Tuesday, November 10, 2020

  #वारी 


ज्ञानेश्वर माउलींचा पुढचा मुक्काम वाल्हे गावी होता.पण आमची दिंडी वाल्हेच्या पुढे निरा यागावी थांबणार होती.आज मी खूप आत्मविश्वासाने चालत होते. अनुभवाचा आत्मविश्वास होता तो. आता चालण्याची, आंघोळीची आणि कसलीच काळजी नाही. हरिनामाचा गजर करत आणि ऐकत आमची पाउलं पडत होती.कोणी शांतपणे म्हणत , तर कोणाचा आवाज तालासुरात येई. कोणाचा जीव काकुळतीला येत असे. भाव मात्र सगळीकडेच होता, कानाला आणि मनाला जाणवत होता. त्यांची तळमळ कळत होती आणि माझी? ती होती का? आहे का? एकीकडे असे प्रश्न पडत होते तर एकीकडे डोळ्यांना सारखा पाझर फुटत होता. अभंग म्हणतांना, नाम घेतांना सारखं भरून येत होतं. तो महोलाचा परिणाम की ?मी सोप्प उत्तर शोधलं . वाहत जायचं.संतमंडळींना ऐकायचं, पाहायचं आणि पाउलं पंढरीच्या दिशेने मजेत टाकायची.इथेना सर्वांना विठ्ठलाच्या भेटीची आस होती,पण म्हणून कसही करून तिथे पोहचायचे असा भाव मात्र कोणामध्येच आढळला नाही. प्रत्येक पाउलाला संतांना साक्षी ठेवत वारकरी अभंग म्हणत चालायचे. संताचा भाव मनात उतरवित. आम्हीही त्यात सहज मिसळून जात असू.

वाल्हेला माउलींची पालखी थांबली.वाल्ह्याला म्हणजे त्या रस्त्याने जातांना वाल्मिकी नावाचा डोंगर आहे. आमच्या बरोबर चालणारी माणसं त्याबद्दल बोलत होती.तिथे वाल्मिकी ऋषीची समाधी आहे असं म्हणतात.वाल्हे गाव लहानसं आहे. तिथे माउली मुक्काम करतात. ज्या ठिकाणी माउलींचा मुक्काम असतो त्या ठिकाणची जागा फुलांनी सुशोभित केलेली असते.गावात उत्सवाचे वातावरण असते. लोक नटूनथटून माउलींच्या दर्शनाला येतात.दर्शन झाल्याचे एक वेगळे समाधान घेवून लोक आपापल्या घरी जातात. पालखीची व्यवस्था गावातील लोक करतात तसेच संस्थान सुद्धा या गावांना काही पैसे देते.आम्ही वाल्ह्यातील गर्दी अनुभवत पुढे चालू लागलो.थोडा थोडा पाउस येत होता.पण तो फारसा भिजवत नव्हता. त्यामुळे त्याची काही अडचण वाटली नाही. जी मंडळी पुढे येणार होती ती टाळ वाजवत चालू लागली. त्यावेळी मला बार्शीच्या काही वारकरी महिला भेटल्या. त्याही काही वर्षांपासून वारीला येत आहेत.म्हणाल्या,’ मुलाचे लग्न झाले, आणि मी मोकळी झाले.किती दिवस संसार करायचा.आता बास म्हटलं.एवढं म्हणून त्या लगेच गवळण म्हणायला लागल्या,’ आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले ‘ पुढचे मला आता आठवत नाही. त्यांना नीरेपासून एक फाटा निघतो तेथिल त्यांच्या पाव्हण्याकडे जायचे होते.पटपट चालत होत्या आणि मलाही चालवत होत्या.माझ्याजवळची पिशवी बघून त्यातील एकजण मला म्हणाली, ओझं टाकून द्यायला आलीस ना? मग हे ओझं कशासाठी ?मी काहीच म्हटले नाही. त्यांचे हात रिकामे होते. त्यांच्या पाठीवर काहीच नव्हते.मी माझ्या बाटलीतील पाणी प्यायले .’ अग सगळीकडे चांगलंच पाणी असतं,भरवसा ठेवायचा.मी हो म्हटलं. ऐकायचं ठरवलं होतं ना?आम्ही गप्पा मारत निरेला पोहचलो. मध्ये वाटेत जांभळ खाल्ली.छान होती. तोंड कोरडं पडत नव्हतं.जांभळ्या जीभा घेवून आम्ही मुक्कामाचे ठिकाण शोधून काढले. मोठं पटांगण असणारी शाळा होती.शाळेला गेट होते.गेटच्या बाहेर भरपूर झाडी आणि शेती होती. आमची बाकी सोय तिथे असणार होती. शाळेने त्यांची toilets बंद करून ठेवली होती.आम्ही तिथेही लवकरच पोहचलो.मग जेवलो आणि झाडाखाली पडून राहिलो. पाणी आणायला गेले तेव्हा काही घरामध्ये मी विचारले की तुमच्याकडचे toilet वापरले तर चालेल का? खरं तर मला जायचे नव्हते पण असं विचारण्याचे धाडस मी करू शकते का हे मला पाहयचे होते. एक दोन घरात विचारतांना मला खूप संकोच वाटत होता.पण मी स्वतः वर मात केले आणि बिनधास्त विचारले.स्वतःच स्वतःशी केलेली गंमत .

No comments:

Post a Comment