Tuesday, November 10, 2020

  #वारी 

हरीपाठाची वेळ झाली.आम्ही आमची बसकरे घेऊन बसलो. टाळ वाजायला लागले.जणू हे वातावरण मी परत परत अनुभवले आहे , कितीतरी वर्षांपासून यांच्या बरोबरच आहे असं मला वाटत होतं. मला मनातल्या मनात आनंद होत होता.हरिपाठ झाल्यावर लांडगे महाराज यांचे प्रवचन झाले. आपण त्यांच्याकडे बघितले तर ते खूप साधे दिसत होते.पण ज्ञानेश्वर, तुकाराम त्यांच्या जिभेवर खेळत होते. तरी ते म्हणाले की ,’ पाहुनिया ग्रंथ ,करावे कीर्तन ‘ म्हणजे अभ्यास केल्याशिवाय कीर्तन करू नये. कारण ती देवाची सेवा आहे. त्यांनी संताचे महत्व सांगितले. संतांनी आलिंगन दिले तर सायुज्य मोक्ष प्राप्त होतो. त्यांनी सांगितले की इच्छा तीन प्रकारच्या असतात. जन्म त्या नुसार होतात. दुसऱ्याच्या इच्छेने येतात ते देव.देवाचे स्वरूप निर्गुण निराकार आहे. त्याला प्राप्त करायचे असेल तर संतांकडे जावे लागेल. संत स्वइच्छेने जन्म घेतात.भगवंताचे महत्व वाढविण्यासाठी त्यांचा जन्म असतो. आपण मात्र अनिच्छेने जन्म घेतो.अनिच्छेत दुःख असते.पण जन्मभराची प्रसन्नता हवी असेल तर संतांना शरण गेलं पाहिजे. नामावर भरवसा असला पाहिजे.म्हणून त्यांनी तुकाराम महाराजांचा अभंग सांगितला. खरं तर त्यावरच त्यांचे प्रवचन होते. “ ऐसा संतांचा महिमा , झाली बोलायची सीमा .............तुका म्हणे देवा , त्यांची केली पावे सेवा.

मला त्यांचे प्रवचन ऐकतांना एकीकडे चांगले वाटत होते , तर दुसरीकडे पटापट एकातून दुसऱ्या अभंगात जावून समजावून सांगायचे ते समजून घेण्यात माझी खूप तारांबळ उडत होती. हा ही एक मेंदूचा व्यायाम झाला.प्रवचन झाल्यावर बरोबर जेवणे झाली.मला वाटतं त्यादिवशी पिठलं भाकरी होती.जेवलो. बाहेर एक चक्कर मारून आलो आणि झोपलो.
दुसऱ्या दिवशी एका माउलीने मी जागे झाल्याचे पाहून मला आंघोळीला नेले.जेजुरीच्या रस्त्यावर एका दवाखानाच्या बाहेर मोठा नळ लावलेला होता. एका बाजूला एक पिंप होते.माउलीने मला आंघोळ कशी न घाबरता आणि लाजता करायची हे प्रात्यक्षिकासह दाखवले आणि तसे करून घेतले. मग माझी आंघोळच आवरेना. चल, बास झालं, सर्दी होईल म्हणून परत मला घेऊन आली. मी माझ्यावरच खूप खूष होते. मी मस्त कपडे बदलून आले.चला आपण कशावर तरी मात करायला शिकलो आहोत.आपण आपल्यावरच मात करणं किती अवघड आहे. हे मला समजून आले.मग पुढच्या मार्गावर मी अजिबातच अडखळले नाही.नंतर आम्ही एकमेकींना चिडवायचो , थांब तुझ्यासाठी शॉवर चालू करते, नीट दार बंद कर, कपडे नीट हंगरला लाव. मजा.बायका तेवढ्या वेळात सुद्धा पटापट उखाणे जुळवायच्या. त्यात त्यांच्या मैत्रिणीची थट्टा तर असायचीच पण नवराही सुटायचा नाही. उखाण्याचा शेवट मात्र पांडूरंगाच्या पायापाशी व्हायचा.त्याने दिलेले माहेरपण मिरवत माउली हसत असायच्या.

No comments:

Post a Comment