Tuesday, November 10, 2020

 #वाचावं जनाचं लिहावं मनाचं 


तीन त्रिक दहा –उत्पल व.बा.

कोणत्याही प्रश्नाला,समस्येला एकच एक उत्तर नसतं.व्यक्तिगणिक ते बदलतही जातं.विशिष्ट विचारधारा आणि त्याला अनुसरून समस्येचे निराकरण.असे व्यवहारी जगात होत नाही.कारण आपलं जगणं विविधतेनं आणि विसंगतीने भरलेलं आहे.त्यामुळे कोणत्याही प्रश्नाकडे एकाच बाजूने बघणे शक्य नाही.हेच लेखक आपल्याला या पुस्तकातून सांगत आहे.लेखक म्हणतो की माझा न्याय,समता,स्वातंत्र्य या मानवी मुल्यांवर विश्वास आहे.पण कोणत्याही समस्येकडे एकाच बाजूने पाहणे,त्याच्या उत्तराबद्दल ठाम असणे होत नाही.हे पुस्तक वाचत असतांना मला असे वाटले की,हे आपलेच विचार आहे.कोणत्याही एकाच विचारधारेला धरून चालणे आणि बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही.
या पुस्तकातील सर्व लेख वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत.तरीही ते भोवताली असणाऱ्या प्रश्नाशी बांधलेले असल्याने एका सूत्रात आहेत असे वाटते.हे लेख ललित-विनोदी आणि ललित वैचारिक अशा संमिश्र स्वरूपाचे आहेत.आजूबाजूला घडणाऱ्या घटना याचे पडसाद लेखकाच्या मनात उमटतात.त्यावरचा त्याचा विचार,विचारातील संघर्ष आपल्यासमोर लेख म्हणून येतो.याचा अर्थ हा लेख परत आपल्या ती घटना सांगते असे नाही तर त्या घटनेच्या आसपास असणारा विचार सांगतो.म्हणूनच आपले लक्ष लेखक काय म्हणतो आहे याकडे जाते.सहज सामान्य माणसाला सोप्पे वाटेल आणि त्याच्याही मनात असे उलटसुलट विचार येत असतील,असे आपले परस्परविरोधी विचार मान्य करून वाचक लेखक जे काही मांडतो आहे त्याकडे लक्ष देतो आणि स्वतःला जोडून घेण्याचा प्रयत्न करतो.मुख्य विचार करण्याची मोकळीक लेखक प्रत्येकाल देतो.हे चूक आणि हेच बरोबर असे तो काही सांगत नाही.त्यामुळे वाचकाच्या मनात प्रश्नाकडे मोकळेपणे बघण्याचा मार्ग तयार होतो.तो सहजपणे एकामागून एक पुढचे लेख वाचत जातो आणि स्वतः मध्ये छोटे छोटे बदल करता येतील अशी खात्री त्याला वाटत राहते असे मला वाटते.
मला हे पुस्तक आवडले कारण ते मला माझ्या विचारांच्या जवळ जाणारे आहे असे वाटले.कारण मलाही असे वाटते की जगणं म्हणजे केवळ हा प्रश्न आणि त्याचे हे उत्तर असे नाही तर त्या उत्तराकडे जाण्याच्या अनेक शक्यता तपासून पाहणे आणि त्यापर्यंत जाणारा प्रवास होय.आपण सतत आपल्याशी संवाद साधत असतो, वाद घालत असतो.त्यातून जे काही सापडते तेही अगदी शंभर टक्के बरोबर असतेच असे नाही.त्यालाही काही वाटा फुटत असतात.
यापुस्तकात इकडे-तिकडे ,उलट-सुलट,अधलं-मधलं, दृश्य-अदृश्य या शिर्षकाखाली २६ लेख आहेत.प्रत्येक लेख स्वतंत्रपणे वाचण्यासारखा आहे.त्यातला विनोद समजून घेण्यासारखा आहे. पुस्तकाच्या नावातच सांगितले आहे की कोणत्याही प्रश्नाचे एकच एक उत्तर नसते.तीन त्रिक दहा होवू शकतात किंवा त्यापेक्षाही कमी होवू शकतात. सामाजिक वास्तवाकडे बघतांना मोकळेपणे बघायला हवे हेच लेखकाला सांगायचे आहे असे वाटते.
Image may contain: text
Sanjay Kawale, Drpriti Mangesh Kulkarni and 19 others
8 comments
1 share
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment