Tuesday, November 10, 2020

 #वाचावं जनाचं लिहावं मनाचं 

लाखातली एक – चित्रा मेहेंदळे

सर्वसामान्य माणूस त्याला काही झाले किंवा त्याच्या समोर काही अडचणी आल्या की ,लगेच म्हणतो ‘हे सगळं माझ्याच वाट्याला का ? मी एवढं देवाचं करतो किंवा मी रस्त्यावरचे सगळे नियम पाळतो किंवा मी नेहमी व्यायाम करतो किंवा आणखीन काही गोष्टी ती व्यक्ती prevention म्हणून करत असेल त्या सगळ्या गोष्टींचे नाव घेत स्वतःवर आणि आलेल्या परिस्थितीवर वैतागत असतो. खरंतर आपल्या सर्वांनाच साध्या साध्या गोष्टींचे ताण येत असतात.त्यामुळे आपण परिस्थितीकडे मोकळ्या मनाने पाहू शकत नाही.एक तर आपल्या स्वतःच्या मर्यादा खूप असतात आणि शिवाय कोण काय म्हणेल याची भीतीही मनात असते. चित्रा मेहेंदळे त्यांच्या “लाखातली एक” या पुस्तकातून हेच सांगत आहेत.
एखादी सुंदर मुलगी,मुलगा यांचे दिसण्याचे वर्णन किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचे वर्णन आपण ‘लाखात एक असे करतो.मला वाटले पुस्तकातही असेच काहीसे असेल.सगळं छान छान असेल.पण या पुस्तकातली गोष्ट अजिबात अशी नाही.पण लेखिकेच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे ती तिच्या समोर येणाऱ्या अडचणीवर मात करते. मैत्रिणीला कॅन्सर झाला म्हणून लेखिकेने स्वतःची तपासणी करून घेतली.तेव्हा ‘नो मलिग्न्न्सीचा ‘रिपोर्ट आला.परंतु तपासणी ते रिपोर्ट येईपर्यंत मनांत जो भावभावनांचा प्रवास झाला त्यात नकारात्मकता भरून राहिली होती.काहीच करू नये असेच वाटत होते.लेखिका म्हणते की यापूर्वी सुद्धा मला लाखात एक असेच आजार झाले. जसे की घटसर्प,tonsil,नाकात रंगीत खडा फसणे,डोळ्यात पंख्याचा ऑईलपेंट जाणे,चामखीळ ,अक्कलदाढेचे आडवे येणे,कुणीतरी भिरकावलेल्या दगडाने डोक्याला खोक पडणे,मनगटावर गगलिऑन होणे,मानेवर टीबीची गाठ येणे असे सतत काहीना काही आजार तिच्या वाटेला आले. त्यामुळे नेहमीच दवाखाना आणि ऑपरेशन ठरलेले.या सगळ्या आजारपणात नेहमीच तिला कॅन्सरची शंका येत असे.चाळीस वर्षे या शब्दाने तिचा पाठलाग केला आणि शेवटी तो आलाच.लेखिका म्हणते सुटले एकदाची. तिची ही प्रतिक्रिया वाचून लेखिकेची आजाराकडे बघण्याची सहजता लक्षात येते.लेखिका म्हणते की,हा लढा जसा आजाराशी होता तसाच लढा हा स्वतःशी सुद्धा होता. कारण आजारी असतांना आजाराकडे लक्ष जावू नये म्हणून मन सतत कशात तरी गुंतलेले असणे गरजेचे आहे.त्यासाठी लेखिकेने स्वतःला वेगवेगळ्या छंदात गुंतवून ठेवले.तिने सतत वाचन केले, कविता लिहल्या,ओरिगामी,रांगोळ्या शिकली.त्याचा अभ्यास करून स्पर्धेत भाग घेतला आणि पारितोषिके मिळवली.अर्थात प्रत्येक वेळी आजार तिची स्वत्व परीक्षा पाहत होता.त्यामुळेच त्याच्यावर मात करून पुढे कसे जायचे हे ती शिकत होती.
पुस्तक आजाराविषयी सांगत असले तरी ते गंभीर होत नाही.लेखिका नेहमीच चांगल्या आठवणी काढत राहते.तिच्या मनाचा मोकळेपणा आणि लेखनातला मोकळेपणा वाचून वाचक सुद्धा सहजतेने पुढे वाचत जातो.कारण लेखिका याला रडगाणे म्हणत नाही तर जीवनगाणे म्हणते.म्हणूनच ती आपल्या कवितेतून म्हणते, “
अजिबात जाणवत नाही मला पसरू चाललेला काळोख घनदाट
माणुसकीचे उत्तम नमुने घेवून येणार आहे नवी रम्य पहाट !
स्त्रियांना डॉक्टरकडे जातांना संकोच वाटतो.पण याविषयी लिहतांना लेखिका म्हणते, ‘एकदा बाईची आई झाली की ही सर्व लाज कुठल्याकुठे जाते.एका डिलिव्हरीत प्रत्येक स्त्रीला हा अनुभव येतो..आईपण असे खूप काही शिकवून जाते.’
लेखिकेची ही स्वतःची गोष्ट परिस्थिती कशी मात करावी हे सांगणारी आहे.पण परिस्थितीकडे मोकळ्या मनाने पाहिले तर आपण त्यातून तावूनसुलाखून बाहेर पडतो हेही आपण यात वाचतो.मग मात्र खरच आपण “लाखात एक” होतो.
हे पुस्तक माझ्या हातात अगदी सहज आलं.म्हणजे पुणे नाशिक प्रवासात शेजारच्या सिटवर बसणाऱ्या व्यक्तीने ते पुस्तक स्वतःच्या वाचनासाठी आणलं होतं.पण त्यांना झोप लागली आणि ते पुस्तक माझ्याकडे हळूच सरकलं.मग मी ते वाचून टाकलं.खरंतर माझ्याकडं दोन मासिकं होती,पण ती माझीच होती ,कधीही वाचली तरी चालणार होती.यापुस्तकाच्या नावाने माझी उत्सुकता चाळवली.खूप घाई घाईत वाचले मी.पण मजा आली कारण माझ्यासाठी सरप्राईज होते ना .काय वाचायचं हे मी ठरवले होते पण वाचलं वेगळंच म्हणून.गंमत आहे ना.
Dhanashri Bhate, Alka Jatkar and 13 others
14 comments
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment