Tuesday, November 10, 2020

 

#वाचावं जनाचं लिहावं मनाचं

कायमचे प्रश्न – रत्नाकर मतकरी

मला खूपशा गोष्टी कळत नाही.आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे अर्थ आपल्याला दिसतात तेवढेच नक्की नाही,हे जाणवते पण त्या घटनांना नक्की किती आणि कोणते पदर असतील.याबद्दल मला सतत काही ना काही प्रश्न पडत असतात.त्याचमुळे भरपूर वाचणे आणि लेखक काय म्हणतात त्याकडे लक्ष देणे मला आवडते.समजून घेणे आवडते. अर्थात हे लिखाण जरा उपरोधिक स्वरूपात असेल तर मला अधिक आवडते.त्याचमुळे मी अशा लिखाणाकडे सहज ओढले जाते.रत्नाकर मतकरी यांचे “कायमचे प्रश्न “हे पुस्तक मी वाचायला घेतले तेव्हा मला खूप उत्सुकता होती.कारण आजपर्यंत त्यांनी लिहलेले नाटक,बालनाट्य ,गुढकथा, कथासंग्रह,ललित लेख असे काही काही मला माहित होते.या पुस्तकातील लेख म्हणजे त्यांनी त्या त्याकाळात घडलेल्या घटनांवर दिलेली प्रतिक्रिया आहे. काही त्यांची भाषणे आहेत. या सर्व लेखांची शैली त्यांच्या इतर लिखाणापेक्षा वेगळी आहे.पुस्तकाच्या मागे त्यांनी लिहलेल्या पुस्तकांची यादी दिलेली आहे तीच एवढी मोठी आहे की आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
या पुस्तकात वेगवेगळ्या सामाजिक-राजकीय-साहित्यिक-सांस्कृतिक प्रश्नावरचे एकूण ३२ लेख आहेत.या लेखांचे राजकीय-सामाजिक व साहित्यिक –सांस्कृतिक असे दोन विभाग केले आहेत.असे असले तरी प्रत्येक लेख वेगळा आहे आणि तो वाचावाच असे वाटते. प्रत्येक लेखात आपल्याला मतकरी याचे सूक्ष्म निरीक्षण दिसते.ते बारीकसारीक गोष्टी टिपतात आणि परखडपणे आपले विचार मांडतात.त्यांनी कधीच कोणाचे मिंधेपण स्वीकारले नाही त्यामुळे ते राजकारणी लोकांच्या प्रतापाबद्दल जसे बोलतात तसेच ते साहित्यिकांबद्दलही बोलतात. या संपूर्ण पुस्तकात कुठेही कोणाचेही वाक्य त्यांनी quote केलेले नाही.प्रत्येक गोष्टीवर त्यांचा त्यांचा असा विचार आणि चिंतन आहे.ते सरळ सरळ आपल्याला त्यांचे मत सांगतात.१९९५ ,१९९८ पासून ते २०१५ पर्यंत वेगवेगळ्या वेळी लिहलेले हे लेख असले तरी ते प्रत्येककाळाला लागू होणारे आहे.सत्तेवर कोणीही बसले तरी प्रश्न कायमचे आहेत हेच खरे.
मतकरींनी लिहलेले राजकीय लेख मला जास्त आवडले.त्यांचा पहिलाच लेख, “महाराष्ट्र राज्य प्रायव्हेट लिमिटेड’ हा लेख तर खूपच बोलका आहे आणि सर्वकाळासाठी उपयोजित आहे.त्याचा एक मासला इथे दिल्याशिवाय मला राहवत नाही. “महाराष्ट्र राज्य प्रायव्हेट लिमिटेडच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्ये गेल्या पन्नास वर्षात फारसे बदल झाले नाहीत.तीच घराणी,तेच नेते आणि त्याची तीच पिलावळ.म.रा.प्रा.लि.ची शैली लोकशाहीची असल्यामुळे विरोधी पक्ष अपरिहार्य असला,तरी सर्वानीच एकमेका सहाय्य करून कंपनीचे जे प्रमुख उद्दिष्ट ,ते म्हणजे जास्तीत जास्त धनसंपदा गोळा करणे, व त्यात अधिकाधिक वाटा मिळवणे.हे चालू ठेवले.या व्यवहारचातुर्यामुळेच आज डिरेक्टरांच्या तरुण वारसांकडेही शिक्षण फक्त दहावी पास आणि माया बारा कोटींची, हे शक्य झाले.” पटतं ना..आज वारसदार दहावीपेक्षा थोडे पुढे शिकलेले असतील एवढाच काय तो फरक.
समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाविषयी मतकरी आपली भूमिका निर्भीडपणे मांडतात. ते प्रश्नाकडे तटस्थपणे पाहतात आणि त्याचे विश्लेषण करतात.त्यांचे समाजाशी जोडलेले असणे आपल्याला कळते त्याचमुळे ते जे लिहतात ते वाचतांना आपल्याला कल्पना करत राहावे लागत नाही.मुळातून सगळ्याच प्रश्नांचे भान येण्यासाठी वाचावे असेच हे पुस्तक आहे.
No photo description available.
Vandana Khare, Sanjay Kawale and 21 others
2 comments
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment