Thursday, December 10, 2020

 

जुन्या सोन आठवणी –

कवडसे ५ ऑगस्ट २००६

नगर लोकसत्ता

 १)डायरी

 डायरीतील काही पाने ...... 

  रोज संध्याकाळी मी ढगाकडे बघून म्हणायचे- ‘अरे बाबा, किती वाट पाहायला लावतोस? ये न एकदा, दे न भरभरून. तुझा तो वेड लावणारा मृद्गंध येऊ दे, अंगप्रत्यंगात मिसळू दे... जणू माझं त्याला भेटण्याचं वेड त्याला समजलं आणि तो आला. अगदी हळूहळू आणि नंतर सगळीकडेच भरून गेला. मृद्गंध लुटून झाला, पानांना लकाकी आली. रस्ते, नाले भरून गेले, तरीही थांबायचं तो नाव घेईना. येतच राहिला. मग मी त्याला म्हटलं, ‘ ए थांब ना, मला थोडं फिरून येऊ दे, तू पसरवलेलं सौदर्य डोळ्यात साठवू दे’. पण तो ऐकेना.मग त्याला अंगावर घेत मी चालू लागले. आता मला पावसाळा काही सांगायचं नसतं, काही मागायचंही नसतं.

  पावसाची आपण आत पाहतो,पण तो आला की मग मिटून का ठेवतो स्वतःला?

  ***

 सोसाट्याचा वारा वाहत होता. वाऱ्याबरोबर पानंही वेगानं पळत होती. अंधारून आलं होतं. आतल्या आत मिटून घ्यावं असं वाटत होतं. अंगाला गारवा जाणवत होता. हवाहवासा वाटणारा गारवा शब्दांना मात्र नाकारत होता. काय करावं ते कळत नव्हतं. तेवढ्यात कुठून तरी बेगम अख्तरचे सूर कानी आले. तिचा दुःखभरला आवाज माझाच होता का? आता हे तपासतच बसावं लागणार.....

आज तू आलास. अगदी नकळत.मला चाहूल लागू न देता यायचा तुझा विचार होता.पण ती कशी अशक्य गोष्ट आहे हे तुला चांगलंच माहित आहे. तू यायच्या आधी येणारा गारवा मनाला मोहित करतो आणि मन मग वाऱ्यावर भिरभिरत राहतं. पावलं जागीच नाचायला लागतात. कोणी काय म्हणेल याची चिंता कशाला? मीही आज तसंच केलं. डोळे मिटले आणि हात पसरून तुला पार आतपर्यंत नेलं.परत कधीही तू बाहेर येवू नयेस म्हणून भरपूर काळजी घेणार असं म्हणतेय,पण ते खूप अवघड आहे. माझी मीच कोरडी होत जाते आणि तू दिलेला ओलावा कसा संपतो कळतच नाही.  

 झाडाची पिवळी झालेली पानं सहज गळून पडतात. त्यांच्या वागण्यात किती सहजता असते. जीवनचा स्वीकार ते किती सहजपणे करतात. आपणही तसं वागायला हवं. झाडांकडूनच काय, निसर्गाच्या प्रत्येक घटकाकडून घेता येईल तितके गुण घ्यायला हवेत. पान पिवळं झालं म्हणजे गळणारच हे माणसांच्या बाबतीत स्वीकारता येईल? काही माणसं तर पिवळेपणात नाही तर हिरवाईतच गळतात. अशा वेळी सहजता कोठून आणायची? आणि ही गलती कशी थांबवायची?

**

आठवणी आपल्याभोवती फेर धरून नाचू लागल्या की सारखं म्हणावसं वाटतं – ‘ चला,पुढे चला. असं कोठपर्यंत त्यांना रोखून धरायचं? पण तसं नाही केलं, तर वर्तमानात त्या मला डोकावूसुद्धा देणार नाहीत. त्यांच्यासाठी कितीवेळा मी दुःखी व्हायचं कळतच नाही. काय हवं असतं त्यांना?आठवणी एका कोपऱ्यात बसून राहतील का? त्यांच्यासाठी सुरेखशी पेटी तयार करू?

 माझी स्वप्नांची ओंजळ रीतीच होत नाही. काय करू? कितीतरी वेळा मी एक एक स्वप्न बाजूला करून रिकामं करण्याचा प्रयत्न करते.पण काहीच उपयोग होत नाही. मी स्वप्नवेडी कधी झाले? की आधीपासूनच होते? ओंजळीतल्या स्वप्नांना जागं करत त्यांना वास्तव दाखवते.पण ती इतकी लबाड असतात की पुढचा रस्ता दाखवतात. मग मी तरी काय करणार?जाते त्या रस्त्याने. वाटते आता सापडेल परीस. सगळ्या वस्तू सोन्याच्या करायच्या आहेत मला.माणसातल्या माणूसपणाचं सोनं!

**

 स्प्व्नं अशी पाठीमागे लागतात. पाठलाग करतात. तेव्हा कुठे लपून बसावं कळत नाही.भान विसरून त्यांना ओंजळीत घ्यावं म्हणते,पण दारावरची नक्षीदार चौकट ते करू देत नाही. वाटतं रोज रोज या स्वप्नांचा चुराडा झाल्यानंतर तरी ते हवं तसं जगू देतील? झोपेत पडलेली स्वप्नं विसरता येतात,पण जागेपणी दिसणाऱ्या स्वप्नांचं काय? त्यांना मागे-मागे ओढून बंद करतांना दमायला होतं, थकायला होतं. कधी ती स्वप्नं वस्तुस्थितीची जाणीव करून देतात, पंखातील अपुरं बळ दाखवतात. फार स्वप्न पाहणारी माणसं वेडी होतात का?

**

लिहू म्हटलं तरी काही गोष्टी नाहीच लिहिता येत. बऱ्याच वेळा हातून निसटूनच जातं वाळूसारखं. असं का व्हावं? काल  आमच्या अंगणातल्या वठलेल्या झाडाला बारीक हिरवा लोंब फुटला. मला आश्चर्य वाटलं अन खूप आनंदही झाला.त्या झाडाला तर किती छान वाटलं असेल! त्या कोंबाला पाहून माझ्यातूनही शब्द झरू लागले.

 


No comments:

Post a Comment