Tuesday, November 10, 2020

 

वाचावं जनाचं लिहावं मनाचं

"दोला " हे गायत्री पगडी यांचं पुस्तक वाचून दोन चार वर्षे झाली असतील.काल परत ते समोर दिसलं आणि मी समोर येईल त्या पानापासून वाचायला सुरुवात केली.अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी परत परत कशाला वाचायला हव्यात?असं काहीजण मला म्हणत असतात.पण गायत्री ज्या धीराने आपल्या स्वतःच्या आणि नवऱ्याच्या आजाराकडे बघतात आणि त्यातून मार्ग काढतात. ते वाचणं,तो त्याच्याबरोबरचा प्रवास मला खूप काही देवून जातो.शिकवून जातो. ते पुस्तक आपलं कधी होवून जातं तेही कळत नाही.

लेखिका जेव्हा अल्ट्राडाइन ,भराभर बदलणारी बायपोलर डीसऑर्डर किंवा आत्यंतिक तीव्र डिप्रेशन म्हणजे औदासीन्य यांच्याशी झगडत होती, तेव्हाच म्हणजे १९९७ मध्ये पाठीच्या मणक्याला इजा होवून मानेपासून खालपर्यंत अर्धांगवायू झालेल्या ३२ वर्षाच्या पतीची काळजीही घेत होती.स्वतःला सांभाळत.इलाज करत आणि पतीची जगण्याची इच्छा,काही करण्याची इच्छा सतत जागी राहावी म्हणून सतत प्रयत्न करणारी लेखिका आपल्याला या पुस्तकात भेटते.
पण जेव्हा ती अशा प्रकारे मानसिक आजाराला तोंड देत होती तेव्हा समाजातले अनेक सुशिक्षित लोक तिला सर्रास वेडं म्हणत होते. त्यामुळे त्या लोकांना सुद्धा तिला तोंड द्यावं लागत होतं.तसेच काम करणे आणि घरातील इतर अनेक गोष्टी बघणे यासाठीही ती झटत होती.या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तिने काय काय केलं हे आपण वाचायलाच हवे असे आहे.
हा काळ तिच्यासाठी परीक्षेचा आणि संघर्षाचा होता.ती म्हणते, 'तोच काल आत्मविकास,स्वतःचे सामर्थ्य ओळखणे आणि येईल त्या आयुष्याला समोर जायला शिकवणाराही होता." यावेळी हॉलिवूडमधला प्रसिद्ध नट ख्रिस्तोफर रीव स्वतःच्या मणक्यांना इजा झालेल्या व्यक्तींसाठी काम करत होता.त्याने गायत्री आणि तिच्या पतीला आजाराशी लढण्याची स्फूर्ती दिली.ती म्हणते, " जो माणूस नत म्हणून केवळ एक पडद्यावरची प्रतिमा होता तो मी आणि माझा पती यांच्यासाठी कल्पनातीत आकृती झाला."
मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तींना आपण समजून घ्यायला हवं आणि आपण अशा आजारातून जात असू तर त्यावर मोकळेपणे बोलायला हवं. हेच खरं.
गायत्री या पुस्तकात अनेक गोष्टी आपल्याला सांगते. पण तिने एका ठिकाणी एका पत्रकाराचा अनुभव सांगितला आहे.जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह जवळ आला होता.म्हणून त्या पत्रकाराला काहीतरी कार्यक्रम करायचा होता.तेव्हा ती पत्रकार गायत्रीला म्हणाली, " आपल्याला डिप्रेशनबाबत काहीतरी करावे लागेल. तू बोलशील का? तुला माहीतच आहे की, आपण वेडे आहोत, आय मीन डिप्रेशनमध्ये आहोत असं स्वतः होऊन कबूल करणारे लोक कुठे शोधणार?" यावर गायत्री म्हणाली,
"ठीक आहे, मी बोलेन"
"तू मुलाखत घेईपर्यत तशीच असशील ना?म्हणजे डिप्रेशनमध्ये असशील ना? तू त्यातून बाहेर पडणार नाहीस ना?कारण आपल्याला अगदी ताजा अनुभव हवा आहे."
हे असं सगळं वाचत असतांना आपण सुन्न होवून जातो.आपण माणूस असतो का?नक्की कोण असतो आपण अशावेळी माहित नाही.या पुस्तकात लेखिकेने काही वेगळे अनुभव मांडले आहेत. ज्यावर आपण सहसा विश्वास ठेवत नाही.ती ही त्याचे सार्वत्रिकीकरण करत नाही.पण ते तिचे अनुभव आहेत.पण ती ज्या धीराने स्वतःवर उपचार करून घेते ते मुळातूनच वाचण्यासारखं आहे.
या पुस्तकाचा अनुवाद डॉ. ऋचा कांबळे यांनी इतका छान केला आहे की,आपण त्यांच्या शब्दांबरोबर सहज पुढे जातो.
Image may contain: 1 person
Drpriti Mangesh Kulkarni, Varsha Thote and 21 others
7 comments
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment