Tuesday, November 10, 2020

 शुभबुद्धीचे उपासक- रवींद्रनाथ ---आशा साठे

रवींद्रनाथ,विवेकानंद यांच्याबद्दल मराठी मनाला एकप्रकारची ओढ आहे असे मला वाटते. त्यांच्या विषयी आपण माहिती करून घ्यावी,त्यांचे साहित्य वाचावे असे वाटत असते.मला तर त्यांचे घर पाहावे,शांतीनिकेतन मध्ये जावून राहावे असेही वाटते.एकदा गेले तरी समाधान होत नाही म्हणून परत परत तिथे जाऊन त्या काळातल्या खुणा शोधाव्या असेही वाटते. तिथे राहणारी काही मंडळी सांगतात की आता पूर्वी सारखे तिथे काही नाही,पण मनाने तिथे काय होते हे बघता येते असे मला वाटते. आपल्याला भौतिक जगात काय मिळते यापेक्षाही तुमचे अंतरंग काही एका विचाराने उजळून निघते का? तिथे काहीतरी असे मिळते की ते सांगता येत नाही फक्त अनुभवता येते.असे वाटते.आणि रवींद्रनाथ नेहमी असेच म्हणायचे हे “शुभबुद्धीचे उपासक रवींद्रनाथ” हे पुस्तक वाचले की कळते.
लेखिकेला सुद्धा रवींद्रनाथ यांच्याबद्दल एक वेगळी आत्मियता आहे. त्यांचे आनंदाने जगाकडे बघण्याची दृष्टी तिला खूप आवडते म्हणूनच ती तिच्या भोवतीच्या रसिक मंडळीना त्यांच्याबद्दल सांगू लागली. त्याविषयी लिहू लागली.तिला उमगलेले रवींदनाथ हे एक ‘आनंदघन’ आहेत.
लेखिकेने रवींद्रनाथांचे कुटुंब ,त्यांचे बालपण फार सुंदर शब्दात मांडले आहे. जेव्हा रवींद्रनाथांना बाराखडी वाचता यायला लागली आणि ज्यादिवशी त्यांनी वाचन सुरु केले,तेव्हा त्यांनी काय वाचले होते याची लख्ख आठवण त्यांना होती. ते म्हणतात की,’जल पडे,पाता नडे’ ‘पाणी पडते ,पान हलते’ हे वाचतांना होणारा आनंद त्यांना आठवतो.ते म्हणतात,’माझ्या आयुष्यातील हीच आदिकवीची पहिली कविता,’.रवींद्रनाथांनी त्यांच्या बालपणातील आणि युवावस्थेतील आठवणी ‘जीवनस्मृती ‘या पुस्तकात सांगितल्या आहेत. लेखिका म्हणते की साधारणपणे अशा पुस्तकांमध्ये नाराजीचा सूर असतो.पण रवींदनाथांची काळाकडे पाहण्याची धारणाच वेगळी आहे.सतत कुरुबुर करणाऱ्या माणसांनी तर जरूर वाचावे असे लेखन त्यांनी केले आहे. आणि हे सगळे आपण आशा साठे या लेखिकेमुळे सहज वाचू शकतो आणि समजून घेवू शकतो.
शांतीनिकेतन बद्दल वाचतांना,समजून घेतांना आपणही त्याठिकाणी जावून काही शिकायला हवे असे आपल्या प्रत्येकाला वाटते. कारण ती एक फक्त शाळा नव्हती तर गुरुदेवांच्या सर्जनशील विचारांची जिवंत प्रयोगशाळा होती. लेखिकेने गुरुदेवांच्या प्रत्येक पैलूची ओळख करून देतांना आजचे काही संदर्भ फार सहज दिले आहे.जसे की त्या लिहतात, “मुलाला आपल्या संस्कृतीचा वारसा साहित्यांतून,सर्व कलांतून आणि जीवनाच्या सगळ्या उद्योगातून मिळाला पाहिजे;पण त्याच परिणाम संकुचित राष्ट्रवादात होता कामा नये.” हे सगळं वाचतांना मला तर सारखी “आजची “ आठवण येत होती.किती आणि काय काय मी यातून घेवू आणि लक्षात ठेवू असे मला झाले होते.
आजचे आपले विद्यापीठ बघितले की रवींदनाथांचा विचार किती अमुल्य होता हे ही पटते.आपण कसं कमी पडतो आहोत सगळ्याच साठी याची खंत मनात दाटल्याशिवाय राहत नाही.ते म्हणतात,
“विद्यापीठे म्हणजे ज्ञानाचे एकत्रीकरण आणि वितरण एवढ्याच ढोबळ उद्देशाने एक यांत्रिक संघटना म्हणून तयार होऊ नयेत. त्याद्वारे लोकांना बुद्धी,विचारांची देवघेव करता आली पाहिजे. त्यातून मानवी स्वभावाच्या विविध छटा जाणता आल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांनी स्वयंसिद्ध,समर्थ बनले पाहिजे. बुद्धीने विचार करण्याचा आळस करणे म्हणजे एक पाप आहे.
असा आळस तर आपण सर्रास करतो आहोत.हे संपूर्ण पुस्तक वाचत असतांना मला सारखं वाटत होते की, हे मी सगळ्यांना सांगायला हवं,मग लक्षात आले की मी जर असे करू लागले तर अख्ख पुस्तकच मला इथे लिहून काढावे लागेल.
आपण मानुषेर धर्म समजून घेवू या आणि अधिक संवेदनशील होऊ या.मनुष्याच्या विशेषत्वाचा आदर करू या, मतभेद व्यक्त करतांना सुद्धा दुसऱ्याचे स्वातंत्र्य मान्य करू या. आणि आपल्यातील आनंदाला जागतं ठेवू या.रवींद्रनाथांनी व्यक्ती आणि समाज यांच्या संपूर्ण विकासाचा आराखडा समोर ठेवणारी प्रार्थना लिहली आहे त्याच्या सर्वच ओळी खूप सुंदर आहेत.मनाने पुनःपुन्हा त्याचा विचार करावा आणि आचारात आणण्यासाठी झटावे.त्यातल्या शेवटच्या दोन मला सारख्या म्हणाव्या वाटतात, त्या म्हणजे
जेथे तुझ्या प्रेरणेने मन विकसित होऊन प्रगतिशील विचार व आचार सदैव समृद्ध होत आहेत;
अशा त्या स्वतंत्र्यतेच्या स्वर्गलोकात हे पित्या, माझा देश जागृत होवो!
आशा साठे यांनी लिहलेले हे पुस्तक वाचतांना आपल्याला त्यांचं रवींद्रनाथां वरचे प्रेम आणि त्यांचा अभ्यास याची जाणीव करून देते.त्यामुळेच हे पुस्तक मनाला आनंद देणारे आणि डोक्याला विचार देणारे आहे असे मला वाटते.
No photo description available.
Alka Jatkar, Sujata Babar and 12 others
12 comments
1 share
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment