Tuesday, November 10, 2020

   #वारी 



नीरा नदीला भरपूर पाणी होते. तिथे माउलींचे स्नान होणार होते. माउलींचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. लोणंद गावी. तिथे मार्केट यार्डात आम्ही उतरणार होतो. पाउस नव्हताच. लोणंद गाव मोठे होते. आम्ही रेल्वे स्टेशन जवळच्या मार्केट यार्डात गेलो. तिथे भरपूर दिंड्या उतरल्या होत्या. कोणत्या बाजूला गेलो म्हणजे आपले ठिकाण सापडेल हे आम्हांला कळत नव्हते.मग एका सावलीच्या जागी आम्ही बसलो आणि जेवून घेतले. त्याच ठिकाणी लातूर आणि बार्शीचे दोघे –तिघेजण बसले होते. मग गप्पा सुरु झाल्या. शेती,राजकारण, मुलांची लग्न.प्रत्येकजण आपापल्या परीने त्यावर उत्तरे शोधत होता. मार्ग काढत होता.पण निराशा, कंटाळा नव्हता.कुठे –कुठे पाउस पडला, पिकांचे कोणते बेणं वापरतात यावरच्या गोष्टीत मला फार रुची वाटत होती.ते संप्रदायातील भजनं नेहमी म्हणत.आमच्या दिंडीतील माणसे इकडून तिकडे जात होती. ज्या बाजूची माणसे परत आली नाही, त्या दिशेने आपण जाऊ या. असं आम्ही ठरवलं होतं. त्यामुळे आम्हांला आमचं ठिकाण सापडले. ती एक मोठी चाळ होती.चाळीच्या मालकाने झाडून ठेवली होती. आम्ही परत ज्याला लागेल तसं झाडून घेतले. आमची घोंगडी टाकून बसलो. मग कपडे वाळत घातले. नंतर चहा झाला. याच ठिकाणी वासुदेव आणि कडक लक्ष्मी असणाऱ्या लोकांची दिंडी उतरली होती. त्यांचे काही कार्यक्रम चालू होते. ते मी बघायला गेले. आमच्या दिंडीतील माउलींची ओळख होती. त्याही त्यांच्या बरोबर वासुदेंवाची गाणी म्हणत होत्या.नाचत होत्या. आम्ही नवशिक्षितांनी त्याच्या बरोबर पाय हलवले. नंतर आम्हांला फारच उत्साह आला.भरपूर नाचलो. मग हरिपाठासाठी मुक्कामाच्या जागी आलो.

लोणंदला आम्ही डॉ. शिवदे यांच्याकडे आंघोळी साठी गेलो. ते त्यांच्या छोट्या गावात रुग्णसेवेचे काम करतात. त्यांचे संपूर्ण कुटुंबच आम्हांला भेटले. प्रत्येकाचे काही ना काही वैशिष्ट होते, त्यानुसार सगळेचजण काम करत होते. त्यांनी मला हिरव्या चाफ्याच्या बिया दिल्या. बघा वारीत आपल्याला हवं ते मिळतं फक्त इच्छा चांगली पाहिजे. आम्ही मुक्कामाच्या जागी आलो तेव्हा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तीन लहान मुलं भजन म्हणण्यासाठी आली होती. अनेक वर्षे ही मुले येत आहेत. त्यांनी सगळ्यांना डोलायला आणि टाळ्या वाजवायला लावले. नंतर जेवण करून आम्ही तरडगावी जाण्यास निघालो. ते गाव जवळ होते आणि गावाच्या रस्त्यावर उभे रिंगण होते. त्यामुळे माउलींच्या पालखीसोबत आम्ही जायचे ठरवले.मध्ये मध्ये पाउस होता.आम्ही दिंडीचे नंबर रस्त्यावर उभे राहून पाहत होतो. सगळेजण शिस्त पाळत होते. प्रत्येकजण चार-पाचची रांग करून चालत होते. आम्ही आमच्या दिंडीत शिरलो.भजनांचा अवीट गोडवा होता. पालखी बरोबर झपाझप चालत होतो. रिंगणाची जागा आली, कितीतरी जण आधीच येवून बसले होते.दोन्ही बाजूला टाळकरी उभे राहिले.आम्ही त्यांच्या मागे उभे होतो. प्रत्येकाला माउलींचा घोडा काय करेल याची उत्सुकता होती.एक माउली पालखी रस्त्यावर रांगोळी काढत होती. खाली वाकून , इतकी पटपट त्या रांगोळी काढत होत्या,त्याचं मग्न होणं आम्ही बघत राहिलो.चोपदार त्याचा घोडा घेऊन परिस्थिती पाहून गेला आणि नंतर आला माउलींचा घोडा.वाऱ्याच्या वेगाने त्याने आपले मार्गक्रमण केले.आम्ही त्याचे येणेजाणे पाहत राहिलो. माउलींचा गजर आसमंतात झाला ,जणू सगळ्यांनी त्या घोड्यावर बसलेले ज्ञानेश्वर महाराज पाहिले.आणि आम्ही सगळेच धन्य झालो. याच साठी केला होता अट्टाहास.

No comments:

Post a Comment