Tuesday, November 10, 2020

  #वाचावं 


नाही मी एकला : फादर फ्रान्सिस दिब्रेटो

“नाही मी एकला” हे पुस्तक वाचले तेव्हा एखादी व्यक्ती फादर कशी होते, त्याव्यक्तीची मनाची अवस्था कशी असते? नक्की काय काय सोडावे लागते?नियम कडक असतात का?अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत जातात.मुख्य म्हणजे ही व्यक्ती एक साधी माणूस असते,ती स्वतःला घडवत असते.हे ही कळले.खरेतर मी फादर दिब्रेटो यांना नगरला डॉ.मोरजे यांच्याकडे भेटले होते. ते दोघे काही काही बोलत होते आणि मी आपली ऐकत होते.तेव्हा डॉ.मोरजे यांचे “ज्ञानोदय सार सूची” चे काम चालू होते आणि कच्चा लिंबू म्हणून त्यांना मदत करत होते. त्यावेळी जेव्हा फादर दिब्रेटो यांच्याशी बोलले तेव्हा माझ्या लक्षात आले की ते किती मृदू बोलतात.सहज काय सांगायचे ते सांगतात.शिवाय संत साहित्याचा सुद्धा त्यांचा गाढा अभ्यास आहे.त्यानंतर त्यांची सगळी पुस्तके मी वाचली. बायबल समजून घेण्यासाठी ते मी विकत घेतले.त्यातही त्यांनी ज्या तळटीपा दिल्या आहेत त्यावरून तर त्यांनी केवढा अभ्यास केला आहे हेच लक्षात येते.
“नाही मी एकला” या पुस्तकात त्यांनी सेमिनरीमध्ये जे दहा वर्षे शिक्षण घेतले त्याबद्दल लिहले आहे.हा अभ्यासक्रम मनाला आणि शरीराला शिस्त लावण्यासाठी कसा उपयुक्त होता.मला आजकाल सगळीकडे धर्मगुरू बघत असल्याने असे वाटायचे की कोणीही माणूस सहज धर्मगुरू होत असावा.पण या पुस्तकात दिब्रेटो यांनी तपशीलवार सांगितले आहे.स्वतःकडचे चांगले गुण कसे वाढवायचे यावर त्यांनी भर दिला आहे.ते एका ठिकाणी म्हणतात, “मी फादर झालो तरी साधकच आहे, मी स्वतःला शोधत आहे.चुका करतोय,प्रसंगी घोडचुकाही करतोय आणि चुकांतून शिकत आहे ...”ते स्वतःला धडपडणारा वाटसरूच समजतात.मला नेहमी प्रश्न पडतो की,एकदा की तुम्ही कोणी धर्मगुरु झालात की तुम्हांला कोणतीच समस्या येत नाही.त्यांचे आयुष्य सोप्पे आहे.कारण सगळ्या प्रश्नांची त्यांच्याकडे उत्तरे असणार.तर यावर फादर लिहतात, “माझ्या श्रद्धेचा प्रवास सुतासारखा सरळ नव्हता.कधी अध्यात्मिकतेच्या उंच शिखरावर तर कधी जडवादाच्या खोलगर्तेत,कधी गुहेतील गूढवास,तर कधी दैनदिन जीवनातील धूसरता असा माझा प्रवास झाला आहे.’ ही अध्यात्मिकतेची दुनिया कशी वेगळी आहे ना ?आत्ता आपल्याला सगळे सापडले आहे असे वाटेपर्यंत काहीच कळले नाही, हे जाणवते.अर्थात असे फक्त जी व्यक्ती आतून “जागी” आहे तिलाच समजत असेल.माहित नाही.
अर्थात त्यांनी फक्त अध्यात्मिकच लिहलेले नाही.त्यांचा अनेक सामाजिक कार्याशी संबध आहे. “हरित वसई” साठी त्यांनी संघर्ष केला आहे.त्यावेळी त्यांचे सत्व आणि स्वत्व यांची परीक्षा बघितली गेली.या संघर्षाच्या काळात त्यांना बिल्डर लॉबी,राजकारणी,आणि सत्ताधारी यांचे जे रूप पाह्यला मिळाले ते भयंकर होते.पण त्यांचे मनोबल अधिक असल्यामुळेच या लढ्यात ते शेवटपर्यंत टिकून राहिले.अर्थात त्याकाळात त्यांना ज्यांनी मदत केली त्या प्रत्येकाची आठवण ते कृतज्ञतापूर्वक काढतात.
या पुस्तकातली सगळीच विधाने आपल्याला विचार करायला लावणारी आहे.एका ठिकाणी ते म्हणतात, “प्रत्येक धर्म म्हणजे मानवी आत्म्याने सत्य,शिव आणि सुंदराचा केलेला शोध आणि घेतलेला ध्यास आहे’, ‘धर्मांना परस्पर जोडणारे समान दुवे आहेत,तसेच त्यांची वैशिष्ट्य सांगणारे भेद सुद्धा आहेत.त्या भेदामध्ये ज्यांचे सौदर्य दडलेले आहे’. हिच प्रगल्भ विचारसरणी भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.जे जे चांगले ते ते सर्वांचे हा भाव भारतीयांमध्ये सहज,उपजतच असतो आणि हीच भारतीयत्वाची खूण आहे.(यावरून आपण ठरवावे आपण भारतीय आहोत की नाही ते असे मला वाटते .)म्हणूनच दिब्रेटो म्हणतात, “मी पहिले भारतीय आहे,मग ख्रिस्ती आहे,’.
या पुस्तकात वेगवेगळे संदर्भ येतात.नामवंत लेखक,कवी,येतात. सुवार्ता’ सारखे मराठी मासिक ते गेली अनेक वर्षे वसईतून काढतात.त्याविषयीही ते लिहतात.तसेच ते जेव्हा निसर्गाबद्दल लिहतात तेव्हा त्यांच्या लेखणीचे कवित्व आपल्याला जाणवते.तर चळवळीविषयी ते लिहतात तेव्हा आपल्याला पुढे वाचण्याचे,काही करण्याचे स्फुरण चढते.
स्वतःच्या प्रतिमेमधून बाहेर पडून लिहलेले हे पुस्तक मला खूप आवडले.एकतर अनेक गोष्टींची माहिती मला नव्हती ती या निमित्ताने झाली.आपण सगळ्यांनी त्यांचे वर्तमानपत्रातील सदर वाचलेले आहे.त्यातून आपल्याला त्यांच्या भाषेचा गोडवा आपल्याला कळलेला आहे.अजून खूप गोष्टी सविस्तर वाचण्यासाठी जरूर हे पुस्तक वाचावे असेच मला वाटते.
No photo description available.
Sanjay Kawale, Drpriti Mangesh Kulkarni and 24 others
17 comments
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment