Tuesday, November 10, 2020

 नग्नसत्य –बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध – मुक्ता मनोहर

रोज वर्तमानपत्र उघडलं की,टीव्हीचा डब्बा उघडला की,या बातम्या आपण वाचतो,ऐकतो आणि सरावाने सोडूनही देतो.मनातून खूप वाईट वाटत असते.नक्की काय चुकते आहे?कशामुळे हे सर्व होते आहे?कोणाकोणाला शिक्षा करायला हवी?आणि शिक्षा केली की खरच लोक घाबरतील आणि त्यांचा वचक बसेल का?कारण या जिल्ह्याची बातमी त्या जिल्ह्यात पोहचायला वेळ जरी लागत नसला तरी तो पर्यंत तिथे असे गुन्हे घडून गेलेले असतात.मुलींनी असे वागावे, हे हे कपडे घालावे,भलत्या वेळेच्या नोकऱ्या करूच नये,काही त्यांच्या पैशांची गरज नाही,असे अनेक वाक्ये कानावर पडतात.या सगळ्याला माणूस म्हणून आपण कसे तोंड देणार आहोत ?आपण नक्की काय काय बघत नाही,बलात्काराचे असे अक्राळविक्राळ स्वरूप सतत आपल्या समोर येत आहे. ते होवू नये म्हणून कशी उत्तरे शोधणार?या संदर्भात हे पुस्तक बोलते.लेखिका सगळ्याच घटनांचा संवेदनशीलतेने विचार करते.
हे पुस्तक सात भागात विभागले गेले आहे.त्या भागांची नावे वाचली तरी लेखिकेने कसा सगळ्या बाजूने अभ्यास केला आहे हे लक्षात येईल. १)चंगळवादात बुडालेली आपली शहरं २)खाकी वर्दीतला दहशतवाद ३)आपली न्यायव्यवस्था ४)औद्योगिकक्रांती आणि मजबूत जातिप्रथा५)जगाची बाजारपेठ आणि स्त्रियांचा बाजार ६)वंशवाद ७) राष्ट्रप्रेमाचं दालन . टोळीवाद,गणवाद,जातवाद,धर्मवाद,देशवाद ,बाजारपेठीय वर्चस्ववाद-चंगळवाद,जगभरची शस्त्रास्त्र निर्मिती आणि युद्धखोरी हे सगळेच बलात्काराचे खास दोस्त आहेत.बलात्काराचं हे वास्तव लक्षात घेतल्याशिवाय त्याचा शेवट होणार नाही.लेखिकेने या पुस्तकात बलात्कारी संस्कृती कशी आणि कधी निर्माण झाली याचा वेध या पुस्तकात घेतला आहे.त्याचबरोबर स्त्री-पुरुष समानतेवर आधारलेला सर्जनशील समाज निर्माण करण्याचं एक आव्हान आपल्या समोर ठेवलं आहे.
यामध्ये लेखिकेने विक्रमवेताळ सारखी रचना करून लिहले आहे. अशा पद्धतीने का लिहले याचे स्प्ष्टीकरण लेखिका देते.ती म्हणते बलात्कार या विषयाचे बारकावे एवढे जीवघेणे आहेत की ते या फॉर्म शिवाय प्रवाहीपणे मांडता आले नसते.हे पुस्तक लिहतांना लेखिकेला सतत अस्वस्थपणाला सामोरे जावे लागत होते.आपल्यालाही पुस्तक वाचतांना असेच होते.कारण हे सगळं एकवेळी आपण वाचत असतो.या घडलेल्या घटनांचे वरवरचे तपशील आपल्याला माहित असतात.पण त्याचा विचार आपण फारसा करत नाही.लेखीकेमुळे आपण या विषयाकडे नव्याने पाहू लागतो.
याशिवाय लेखिकेने बलात्कार विरोधात ज्या जय चळवळी झाल्या,आंदोलने झाली त्यांचाही तपशील इथे दिला आहे.फक्त आपल्या देशातलाच संदर्भ दिले नाही तर बाहेरच्या देशातल्या चळवळीविषयी सुद्धा तिने लिहले आहे.एका व्यापक सामाजिक संदर्भात लेखिकेने हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लेखिका या पुस्तकात शेवटी जे म्हणते ते फार महत्वाचे आहे,
“बलात्कार हा विषय अतिशय गुंतागुंतीचा आहे व खूप व्यापक आहे, त्या विषयाच्या सर्वच बाजू,केसेस,निकाल,धोके,घ्यायची काळजी,वगैरे या लेखनात समग्रपणे आणता आलेलं नाही, याची मला जाणीव आहे.अत्याचाराचं वास्तव हे एकात एक गुंफलेल्या साखळदंडा सारखं आहे.मानवमुक्तीसाठी त्या सगळ्याच कड्यांवर आघात करावा लागेल.”लेखिकेने मोठ्या सृजनात्मक शक्तीची गरज व्यक्त केली आहे.
या पुस्तकाने एक अस्वस्थपण तर दिलेच.पण घटनेकडे विविध बाजूने पाहण्याची दृष्टीही दिली. मला हे पुस्तक वाचतांना सतत वाटत होते की,पुरुषांनी सुद्धा हा बलात्काराच्या विरोधात उभे राहणे,त्याविरोधात बोलणे, या मुलांच्या कोणत्या गोष्टी समजत नाहीत,त्या समजून घेवून काय उपाय करता येतील हे बघणे गरजेचे आहे.नाहीतर प्रत्येक स्त्री प्रत्येक पुरुषाकडे संशयाने बघेल.इतकं अविश्वासाचं वातावरण निर्माण होईल की,अजून दोन मोठे गट पडतील.त्यापेक्षा एकमेकांना समजून घेवून एक चांगली वाट निर्माण करता आली तर, निरोगी आणि निकोप समाज निर्माणाकडे आपण वाटचाल करू शकू.आधीच अनेक भिंती आपण निर्माण करत आहोत.पुरुषांनी स्वतःवर नियंत्रण आणायला शिकलं पाहिजे. हे पुस्तक मुळातून वाचावं आणि समजून घ्यावं असंच आहे.
Image may contain: one or more people and text
Vandana Khare, Veena Phatak and 15 others
13 comments
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment