती समभाव हा वारकऱ्याचा गुण आहे.मी कोण आहे याचं ज्ञान म्हणजे श्रुती आणि मी कोण आहे याचं भान म्हणजे स्मृती .इथे देखणे महाराजांनी मुक्ता बाईंचा अभंग सांगितला. की ब्रम्ह कसे रोकडे आणि उघडे आहे हे मुक्ताबाई चांगदेवांना सांगते.ती म्हणते.
एकच माती नाना परी भिंती
रांजण आणि सुगडे !!
एकच कापूस नाना परी कपडे
धोतर आणि लुगडे !!
एकच सोने नानापरी लेणे
बाई आणि बुगडे !!
ब्रम्ह दिसे उघडे
मुक्त म्हणे ऐक चांगदेव
खरे आणि रोकडे
ब्रम्ह दिसे उघडे.
प्रवचन झाल्यावर आम्ही हरिपाठ आणि विनवणीचे अभंग म्हटले. कितीतरी लोकांचे हे सगळे पाठ होते. माझा फक्त हरिपाठ पाठ होता. नंतरचे अभंग कुठले हे शोधत असतांना एका माउलीने ते पान काढून दिले. मी thank you म्हणण्याचा आत ती अभंग म्हणण्यात आणि तालावर टाळ वाजविण्यात रमलीही होती. कशाचीच अपेक्षा नव्हती.नंतर जेवणे झाली. दुसऱ्या दिवशीच्या सूचना झाल्या. आमच्या बरोबर खालच्या आणि वरच्या हॉल मध्येही दिंड्या उतरल्या होत्या.सगळीकडे आमच्या सारखीच लगबग चालू होती.
पावसाची भुरभुर सुरु झाली. मी नवीन भेटलेल्या मैत्रिणी सोबत पायऱ्यावर बसले. काहीजणी तर माझ्यापेक्षा वयाने लहान होत्या. शिकलेल्या होत्या. काहींचे शालेय शिक्षण झालेले नव्हते.पण अभंगाची माहिती होती. बसल्या बसल्या सहज कोणत्याही आविर्भावा शिवाय त्या म्हणत होत्या. स्वतःसाठी ! मी ही कोणतेही प्रश्न विचारले नाही.एवढं पाठांतर कसं? हा सतत डोकावणाऱ्या प्रश्नाला टपली मारली आणि गप्प केलं. मिळतील उत्तरं नाहीतर शोधून काढू. कारण या बाईंना घरी खूप काम असणार? त्या काही शहरी जीवन जगत नव्हत्या. त्यांचे शरीर त्याचे कष्ट सांगत होते.मग तरीही एवढे कसं लक्षात रहाते.असं मला वाटत रहाते.
झोपण्यासाठी मी ही इतरांसारखी पथारी टाकली. पटकन झोप लागली.पहाटे म्हणजे खरं तर रात्रीच ३ वाजता काहीजणीची लगबग सुरु झाली. एका माउलीने मला अलगद उठवले. ‘चल उरकून घे’ मी हो म्हटले. पथारी गोळा केली.सामान घेऊन आंघोळीला गेले. बारीक पाउस होताच. सगळ्यांचे म्हणणे होते की मागच्या वर्षीही इथूनच पाउस लागला आणि पूर्ण वारीभर राहिला. मी मनातल्या मनात पावसाला म्हटलं , बाबा थांब घाई करू नको, आधी मला आवरून घेवू डे,मग मला चालू मग तू पड.अगदी माकडाच्या गोष्टी सारखं आहे हे ,पण वारील आलं म्हणून लगेच माझ्यात कुठे बदल व्हायला ? बदलांकडे मी कसे बघणार आहे माहित नाही. पण आहे ते स्वीकारायचे एवढेच मी ठरवले होते. ,सगळं नीट अनुभवू दे असं म्हणत मी आंघोळीला गेले ,आंघोळीला मला बाथरूम मिळाले. व्वा माझी तर मजा झाली. मी एकदम खुश.मग सगळेच पटपट आवरले.चहा घेतला. डब्यात नाष्टा आणि भाजी ,पोळी घेऊन झाले. गुरुजींना नमस्कार केला. त्यांनी कान आणि डोळे उघडे ठेवायला सांगितले. मी ही त्यांचेच ऐकायचे ठरवले.आणि जेजुरी कडे प्रस्थान केले. माउलीहि आमच्या सोबत होत्याच.

No comments:

Post a Comment