Tuesday, November 10, 2020

 वाचावं जनाचं लिहावं मनाचं 


तो असतांना,तो नसतांना -

जोडीदार गेल्यानंतर माझं कसं होणार? हा प्रश्न प्रत्येकीच्या मनात कमीअधिक फरकाने असतोच. कोणी त्या त्या वेळी बोलून दाखवतात तर कोणी शांत राहून आलेल्या परिस्थितीला तोंड देत राहतात. पण आपला जोडीदार आपल्याबरोबर नाही हे सत्य स्त्रिया कसं स्विकारतात,त्यातून कशा सावरतात ?आपल्या मनातल्या भीतीवर कशी मात करतात हे समजून घेण्याच्या इच्छेपायी वसंत कन्नाबिरन यांना हे पुस्तक लिहावे वाटले.
लग्न आणि कायमचा वियोग यापुरतीच या पुस्तकाची चौकट आहे.लेखिका म्हणते की, तिला तिच्या मनात चाललेल्या संघर्षाचे,विसंगतीचे खंडण करण्याची इच्छा होती.विवाह संस्थेमुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्याला आणि विकासाला खोडा बसतो, ती खुंटते अशी लेखिकेची धारणा होती.पं मग या धारणेला छेद देणारी, ‘ घर आणि त्यातल्या उबेपलीकडचे अनेक आयाम दाखवणारीही नवरा-बायकोची नाती असतात, ती स्त्रियांना बांधून घालत नाहीत,’ अशी उदाहरणे सुद्धा तिच्या समोर होती.अशा स्त्रिया लेखिकेने शोधल्या आणि त्यांच्याशी बोलून तिने हे पुस्तक लिहले.
पारंपारिक, आणि सांस्कृतिक चौकटीमुळे विधवेला दाहक अनुभव सोसावे लागतात. तरीही स्त्रिया त्यातून उभ्या राहतात ,संसार सांभाळतात,सैलावतात, खुलतात.याचे आश्चर्य लेखिकेला वाटते. म्हणून तिने असे विशिष्ट मुद्दे लक्षात घेवून मुलाखती घेतल्या. निवडलेल्या स्त्रिया नावाजलेल्या आहेत, लौकिक अर्थाने पूर्णपणे वेगळे आयुष्य जगल्या आहेत. त्यांनी दुःखाला,आयुष्यातल्या चढउतारांना भिडण्याचे बळ कसे मिळवले,हे जाणून घेण्यात लेखिकेला रस होता.
या पुस्तकात बाराजणीच्या मुलाखती लेखिकेने घेतल्या आहेत. के.शारदामणी,नीरा देसाई,रामेश्वरी वर्मा,कॅथी श्रीधर,कोयली रॉय,इला भट,सुतपा चक्रवर्ती,शांत रामेश्वर राव, मीनाक्षी मुखर्जी,,अब्ब्युरी छाया देवी, रुक्मिणी पार्थसारथी,जयलक्ष्मी नारायण या सर्व जणींशी लेखिकेने संवाद साधला.यातल्या तिघीजणी नामवंत लेखिका आहेत. दुसऱ्या तिघी स्त्री-विषयक प्रश्नांच्या अभ्यासक आहेत, तर मानवी हक्कांच्या आणि विकासाच्या प्रश्नामध्ये काम करणाऱ्या तिघी आहेत. एकजण यात गृहिणी आहे, तिच्या निर्णयस्वातंत्र्याची ताकद पाहून लेखिका तिचे कौतुक करते. कारण एकेकाळच्या बुजऱ्या गृहिणीमध्ये एक कर्तबगार बाई होती,ती लग्नाच्या तकलादू आवरणाखाली झाकली गेली होती.तिचं स्वत्व सुरक्षित होतं.नवरा गेल्यानंतर तिच्यात खूप बदल झाला,त्या बदलाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न लेखिका करते. हा संवाद मुळातूनच वाचायला हवा. असाच आहे.
मला हे पुस्तक वाचतांना अनेक प्रश्न पडत होते.माझ्याजवळच्या मैत्रिणी नवरा गेल्यानंतर हतबल झालेल्या मी पाहिल्या आहेत.काहीजणी तर आपल्या दुःखातून बाहेर येवू शकत नाही.कधीतरी कोणाला मृत्यू येईल याचीच त्यांनी अपेक्षा केली नव्हती.किंवा त्या सत्याला कसे सामोरे जावू याचाही विचार त्यांचा मनाला शिवला नव्हता.आतल्या आत कोंडून घेत त्या उदासीकडे जातांना मी पाहत आहे. अशावेळी या पुस्तकातल्या स्त्रियांनी परिस्थितीला कसे तोंड दिले, त्यांच्या मित्र मैत्रिणींनी त्यांना कशी साथ दिली.हे उपयोगी पडणारे आहे असे मला वाटते.कोणाचाही मृत्यू दुःख देतोच,पण काहीवेळेस काळ त्याच्यावर उतारा ठरू शकतो.आपले काम शोधून ते करत राहावे असेही या स्त्रिया सांगत आहे.सगळ्यांनीच वाचावे असे हे पुस्तक आहे असे मला वाटते.
वसंत कन्नाबिरन यांच्या पुस्तकाचा अनुवाद सुजाता देशमुख यांनी केला आहे. अनुवाद सहज सुंदर झाला आहे..तरीही पुस्तक पूर्ण झाल्यावर वाटतं की स्त्री जोडीदाराचे म्हणणे कळले तसे पुरुषांचे कळले असते तर ? पुस्तक पूर्ण वाचावे असेच आहे.
No photo description available.
Chaitali Ranbhor, Vandana Khare and 48 others
21 comments
2 shares
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment