Friday, December 18, 2020

 

दिवस उगवतांना – लोकसत्ता १६ सप्टेंबर २००६

  जाग आली तेव्हा टेबलावरचं घड्याळ बंद पडलेलं दिसलं. घड्याळाचं बरं असतं, मनात आलं की थांबायचं,पुढेही जायचं नाही आणि मागेही. मग कोणाची कितीही फजिती होवो. ते आपलं मनासारखंच वागणार! बाहेर अंगणात पक्ष्यांचा आवाज येत होता. म्हणजे नक्कीच पहाट झाली असणार. पहाटेचा नाद मनामध्ये हळूवार येतो आणि जग येते. बाहेरची हिरवी झाडं मूक नादानं जणू आपल्याला बोलावत असतात. घरात कोचीही जग नाही, म्हणून आवाज न करता पायऱ्या उतरून अंगणात आले. आजूबाजूला दिवस उजाडत असल्याच्या अस्पष्ट खुणा दिसत होत्या. रात्री पावसाची सर येऊन गेली असणार. पाण्याचे थेंब झाडांच्या पानांवर अजून झुलत आहेत. समोरच्या फाटकाच्या कमानीवर जाईचा वेळ विसावलेला. त्यावरच्या कळ्या उमलू पाहत आहेत. निरव शांततेत माझा पायरव पक्ष्यांना कळला असावा. अंगणात सकाळच्या वेळी पाणी पिणाऱ्या भारद्वाजाने मान कलती करून पाहिलं. मिटल्या चोचीने आवाज करत परत तो आपल्या कामात गर्क झाला. त्याचा जोडीदारही लगेच आला.

 हळूहळू सगळेच उठू लागले. साळुंक्या,बगळे, लहानखुरे शिंपी, धोबी,कोकिला यांचा एकत्रित आवाज यायला लागला. पहाटेच्या वेळी त्यांचा हा लहानसा आवाज शांततेचा भंग न करता येत राहतो. मीही माझ्या पावलांचा आवाज होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत होते. पण वाळलेली पानं, काटक्यांवरून चालतांना आवाज होतोच.पण त्याची सवय पाखरांना झाली असावी. रात्रीतून लिंबाऱ्याने बरीच पानं खाली आणून टाकलेली होती. हा सोन्याचा पाला खराट्याने एकसारखा ढकलून एका ठिकाणी गोळा करतांना फार मजा येते. अंगणभर साचलेले हे पिवळ्या पानांचे छोटे छोटे ढीग सकाळचं सौंदर्य अधिकच खुलवतात. या कचऱ्यातच कधी कधी झाडावरून पडलेलं बगळ्याचं पिल्लू दिसतं. मग एकदम उदास वाटू लागतं. त्याची आई मात्र इतर पिल्लांची काळजी घेण्यात गढलेली असते. Life is beautiful…

मग मीही फुलझाडांच्या आल्यात पाणी सोडू लागते.जमीन ओली होतांना एक मंद सुवास येतो आणि सुगंधित सकाळची सुरुवात होते. जाई-जुई,मदनबाण,सोनचाफा,सोनटक्का,जास्वंद,मधुमालती पाण्याने तृप्त होतात. पानापानांतून आंबा,गुलमोहर शहारतात आणि खट्याळपणे मीही पाणी उडवत राहते.. आता महामार्गावरील गाड्यांचा आवाज यायला सुरुवात होते. भाजीवाले बाजारातील जागेच्या ओढीने भराभर पावलं टाकत असतात. दहीवालीचे हाकारे सुरु होतात आणि दिवस आपल्याला त्याच्या ताब्यात घेतो.





No comments:

Post a Comment