Tuesday, November 10, 2020

 

शब्देविण संवादू – राणी दुर्वे

काही वर्षांपूर्वी राणी दुर्वे यांचे लेख लोकसत्ता मध्ये येत असत. मला वाटते ते ट्रेकिंगचा अनुभव सांगणारे लेख होते.पण ते लेख मला खूप आवडायचे.त्यांचे अजून काही लिखाण आहे का याचा मी शोध घेत होते.अर्थात तो शोध मला लगेच लागला नाही. खूप वर्षांनी त्यांचे हे पुस्तक सापडले.त्याच्या नावावरून त्यात काय लिहले असेल याची मला उत्सुकता होती.म्हणजे ओव्यांचा अर्थ वगैरे असे असावे.कोणत्याही गोष्टींचा एका मर्यादेत विचार करण्याची सवय वाईट आहे. ती कशी लागते हे आपल्याला लवकर कळत नाही.कारण बऱ्याच वेळा आपण प्रतिकावरून माणूस,विचार समजून घ्यायला बघतो.ते काहीवेळेस चुकीचे ठरू शकते नाही का?
हे पुस्तक आपल्याशी वेगवेगळ्या देशातील नऊ सिनेमांविषयी सांगते.त्या त्या देशातील दिग्दर्शकांनी समाजाचे प्रश्न मांडणारे चित्रपट तयार केले.हे सिनेमे एकमेकांपेक्षा जसे वेगळे आहेत,स्वतंत्र आहेत तसेच त्यांच्यात काही साम्यस्थळे सुद्धा आहेत.पहिले साम्य म्हणजे प्रवास,निरागसता,स्त्रियांच्या आयुष्यात येणारे पुरुष,त्या त्या देशातला समाज आणि त्यांचे समाजमूल्य,स्त्रियांची पुरुषांविषयी असणारी मते, सिनेमांमध्ये दिसणारा आशावाद.लेखिका हे सर्व आपल्याला नीट उलगडून सांगते,हे सांगतांना त्यात कुठेही रटाळता आली नाही.आपण उलट अधिक उत्सुकतेने पुढे वाचत जातो.
पुस्तकात पथेर पांचाली,ला स्ट्रडा ,मिराकॅल इन मिलान ,दी बायसिकल थीफ ,राशोमान,वाईल्ड स्ट्रोबेरीज (strawberries),दी सेव्हन्थ सील,नाईफ इन दी वाटर (water ),चारुलता या नऊ चित्रपटाबद्दल लेखिका आपल्याशी संवाद साधते. यातील सर्व चित्रपट मी पाहिलेले नाही. पण जे चित्रपट पाहिलेले आहेत ते त्यावेळी मला इतके कळले नाहीत किंवा त्याकडे इतक्या बारीक नजरेने मी पाहिले नाही हे मला समजले. एक एक फ्रेम ती आपल्याला उलगडून सांगते.तो चित्रपट आपण पुन्हा पाहत आहोत आणि त्यातल्या सगळ्या जागा नीट उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत हे ही आपल्याला कळते.चित्रपटाचा आस्वाद घेणे ही एक कला आहे.त्यातली प्रत्येक गोष्टीमागे काही विचार असतो हे सहज गंमत म्हणून चित्रपट पाहणाऱ्याच्या लक्षात येत नाही.ते इथे लेखिका लक्षात आणून देते.
समाजाचे चित्र चित्रपटात दिसते की जे चित्रपटात दिसते त्याचा परिणाम समाजावर होतो.याचीही चर्चा लेखिकेने केली आहे. “सर्वसाधारणपणे ‘सिनेमे’हे कमी अधिक प्रमाणात त्यावेळच्या समाज मानसिकतेचे प्रतिबिंब असते व त्याअर्थाने ते वास्तवच असतात.’ असे लेखिका इथे म्हणते.लेखिकेने वास्तववाद,नववास्तववाद आणि सिनेमा याविषयीही मुक्त विचार मांडले आहेत.तेही सर्व वाचण्यासारखे आहे.इथे लेखिका सिनेमा तयार करतांना ज्या काही गंमती झाल्या ते ही सांगते.ती म्हणते की सत्यजित राय यांनी पाथेर पांचाली चित्रपटात मिठाईवाल्याच्या भूमिकेसाठी एक मिठाईवाला हेरला होता.पण प्रत्यक्ष शॉटच्या वेळेस तो माणूस काही मिळेना.त्याचे नावही माहित नव्हते. तेव्हा त्यांनी त्या माणसाचे स्केच काढून गावकऱ्याना दाखवले.थोड्याच वेळात गावातल्या लोकांनी तो माणूस सत्यजित राय याच्यापुढे आणून दाखल केला आणि मग त्या चित्रपटाचे चित्रीकरण झाले.या छोट्या छोट्या प्रसंगामुळे आपल्याला कळते की या लोकांचे चित्रपट इतके आपल्या जवळचे का आहेत ते.त्यातली साधी माणसे आपल्या रोजच्या दुःखाची बोलीभाषा बोलतात.
लेखिकेने सर्वच चित्रपटांची आपली नव्याने गाठ घालून दिली आहे.ते सगळेच मुळातून वाचावे असे आहे.आता मी ते चित्रपट पुन्हा पाहून अधिक मजा घेण्याचे ठरवले आहे.
Image may contain: outdoor
Chaitali Ranbhor, Drpriti Mangesh Kulkarni and 9 others
6 comments
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment