Tuesday, November 10, 2020

 #वारी 


आम्ही फलटण सोडून धर्मापुरीकडे निघालो.आता गर्दी किती आहे हे बघायचा माझा सोस संपला होता.माझ्या पुढे मागे हजारो लोक असणार आहेत.या सगळ्या समूहाच्यामध्ये मी किती इटुकली आहे हे मला रोज समजत होते.एखादा विचार,मूल्य मोठे असते पण त्यांचा हात धरून चालतांना मी फक्त पाऊले टाकणारी असते. त्यापेक्षा मी मोठी नसते.हे लक्षात आले की,प्रत्येक नवाजुना विचार तपासून पाहता येतो आणि त्याचे स्वागत करता येते.आपली कव हळूहळू मोठी करायला हवी.सगळ्यांना सामावून घेणारे विचार आजूबाजूला असतात पण आपण अहंकार आणि खोटी प्रतिष्ठा यामध्ये खूप अडकतो. त्यामुळे शेजारच्याशी हसून साधं बोलणंही आपल्याच्याने होत नाही.असे अनेक विचार डोक्यात घेवून मी चालत होते.टाळ –मृदुंगाचा आवाज आणि अभंग सतत कानावर पडत असल्यामुळे असे वाटत होते की, याशिवाय मी दुसरे काहीच ऐकले नाही.

याकाळात पालखीच्या रस्त्यावर कोणी सहसा गाडीत बसत नाही. पालखीचा रस्त्यावर चालायलाच हवे असे वारकऱ्यांना वाटते.कोणी फारच आजारी असेल तर त्यांना आग्रह केला जातो गाडीत बसायचा.पण शक्यतो सगळेच चालतात.गाडीत बसून गेले की मुक्कामाच्या जागी आपण लवकर पोहचतो आणि मग रस्त्याने चालतांना येणारी मजा अनुभवता येत नाही.शिवाय तिथे आपण एकटेच असतो.असे काही माउली मला सांगत होत्या.आम्ही चालतांना थोड्यावेळ एका पेट्रोल पंपावर थांबलो. तिथे अनेकजण बसले होते.आम्हीही आमचे घोंगडे टाकले आणि बसलो.शेजारी काही मंडळी आली होती. एकमेकांकडून पाय दाबून हसण्याचे काम चालू होते.त्याबरोबर आशिर्वाद दिले जात होते.एकमेकांच्या कमीअधिक तब्येतीवरून चिडवणे चालू होते.आम्हीही त्यात सह्भागी झालो.एखाद्या ठिकाणी सगळेच पुरुष बोलत आहेत म्हणून स्त्रियांनी जायचे नाही असे काही तिथे नव्हते. आपण सहज त्यांच्या संवादात सहभागी होऊ शकतो.
एखाद्या पेट्रोल पंपावर अशी पथारी टाकून भररस्त्यात पसरण्याचे स्वातंत्र्य मला वारीने दिले. आम्ही कोणीच स्त्रिया अजिबात संकोच करत नव्हतो, किंबहुना आमच्या वावरण्याच्या संकोच व्हावा असे काही तिथे मला आढळले नाही. पुढे जात असतांना एका ट्रकच्या आडोशाला काही माउली पोळ्या करत होत्या. मी म्हटलं मी पण मदत करते. तर त्याम्हणाल्या, एवढी पोळी खाऊन दाखवायची.ती पोळी एवढी मोठी होती की चार लोकांना पुरेल.मी म्हटलं थोडी खाईन.मग हसल्या.पण ती एवढी मोठी पोळी लाटणे आणि ती तव्यावर टाकणे हे एक प्रात्यक्षिक होते.मग जमतंय म्हटल्यावर अजून चार-पाच पोळ्या लाटल्या.मला फार गंमत आली.तेवढ्यावेळात त्यांनी दोन चार गवळणी म्हटल्या. गवळणी म्हणायला सुरुवात झाली की पाऊले लगेच नाचायला सुरुवात करतात. त्यात राधा कृष्णाला म्हणते की, “अरे मला कधीतरी बाहेर घेवून जा, हे शहर दाखव,नुसते तोंडी कौतुक नको सांगू. मग एक दिवस तो राज्यकारभारातून वेळ काढतो आणि तिला आवरायला सांगतो.मग ते सुंदर शहर ते पाहतात.” या गवळणीचे शब्द माझ्या लक्षात नाही, अर्थ तेवढा लक्षात राहिला. अशी गाणी म्हणता म्हणता कामाचा आणि चालण्याचा शीण कुठल्या कुठे निघून जातो.
आमचे सगळ्यांचे चेहरे ऊनपावसाने चांगलेच रापले होते. एका ठिकाणी आरसे विकायला होते,छोटे छोटे आरसे.मी त्यात माझा चेहरा पाहिला तर माझे मलाच आश्चर्य वाटले.त्याचवेळी माझ्या मनात विचार आला की, “अवघा रंग एक झाला” असे का म्हणत असावे. आम्ही सगळेचजण जवळ जवळ विठ्ठलाच्या रंगाचे होत होतो. सगळेचजण भक्तीत रंगत होतो, सगळेचजण एकमेकांना माउलीचा एकच दर्जा देत होतो. ओहो हा अर्थ अचानक उमगला त्यामुळे माझे मला छान वाटले .
वारीत अभंग आणि हे सगळे असतेच.पण प्रबोधनाची कामेही मोठ्या प्रमाणावर चालतात.तंबाखू, गुटखा, दारू,या व्यसनांचे दुष्परिणाम सांगणारी कीर्तने, भाषणे,असतात.आम्ही ज्या दिंडीत गेलो होतो तिथेही एक डॉक्टर हे सगळं सांगायला आले होते.तसेच अनेक संसर्गजन्य आजारांपासून आपण कसे वाचू शकतो यावरही छोटी छोटी नाटके सादर केली जातात. काहीजण त्यातून बोध घेतात, काहीजण नाही. शेतीच्या संदर्भात नवीन आलेले बियाणे याबद्दलचे पोस्टरही लावलेली असतात.औषधांच्या जाहिराती असतात.तो तिकडचा संसार इथेही असतोच.पण वारीत आल्याने त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत असावा.
प्रचंड गर्दीत आम्ही चालत असतांना एक माउली माझ्या शेजारून चालत होती.आमच्या गप्पा चालल्या होत्या.मध्ये मध्ये आम्ही अभंगाला ही आवाज देत होतो. त्या अनेक वर्षांपासून येत होत्या. मी विचारले की,एवढ्या गर्दीत तुम्ही आल्या आहेत हे पांडूरंगाला कसे कळणार ?” तो तुम्हांला कसा ओळखेल.?”
त्यांनी माझ्याकडे हसून पाहिले, माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि म्हटलं, एवढ्या गर्दीत तुला पाउल ठेवायला, नाचायला,चालायला जागा मिळते आहे ना ? लांबून तू विचार केला असता तर तुला तुझ्यासाठी जागा दिसलीच नसती.पण आता तू एवढे अंतर कापून आली. तुझी जागा तुला मिळाली की नाही ? तसेच आहे ते, माझ्या वाटचा विठ्ठल मला भेटेलच.तू फक्त तुझ्या पाउलांची जागा सांभाळ.” यावर काय बोलणार.

No comments:

Post a Comment