Tuesday, November 10, 2020

 

Woods are lovely dark and deep

But I have promises to keep

And miles to go before I sleep

And miles to go before I sleep

रॉबर्ट फ्रॉस्टच्या या जगप्रसिद्ध ओळी आहेत. त्याचे नाव निघाले की सगळ्यांना या ओळी आठवतात. मी कॉलेजमध्ये शिकत असतांना हा कवी आम्हांला अभ्यासाला होता. तरीही आम्ही त्याच्या सगळ्या कवितांमधून एवढ्याच ओळी शोधून लिहायचो.मग आम्हांला आमचे शिक्षक ओरडायचे की अरे तुम्ही त्याचा अभ्यास करत आहात, त्याने एवढ्याच ओळी लिहल्या का ?निदान तुम्ही तरी तो इतरठिकाणी काय म्हणत आहे ते लिहा.हे सगळे आठवायचे कारण म्हणजे विजय पाडळकर यांचे “ कवितेच्या शोधात रॉबर्ट फ्रॉस्ट – जीवन आणि काव्य” हे पुस्तक होय.
रॉबर्ट फ्रॉस्ट यांचे काव्य वाचत असतांना जे प्रश्न आमच्या मनी येत त्याची सगळी उत्तरे मला इतक्या वर्षानंतर मिळाली असे वाटते. यात आमच्या शिक्षकांचा दोष नाही तर आमचाच आहे, आम्हांला त्याच्याबद्दल एवढे प्रश्न पडले नाहीत.या कवीने चरितार्थ चालविण्यासाठी शेतीपासून ते शिक्षकापर्यंत अनेक गोष्टी केल्या. असे म्हणतात की त्यांची शिकवण्याची पद्धत अतिशय वेगळी होती,त्यामुळेच त्यांना शिक्षणतज्ञ असा लौकिक मिळाला. पण हे करत असतांना सुद्धा त्यांची कविता मागे पडली नाही. ती मनात कायमच तरंगत राहिली. त्यावेळी त्यांनी सूक्ष्म निरीक्षणे केली, आणि त्यांच्या कल्पकतेतून त्यांना कवितेची वेगळी वाट सापडली.त्यांच्या कवितेने अनेक थोरा मोठ्यांना वेड लावले.त्यांनी त्यांचा सन्मान केला.
पण हे सगळं कवीने साधलं कसं याचा अभ्यास विजय पाडळकर यांनी केला. त्यामुळे आपल्याला कविता समजून घेणे सोप्पे झाले असे मला वाटते.कारण पाडळकरांनी पुस्तकात मूळ कविता दिली आहे आणि त्यानंतर कवितेचा अर्थ दिला आहे. त्यावर त्यांचे भाष्यसुद्धा आहे.त्यामुळे आपल्याला रॉबर्ट फ्रॉस्ट या कवीचे चरित्र सुद्धा कळते.त्याचे आयुष्य अनेक घटनांनी भरलेलं होतं. त्याच्या व्यक्तिमत्वाला अनेक पदर होते.त्याचे त्याच्या पत्नीवर आणि मुलांवर उत्कट प्रेम होते. त्याला अनेक सांसरिक दुःखांना सामोरे जावे लागले. त्यामुळे त्याचे कामाचे नियोजन बिघडून जात असे. पण तरीही त्याच्या मनातली कविता मेली नाही. म्हणूनच जेव्हा तो त्याच्या कवितेतून असे म्हणतो “ या जगात ज्ञान मिळवायचं असेल, तर आधी त्यासाठी कष्ट करणे ही पूर्वअट आहे. कष्टांतूनच पुननिर्मिती होते .” तेव्हा तो आपल्याला अधिकाधिक कळत जातो. त्याच्या अनेक कवितांमधून “निर्मितीप्रक्रियेचा ‘ शोध घेण्याचा प्रयत्न दिसतो. कवितेचा जुना फॉर्म मोडणे आणि ती नव्या आकारात मांडणे हे त्याचे महत्वाचे सूत्र आहे.
या पुस्तकात आपण कवितेबरोबरच कवीचे आईवडील , त्याचे बालपण , त्याची भावंडे,शिक्षण, व्यवसाय, पत्नी, मुलं, संसार, आणि त्याची आर्थिक स्थिती या सगळ्याविषयी वाचतो.त्याने आपल्या कवितेसाठी विषय कुठून आणि कसे मिळवले. त्याचा संसार कसा झाला. त्याच्या कवितेची कोणती वैशिष्ट्ये वाचकांच्या मनात येतात. या सगळ्या गोष्टींबद्दल आपण या पुस्तकात वाचतो. एखाद्या कवीची कविता आणि त्याचे काव्य यांच्यातील नातं शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकात लेखकाने केला आहे.ते किती अवघड काम आहे हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला कळतं.पण हे पुस्तक वाचलं की विलक्षण प्रतिभेचा कवी रॉबर्ट फ्रॉस्ट बद्दल, त्याच्या साहित्याबद्दल आपल्याला अधिक समजून घेता येतं. कारण एकतर तो परकीय कवी, त्याची भाषाही आपल्याला इतकी सवयीची नाही. त्यामुळे या पुस्तकाने त्याच्याकडे जाण्याचा एक मार्ग मोकळा करून दिला असेच मला वाटले. मी तर हे पुस्तक वाचले आणि माझ्या शिक्षकांची माफी मागितली कारण त्यांना काय म्हणायचे होते ते मला त्यावेळी कळले नव्हते ते आताशी कळू लागले आहे. त्या शिक्षकांना आठवत परत माझ्या मनात रॉबर्टच्या ओळी गुणगुणेल हे नक्की.
No photo description available.
Drpriti Mangesh Kulkarni, Dhanashri Bhate and 13 others
7 comments
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment