Tuesday, November 10, 2020

    #वारी १०  

  ( हे सगळे वारी विषयीचे लेख जुलै २०१९ मध्ये माझ्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध झाले होते. नंतर ते लोकमतच्या सखी पुरवणीत सुद्धा प्रसिद्ध झाले होते.)


तरडगाव तसं फारसं लांब नव्हतं. पण एकालाएक लागून अनेक पालख्या होत्या.रिंगण बघून झाल्यावर अनेकजण गोल करून बसले आणि भजने म्हणायला लागले.काहीजण लोकगीतं म्हणत होते त्यात त्यांचा ज्ञाना, तुका सहज येवून जात होते आणि मनीचे गुज उकलण्याचा मार्ग सांगत होते. आम्ही पण एका गटात बसलो ,माउली गवळणी म्हणायला लागल्या होत्या.एकामागून एक गाणी न बघता कोणी म्हणायला लागले की आपला शहरी खत्रूड प्रश्न लगेच समोर येतोच ना ? तसा मी विचारला, डोक्याला कितीही टपल्या मारल्या तरी ते सुधारत नाही. म्हणून मी विचारले , “माउली तुम्ही रोज भजनाला जातात का ?” हे विचारल्यावर त्यांचा नवरा म्हणाला,मग काय हो त्या तर आमच्या भजनातल्या मेन गायिका आहेत.” त्या एकदम लाजल्याच.नवऱ्याने परक्या बाईसमोर खुलेपणे कौतुक केले म्हटल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत राहावा असाच होता.त्या पहिली दुसरी शिकलेल्या होत्या पण वाचता येत होते.ओव्या, अभंग सहजपणे मुखात येत होत्या. तरीही माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह त्यांनी वाचले, माउली रोज म्हटले की येतं आपोआप” मी ही मान हलवली. कारण मला रोज म्हणणे आणि ऐकणे जमणार का ?याबद्दल शंका होती. बीड जिल्ह्यातल्या छोट्या गावातून मंडळी आली होती.त्यांच्या पाहुण्यांनी मागच्या वर्षी चहाची गाडी लावली होती.यावर्षी रसाचे गुऱ्हाळ आहे.सगळीकडे रस्त्याने मोठ्या आवाजात जाहिराती ऐकू येतात तरीही टाळ –चिपळ्याचा आवाज आपले लक्ष वेधून घेतो. त्यांच्या दृष्टीने तो देव नसतोच तर त्यांच्या अंगणात रोज येणारा त्यांचा सखा,मित्र असतो. त्यामुळे ते सगळेच त्याच्याशी शिळोप्याच्या गप्पा सहज मारू शकतात. मी मात्र फक्त अन फक्त त्यांच्याकडे कुतुहलाने बघू शकते.तेवढेच तर येत असते मला.

तरडगावी पोहचलो.गाव खूपच लहान होते. जवळजवळ सगळ्याच दिंड्या तिथे थांबल्या होत्या. माणसाला माणूस लागून चालत होता. आम्ही ज्या शाळेत उतरलो होतो तिथल्या फळ्यावर आमच्या स्वागतासाठी मुलांनी फुले काढली होती,शब्दांचे गुच्छ तर होतेच होते.पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा होत्या.नंतर थोड्यावेळाने शाळेतील मुलं आपल्या वर्गात कोण पाहुणे उतरले आहेत हे बघायला आली. त्यांनी आमच्याशी गप्पा मारल्या.सगळ्यांना माउली म्हणायची गंमत ते घेत होते आणि त्यांच्या लहानग्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होते.
तरड गाव स्वच्छ होते. सगळ्यांसाठी पाणी आणि मोबाईल toiletची सोय केलेली होती. रात्री कोणीही रस्त्यावर विधी साठी बसायचे नाही याच्या सूचना दिल्या जात होत्या.शक्यतो सगळ्यागोष्टीत नियोजन आणण्याचा प्रयत्न चालू होता. त्यामुळे दिंड्या ज्याठिकाणी उतरल्या होत्या तिथे मोबाईल toilet उभारली होती,पाण्याचे tanker होते. सांडपाणी झाडांना जाईल याची व्यवस्था काहीजण करत होते. कोणत्याही गावात गेल्यानंतर ही व्यवस्था पाहिली की मला हुश्श व्हायचे. चला आजचा दिवस पार पडणार. पण माझ्या बरोबरच्या माउली होत्या,त्यांनी मला पुरते वठणीवर आणायचे असंच ठरवत असायच्या.इथे बरोबर नाही तिकडे जाऊ करत खूप तंगडायला लावायच्या.रोज दुसरीच कोणीतरी माउली माझ्या पाळतीवर असायची.मला या सगळ्याची गंमत वाटत होती.मला काही कळत नाही हे त्यांनी परस्पर ठरवून टाकले होते, त्यामुळे माझी जबाबदारी त्यांनी घेतली होती.मी ही मनात म्हणत होते ,”लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा” त्यादिवशी कोणाचेच फोन लागत नव्हते.नेटवर्क जाम झाले होते.प्रत्येकजण फोन घेवून एकमेकांना विचारत होता.शेवटी सगळ्यांनी पांडूरंगावर सगळे सोपवले आणि पुढील कार्यक्रमाला लागले. इथे कोणासाठी काही थांबत नाही याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतो.
मी त्या दिवशी टाळ हातात घेवून बघितले.तसा माझा आणि सुराचा काही संबध नाही पण प्रयत्न करायला हरकत नाही. एका माउलीच्या लक्षात आले, तिने मला टाळ कसे धरायचे हे दाखवून कुठे ठोका मारायचा हे समजून दिले.सतत मोकळ्या हाताने फिरायची सवय असल्याने मला टाळ हातात नकोसे झाले.मी थोड्यावेळ वाजवले आणि परत केले.
रात्री अगदी दाराच्याजवळ मी पथारी टाकली. लाईट कधी आणि कोणी बंद केला हे कळले नाही.सकाळी आवरून पुढे पाउले पडायला लागली.फलटणच्या रस्त्यावर आम्ही चालत होतो. तिथल्या कृषी संशोधन केंद्राबद्दल खूप ऐकून होते. तिथल्या रस्त्यावरच्या बोर्डावर बऱ्याच गोष्टी वाचायला मिळाल्या. तिथली नवीन प्रयोग करणारी मराठी शाळा ,तिथली मॅक्सीन (बर्नसन )मावशी तिचे मराठी प्रेम हे सगळेच आठवले.मी जेव्हा तिला भेटले होते तेव्हा मी काही गोष्टी इंग्लिश मध्ये त्यांना सांगायला गेले तेव्हा त्या म्हणाल्या , अग मराठीत बोल कळते मला. माझ्या रंगावर जाऊ नको.” मराठीचे इतके प्रेम आहे तिला की त्यासाठी कार्यशाळा घेत असे.
फलटणच्या कॉलेजात आम्ही राहिलो. तिथून आम्ही संध्याकाळच्या आरतीला गेलो.पालखी जिथे उतरणार असते तिथे महिला फुगडी खेळतात, गाठोडे करतात , फेर धरून नाचतात. फार मजा येते. आमच्या समोर एका ८० वर्षाच्या माउलीने गाठोडे केले आणि त्या इतक्या भावूक होऊन गात होत्या की विचारू नका. त्यांचा तो उत्साह आम्हांला अधिक खेळण्यास प्रेरणा देत असला तरी आम्हांला त्यांची काळजीही वाटत होती.
या आरतीच्या वेळी हरवलेली माणसे, वस्तू याविषयी माहिती दिली जाते. एवढा मोठा जनसागर असतो पण चोपदाराने काठी वर केल्याबरोबर तिथे शांतता पसरते. शिस्तीचे अनोखे दर्शन आपल्याला होत असते.मुळात एवढी अनोळखी माणसे आजूबाजूला असुनही आपल्याला भीती वाटत नाही. मी फक्त हसत होते.खेळत होते, नाचत होते बस.
दुसऱ्या दिवशी फलटणचे प्रसिद्ध राममंदिर पाहिले. त्यामंदिराची रचना लाकडाची असून त्याची सुंदरता डोळ्यात भरते. जवळच तिथला राजवाडा आहे. यावेळी आम्ही माउलीच्या पालखीसोबत चालायचे ठरवले.त्यानिमित्ताने वारकरी कोणती भजने म्हणतात, एकमेकांच्या साथीने कसे गातात हे बघायला मिळाले. यावेळी या दिंडीत स्त्रिया सुद्धा रांगेत उभ्या राहून भजन म्हणत होत्या.अनेकजण अनेक वर्षांपासून येत आहेत.
आम्ही पहाटे जेव्हा पालखीच्या ठिकाणी काय कार्यक्रम होतात ते बघायला गेलो.तेव्हा असे वाटले की ,ही माणसे झोपलीच नाहीत की काय ? कारण प्रत्येकजण आवरून ओळीत बसले होते.सकाळचे अभंग म्हणत होते.पालखीच्या मागे जे वारकरी टाळ वाजवत असत ते सगळे गोल उभे होते. त्यांच्या सुरात सूर मिसळून बाकी सगळेजण गात होते. ते सगळे संपले आणि आरती झाली.त्यावेळी जे खाली बसले नाही त्यांना शिक्षा म्हणून उठबशा काढायला सांगत होते.कारण बसल्यावर सगळ्यांना पुढे काय चालू आहे हे दिसत असे पण लोक जर असे मध्ये उभे राहिले तर गोंधळ होईल आणि शिस्त मोडेन.सगळ्यांना मुठ मुठ मुरमुरे प्रसाद म्हणून मिळाले.पालखीच्या मागे कोण कुठे उभे राहील यालाही एक शिस्त होती.पालखीच्या पुढे तुलस डोक्यावर घेतलेल्या स्त्रिया, वीणा घेतलेले वारकरी,नंतर पालखी आणि मग टाळ वाजवणारे वारकरी.माझ्या सांगण्यात ,लिहण्यात चूक असू शकते.
रस्त्याने खूपसारी दुकाने होती.त्यात एक मुख्य दुकान असायचे ते इस्त्रीवाला आणि मोबाईल चार्ज करून देणारा. android मोबाईल चार्ज करायचे वीस रुपये आणि साधा मोबाईलचे १० रुपये. मला हे दुकान बघून फार गंमत वाटली.तो माणूस मस्त घोंगडीवर पहुडला होता.त्याच्या उजव्या हाताला २०-२५ बटणाचा एक मोठा बोर्ड होता. त्याला वेगवेगळ्या पिना खोचलेल्या होत्या. ज्यांनी मोबाईल चार्ज करायला लावले होते ते तिथेच घोळका करून बसले होते. तोच पान सुपारी , तंबाखू विकत होता.
दोन हाताने दोन व्यवसाय,
म्हणूनच मी खातोय दुधावरची साय,
मला सांभाळीते पांडुरंग माय
अशा काही ओळी तो म्हणत होता. सगळ्यांचा रंग एक होत चालला होता.
Darshan Tonape, Drpriti Mangesh Kulkarni and 23 others
13 comments
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment