Tuesday, November 10, 2020

   #वारी 


ज्ञानोबा माउली तुकाराम , तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माउली तुकाराम, असे भजन कानावर पडले आणि आम्ही त्या दिंडी बरोबर चालू लागलो. भजन म्हणत म्हणत आपण किती चाललो हे खरेच कळत नाही. आजूबाजूला चालणारी माणसे आपापल्या तालात आणि नादात चालत असतात. कोणीही कोणाच्याही सुरात सूर मिसळू शकत होता.आपण त्यांच्या बरोबर म्हणू लागलो आणि त्यांना ते कळले तर आपल्याकडे हसून बघत आणि परत म्हणायला सुरुवात करत. कधी भजन थांबले तर विचारत कुठले ?कुठून दिंडीत आले वगैरे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद , सुख आपल्या शरीरावर कधी पसरत जातो हे खरेच आपापल्याला कळत नाही.दोन तास सलग चालल्या नंतर आम्ही एका बस stop वर नाष्ट्या साठी थांबलो. तेव्हा दुरून बघतांना तर आमचंच आम्हांला आश्चर्य वाटत होते की , इतक्या लोकांमध्ये कोणताही धक्का न लागता आपण चालत होतो? त्यावेळी आम्हांला वसईच्या कोळीणी एकसारख्या साड्या नेसून जात असतांना दिसल्या. प्रत्येकीच्या केसात एक एक फुल होते.मस्त पैकी भजन करत त्या चालल्या होत्या. नंतर इस्कान टेम्पल च्या काही महिला एकसारख्या साड्या नेसून जात होत्या. सगळ्या वारकऱ्यांचा ड्रेस पांढरा पायजमा आणि कुडता आणि टोपी , हातात टाळ आणि मुखात संताचे अभंग.

खरंतर इतकी माणसे आणि त्यावर कोणत्याही मनुष्य प्राण्याचे नियंत्रण नाही तेव्हा गोंधळ, भांडणे,काही विकृत गोष्टी होणं हे अगदी आजच्या काळाचा विचार करता सहज आहे, ते घडणे वाईटच आहे.पण तिथे असं काही आढळलं नाही.कोणी तुम्हांला मुद्दाम धक्का देत आहे,हात लावत आहे. खरच असं काही झालं नाही.ही माणसं ही आपण नेहमी रहातो त्या समाजातूनच आली होती.पण ती पांडूरंगा शिवाय काहीच पहात नव्हती. मग तुम्हांला वाटेल की देवाला जात आहे म्हणजे वातावरण एकदम गंभीर असेल ,तर तसेही नाही. आनंदात हसून , एकमेकांच्या चुका पदरात घेऊन ते अभंग म्हणत. मस्त सूर लावत, लागला नाही तर मागचा सूर पकडून पुढे म्हणे.दुपारची माउलींची विश्रांती झाली की मग गवळणी सुरु होत. तेव्हा तर उत्साह ओसंडून जात असे. त्यांच्या डोक्यावरच्या पिशव्यांसह ते नाचत, गात.कमालीची उर्जा त्यांच्याकडे होती.हळूहळू ती आपल्यात कधी येत असे कळत नव्हते.पण खूप मजा आली.
आम्ही जेजुरीला १२.३० पर्यंत पोहचलो.जेजुरी एकदम स्वच्छ होते.आमच्या मुक्कामाकडे जात असतांनाच मोबाईल toilet दिसले.जवळच पाण्याचे tanckerउभे होते. स्वच्छतेसाठी दोन माणसं होती. हुश्श! झालं मला. आम्ही मुक्कामाच्या जागी गेलो तर कोणीच आलेले नव्हते. मग आम्ही जेजुरी सर करायचे ठरवले. मजेत गेलो.भंडारा सगळीकडे होता. आमच्या सारखे भरपूर उत्साही लोक होते. तिथेही नाच गाणे चालूच होते.पण हुल्लडबाजी नव्हती.आम्ही गडावर जात असतांना काही लोकांना विचारले, किती पायऱ्या आहेत हो? तर आम्हांला उत्तर मिळायचे नऊ लाख.फार मजा वाटायची हे उत्तर ऐकून. हजार सुद्धा पायऱ्या नाहीत एवढं मला माहित होतं.तर या नऊ लाख पायऱ्याचे उत्तर संध्याकाळी झालेल्या भारुडात मिळाले.नऊ लाख पायऱ्या ह्या नवविधा भक्तीच्या नऊ पायऱ्या आहेत.मला पूर्ण भारुड आठवत नाही.त्यातल्या काही ओळी
इच्छा मुळीच बोलू नका
पडाल नरकाच्या दारी
मल्हारीची वारी माझ्या
मल्हारीची वारी
बांध बुधली ज्ञान दिवटी
उजळल्या महाद्वारी
मल्हारीची वारी माझ्या
मल्हारीची वारी
सोन्याची जेजुरी
त्याची नवलाख पायरी.
हे एकनाथांचे भारुड आहे. आम्ही गडावर गेलो तेव्हाही लोक हे म्हणत होते. बाया बापे मस्त नाचत होते.प्रसाद मिळत होता, भंडारा लावत होते.आनंद आणि उत्साह याशिवाय मला तरी काही दिसत नव्हते.मला सारखं वाटत होतं मी आले खूप छान झाले , नाहीतर हा एवढा आनंद माझ्या वाटेला आलाच नसता. कोणी कोणाला काही देत नव्हते , कोणी कोणाकडे काही मागत नव्हते.पण हात टाळ्या वाजवत होते, पाय जागच्या जागी हलत होते, चेहऱ्यावर एक न संपणार स्मित होते. आम्ही खंडेरायाला भेटून दुसऱ्या बाजूने खाली उतरलो. तिथे एक दुकान होते, शाळेतील मुलगी बसली होती. तिला विचारले,अहिल्यादेवी विद्यामंदिर कुठे आहे ग?ती तिचीच शाळा होती. लगेच खाणाखुणा सांगून तिने रस्ता सांगितला.लहान मुलं वारकरी बघून समोर यायची आणि त्यांना ‘जय हरी म्हणायची. असं म्हणण्यात त्यांना गंमत वाटायची आणि ती त्यांच्या चेहऱ्यावर दिसायची.नवीन माणसाची आपण बोलतोय यातही त्यांना काही वेगळे वाटत असेल.आम्ही शाळेत पोहचलो तर आमच्या सहकारी माउली येत होत्या.आम्ही आमचा डबा खाल्ला .मग कपडे धुवायला पाणी आहे का? बघितले.ते मिळाले . लगेच कपडे धुवून टाकले.एवढं चालून आल्यावर आपण घरी काही करणार नाही,पण तिथे सगळेजण सगळी कामं करत होती.जोडीदार बरोबर आलेले पुरुष सुद्धा स्वतःचे कपडे स्वतः धूत होते.माझं आपलं एक निरीक्षण.
जेजुरीचा खंडोबाच्या अस्तित्वासहित जाणवणारा माहोल वेगळा वाटतो. खरतर तो असंख्य माणसे बरोबर असल्याने वाटत असणार. मी गडावरही जाऊन आले म्हणून माझ्या बरोबरीच्या माउलींनी कौतुक केले. खाऊ दिला.त्या गेली वीस वर्षे वारी करत होत्या.मला म्हणाल्या ‘ पाय दुखले नाही ना? मी नाही म्हटले. तर त्यांनी आनंदाने म्हटले , अग दुखणारच नाहीत. माउली काळजी घेतात आपली.’ मी ही हसून होकार दिला.मग अभंग, भारुडे यांच्या गप्पा झाल्या.कोण? किती मुलं? मिस्टर काय करतात? हे मी कोणाला विचारलं नाही आणि मलाही कोणी विचारलं नाही. सगळं महत्त्व फक्त आणि फक्त पांडुरंग भेटीचं. त्याच्याशी फक्त नातं, आणि ते ही माहेरचं. मग कशाला हव्यात बाकीच्या उपाध्या ?
Chaitali Ranbhor, Darshan Tonape and 43 others
26 comments
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment