Tuesday, November 10, 2020

       कोरडी शेतं ... ओले डोळे – दिप्ती राऊत,रोहन प्रकाशन

शेतकरी आत्महत्येची बातमी ही माध्यमे, सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यासाठी वेगवेगळ्या कारणासाठी महत्वाची असते.प्रत्येकजण तिचा उपयोग आपआपल्या फायद्यासाठी करून घेतो.पण ज्या घरातील पुरुषांनी आत्महत्या केली आहे ,त्या घरातील स्त्री या सगळ्याला कशी तोंड देत असेल,याचा विचार आपण करत नाही.कारण खूप लोक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना कसे पैसे मिळतात आणि त्यांच्या कुटुंबाची कशी मजा आहे याच पद्धतीने बोलत असतात.पण दिप्ती राऊत यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बायकांना प्रत्यक्ष भेटून सत्य परिस्थिती आपल्या समोर मांडली आहे.त्यामुळे तरी आपल्यासारख्या सामान्य माणसांचे डोळे उघडतील असे वाटते.
आपण नेहमी वाचतो की शेतकऱ्यांनी आत्महत्या केली,आणि त्याची बातमी आली की,शासन लगेचच एक लाख रुपयांची मदत जाहीर करतं.पण आपल्यापैकी खूपजणांना हे माहित नसते की,त्यासाठी पोस्टमार्टेमद्वारा हा मृत्यू म्हणजे आत्महत्याच आहे हे सिद्ध करावं लागतं. शिवाय मृत व्यक्तीच्या नावावर जमीन असल्याचा पुरावा लागतो. हा सगळा सोपस्कार सिद्ध झाला तरच एक लाख रुप्यातले तीस हजार रुपये तिच्या हातात पडतात.मग अशा पैशावर घेणेकरीचे लक्ष असते.तसेच मृत्यू नंतरचे विधी करावे लागतात. त्यात पैसे जातात.बाकीचे पैसे पाच वर्षानंतर मिळतात.मग अशावेळी घरातील स्त्रीला गप्प बसून चालत नाही.कारण कधी कधी घरात लहान मुले असतात, म्हातारी माणसे असतात. तिच्यापुढे तिच्या नवऱ्यापेक्षा अधिक अडचणी उभ्या असतात.या स्त्रिया आपल्या मुलांचे शिक्षण व्हावे ,त्यांचे जीवन मार्गी लागावे म्हणून आपल्या सर्व ताकदीनिशी उभ्या राहतात. त्यांनी शेतीत काम करण्याची माहिती असते पण बाजाराची माहिती नसते. खूप लोक कामे करून देतो म्हणून पैसे लुबाडणारे त्यांना भेटतात .शिवाय नातेवाईकांना आपल्याकडे आर्थिक मदत मागितली जाईन याची भीती वाटते,म्हणून तेही संपर्कात राहत नाही. खरंतर प्रत्येकवेळी पैसेच पाहिजे असतात असे नाही.साधा सल्ला हवा असतो.पण या स्त्रियांवर टीका केली जाते. आम्हांला विचारून काहीच करत नाही.असे त्यांचे नातेवाईक म्हणत असतात.
लेखिकेने या पुस्तकात अनेक स्त्रियांचा उल्लेख केला आहे.ज्या नवऱ्याच्या आत्महत्येनंतर पदर खोचून उभ्या राहिल्या.काहीजणी नवी तंत्रज्ञान शिकल्या. या पुस्तकात अशी अनेक उदाहरणे आहेत की, या स्त्रियांचे कर्तृत्व पाहून आपण थक्क होवू.यातीलच एक अकोला जिल्ह्यातील कट्यार गावच्या ज्योती देशमुख. त्यांच्या घरात २००१,२००४,२००७ यावर्षी अनुक्रमे सासरा, दीर,व नवरा तिघांनी आत्महत्या केल्या.त्यांची एकोणीस एकर जमीन.ज्योती ताईंनी कधीच शेतात पाउल ठेवलं नव्हतं. पण त्यांनी गेली दहा वर्ष आपलं शेत जगवलं आणि कुटुंबाला सांभाळलं.जमीन हडप करण्यासाठी नातेवाईकांनी खूप त्रास दिला.पण ज्योतीताई सगळ्यांना पुरून उरल्या.त्या मोबाईल वरून खरेदी –विक्री व्यवहार करतात म्हणून त्यांचा मोबाईल पळवण्याचा प्रयत्न केला,त्यांच्या घराची कौले पळवली.पण त्या आपलं काम करत राहिल्या. त्यांना आता प्रगतीशील शेतकरी म्हणून मान्यता मिळाली आहे.त्या म्हणतात,पुरुषाकडे दहा रुपये असतात तेव्हा ते ५० रुपये खर्च करतात.माझ्याकडे ५० रुपये असले तर मी फक्त १० रुपये खर्च करते.
लेखिकेने संपूर्ण महाराष्ट्रातील स्त्रियांचा शोध घेतला, त्यांच्याशी ती बोलली. लेखिका म्हणते, ‘या महिलांचे प्रश्न त्यांचे व्यक्तिगत नाहीत ...हा मुलभूत सामाजिक प्रश्न आहे. विस्कटलेल्या ग्रामीण अर्थकारणाचा प्रश्न आहे.दुर्लक्षित आणि फसलेल्या कृषिधोरणाचा प्रश्न आहे. बाई म्हणून कनिष्ठ लेखण्याच्या पुरातन पुरुषप्रधान मानसिकतेचा प्रश्न आहे... सामुहिक संवेदनेतून त्याची उत्तरं शोधणे आणि धोरणात्मक बदलातून त्यावर फुंकर घालणं हे फक्त या महिलांच्याच नव्हे तर संपूर्ण समाजहिताच्या दृष्टीनं अगत्याचं आहे.’ लेखिका म्हणते ते आपल्याला पटतं.शिवाय ती वेगवेगळ्या स्तरावर काय करता येईल हे सुचवते.ते ही आपण आणि प्रशासनाने समजून घ्यायला हवं.घराघरात संवाद होणे जरुरीचे आहे.कारण पती किती कर्ज ,कोणत्या बँकेचे कर्ज काढतो आहे हे बऱ्याचवेळा स्त्रियांना माहित नसते.खरंतर पुरुषांनी स्त्रियांना विश्वासात घेवून हे सांगायला पाहिजे. ‘तिला काय कळतं ?’ या मानसिकतेतून त्यांनी बाहेर यायला हवं. कारण आज या स्त्रियाच पुरुषांनी हार पत्करल्या नंतर, त्याच परिस्थितीवर स्वार होवून खंबीरपणे उभ्या आहेत.
फक्त बातमी पुरते आपले ज्ञान मर्यादित न ठेवता ,आपल्या आजूबाजूला उभ्या राहणाऱ्या या स्त्रियांकडे डोळे उघडे ठेवून बघितले तर त्यांचे कर्तृत्व आणि वेगळेपण आपल्या लक्षात येईल.त्यासाठी हे पुस्तक मुळातून वाचायलाच हवं असं आहे.
Image may contain: 1 person
Vandana Khare, Alka Jatkar and 14 others
7 comments
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment