Tuesday, November 10, 2020

 #वारी 


धर्मपुरीच्या मुक्कामात अनेक गंमतीजंमती करत आम्ही नातेपुत्याला निघालो. मला उगीचच वाटत असेल की आता सगळ्यांचे पाय अधिरतेने पंढरपूर कडे धावत आहेत. सतत कोणाचे काय चालले आहे किंवा इथे काय जे चालू असते ते आपल्याला नीट समजायला हवे या विचारानेही मला अधिरता जाणवत असावी. खरंतर दिवसाच्या कोणत्याही प्रहरी भजन आणि टाळ मृदुंगाचा आवाज कानावर पडत असे.त्यामुळे सतत आपण जागे आहोत ही भावना मनात घर करून राहिली होती. हे जागेपण दोन्ही प्रकारे असेल अशी समजून करून घ्यायला हरकत नाही.पण ते स्वतःच तपासून बघणे अवघडच आहे.

रस्त्यात जालन्याहून आलेली मंडळी भेटली. ते जनीचा अभंग गात होते.आपल्या हातातल्या पिशव्या डोक्यावर स्थिर ठेवून ह्या सगळ्याजणी दोन्ही हात वर करून कशा नाचत होत्या. हे मला पडलेले कोडे होते. त्यांच्या अभंगाची शेवटची ओळ झाली आणि मी म्हटलं ,मला पहिल्यापासून हा अभंग ऐकायचा आहे. लगेच सूर दिला गेला, टाळ ठेका द्यायला लागले आणि माउली गायला लागल्या.
धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर
हृदय बंदिखाना केला आत विठ्ठल कोंडीला
शब्दे केली जडाजुडी विठ्ठल पायी घातली बेडी
शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला
जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी रे तुला
अहाहा, काय जोर आहे जनीच्या शब्दात आणि गाणारीच्या गळ्यात सुद्धा.जनाबाई चक्क देवाला दम देतात, त्याला कोंडून ठेवण्याची त्यांना भीती वाटत नाही. एक समान नाते त्या प्रस्थापित करतात. तिचे शब्द ऐकतांना किती साधे वाटतात,पण ते ज्या भावना आपल्या पर्यंत पोहचवतात त्या मात्र दमदार आहेत.मला जनी अगदीच आवडली. घरी गेले की संपूर्ण जनाबाई वाचून तरी काढेन असं मी स्वतःशी म्हटलं. आणि माउलींनी मलाच सूर द्यायला सांगितलं.कसं शक्य आहे हे ? माझा सूर मनातच लागलेला बरा.पाण्यातला आणि गाण्यातला सूर मला अजून सापडला नाही.
नातेपुते या गावातले लोक सांगत होते की , या गावात कोणतीही यात्रा नसते. दरवर्षी येणारी वारी म्हणजेच त्यांच्यासाठी एक उत्सव असतो.गावात पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या.बरीचशी दुकाने बंद होती. रस्त्यावर वारकऱ्यांच्या सोयीसाठी पाण्याची सोय केलेली होती. छोटंसं गाव आहे .नुकताच पाऊस पडून गेला होता , त्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण होते. त्यादिवशी नातेपुत्यात मुक्काम होता.आमच्या दिंडीतील “माईंनी” एक भारुड सादर केले. भारुड ही अशी गोष्ट आहे की तुम्ही नकळत त्यात सामील होतात. हसत हसत एखाद्याला त्याची चूक सांगण्यासाठी भारुडाचा खूप उपयोग होत असावा.एकनाथांना हे कसं सुचले असेल , तो फॉर्म सापडणे आणि त्याचा या पद्धतीने उपयोग करणे ? किती अफलातून आहे ना ? आजही इतक्या काळानंतर कोणी कोणाला शिकवायला न जाता भारुडाचा उपयोग सहजपणे होतो.अशा अक्षर साहित्याकडे बघण्याची आपली दृष्टी अधिक व्यापक होते. असे मला जाणवले. सामन्यातला सामान्य माणूस या भारूडांचा सहज उपयोग करतो हे आम्ही पुढे अनुभवले.खरंतर हे सगळे लिखाण मी गुंडाळण्याचा विचार करत होते.पण ते मला जमतच नाही. बघूया पुढचे मला लिहायला जमते की नाही.

No comments:

Post a Comment