Wednesday, February 17, 2021

 #वाचावेजनाचेलिहावेमनाचे २५  

 - भ यंकरसुं दरम राठी भाषा – ददि.पुंडे

भयंकर सुंदर मराठी भाषा -द.दि.पुंडे

      हे पुस्तक वाचल्यापासून यातील काही गोष्टी अजिबात पाठ सोडत नाही. अगदी हलक्याफुलक्या शैलीत लेखक आपल्याला मराठी भाषेतले वैभव दाखवतो.त्याच बरोबर आपल्या चुका गंमतीच्या स्वरुपात दाखवून डोळे उघडतो.त्यातला एक उतारा तर मला फार आवडतो.

  “रामायणा आहे नं, त्याची गोष्टा.इश्वाकू नावाचे कुला म्हणजे फॅमिली असते.तिच्या दशरथा नावाचा राजा होऊन गेला. त्याला तीन राण्या अन चार पुत्रा होते. त्यांची नावे नं रामा,लक्ष्मणा,भरता आणि शत्रुघ्ना अशी होती. जनक नावाचा राजा होता.......”

 हे वाचलं तेव्हा मला फार मजा वाटली आणि त्याच बरोबर हे ही लक्षात आलं की,आज अनेक घरात मराठीतले अकारान्त शब्द आकारान्त उच्चारले जावू लागले  आहेत.त्यावरच हा लेख लिहलेला आहे. बघा ना आज आपल्या सगळ्यांच्या घरात सकाळी अनेकजण योगा करतात.अशा अनेक गंमतीजंमती दाखवत लेखक आपल्याला जागं करत आहे.आपण मराठी भाषेबद्दलचे प्रेम अगदी गळा काढून,झेंडे नाचवून व्यक्त करत असतो.पण बोलतांना आणि लिहतांना, आपल्या काही चुका होतात त्या दुरुस्त करायला हव्या हे मात्र आपल्या लक्षात येत नाही.

   या पुस्तकात ४१ लेख आहेत. त्यांची शिर्षकं पाहिली तरी आपल्याला त्यातली गंमत कळते.उदा. उच्चार मन साहीना, “च.म.ठे.के.सा.न.”, दोन काके-दोन चुलता. लेखांच्या नावावरूनच पुस्तक वाचावं असं वाटतं.कारण भाषा ही गंभीर गोष्ट आहे पण ती गंमत –गोष्ट देखील असते.हे आपल्याला पुस्तक वाचतांना जाणवते. लेखक एका लेखात सांगतो  की,प्रत्येक शब्दाचे एक अर्थ क्षेत्र असते.उदा.घोडा,अश्व,तुरंग,हय ही सगळे शब्द घोड्याला समानार्थी आहेत पण त्यांचा उपयोग करतांना मात्र लक्षपूर्वक करावा लागतो.घोड नवरी म्हणतांना, त्या घोडच्या जागी अश्व वापरून चालणार नाही.लेखक अशा अनेक गोष्टी सहजपणे आपल्या लक्षात आणून देतो,त्यामुळे पुस्तक वाचतांना मजा येते.  मराठी भाषेबरोबरच ती बोलणाऱ्या महाराष्ट्र-समाजाच्याही अनेक तऱ्हेवाईक सवयी,लकबी आणि कथा कहाण्या आपण या पुस्तकात वाचू शकतो.मग आपल्याला कळते की मराठी भाषा ही किती भयंकर सुंदर भाषा आहे की सुंदर आणि गोड आहे.

  लेखकाने आपल्या समाजातल्या लग्नपत्रिकांचे स्वरूप कसे बदलत गेले आहे आणि त्यानुसार आपला सामाजिक इतिहास कसा समजून घेवू शकतो हे ही खूप छान लिहले आहे.याशिवाय एकाक्षरी कोश करणारे प्रा.गोरे यांच्याबद्दल त्यांनी लिहले आहे.यातील अनेक गोष्टी माहीत नसतात आपल्याला. आपण विचार करतो की,असे एकाक्षरी शब्द किती असणार?पण जवळ जवळ ६९ पाने एकाक्षरी शब्दांनी व्यापली आहेत.जसे एका शब्दाला अनेक अर्थ असतात तसेच एकाक्षरी शब्दाला सुद्धा अनेक अर्थ आहे. उदा. ‘न’ या अक्षराचे दहा प्रकारचे अर्थ या कोशात दिले आहे.खरं तर आपले कोश म्हणजे आपली भाषा विकसित करण्याचे एक माध्यम आहे.पण आपण त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही.तसेच आपल्या इथं प्रत्येक नात्याला एक शब्द आहे.त्याबद्दलही आपण किती समृद्ध आहोत हे आपण रोज अनुभवत असतो तरी आपल्या लक्षात येत नाही.

    भाषा ही संवादासाठी असते,एकमेकातले सबंध सौजन्याचे व्हावेत म्हणून तिचा जन्म झाला आहे.पण आपण भाषेवरून एकमेकांशी मारामाऱ्या करतो. राजकारणी प्रश्नाची दिशाभूल करण्यासाठी भाषेला आणि आपल्याला सुद्धा वेठीला धरतात आणि त्यासाठी भाषेचा चुकीचा वापर करतात. आपण आपली भाषा सुधारण्यासाठी काय करतो हे बघणं आणि त्यानुसार स्वतः स्वतःसाठी कृती करणं महत्वाचं आहे.कारण तुम्ही मराठी बोललं पाहिजे असं म्हणतांना आपली मुलं कुठल्या शाळेत जातात आणि ती घरात आईला वडिलांना काय हाक मारतात हे ही डोळे आणि कान उघडे ठेवून बघायला आणि ऐकायला हवं.

   हे पुस्तक वाचतांना मला स्वतःला अनेक गोष्टी समजल्या. बोलतांना आपण काय चुका करतो, त्या चुका आहे हे ही आपल्याला कळत नाही.जसे की ‘चप्पल घाल पायात आणि निघ’ आपण चपलेत पाय घालतो खरं तर.पण बोलतांना असे बोलतो.

         पुस्तकात समाविष्ट केलेल्या प्रत्येक सदराविषयी काहीतरी सांगावं असं मला वाटत होतं.पण तुमची वाचण्याची गंमत निघून जाईल आणि मी काय काय तुम्हांला सांगावं असं म्हणत असतांना सगळंच सांगून बसेन.त्यामुळे भाषेच्या अनेक गंमतीजंमती वाचण्यासाठी पुस्तक मुळातूनच वाचायला हवं.

     या पुस्तकातले सर्व लेख ‘भाषा-वेध’ या सदरामध्ये प्रकाशित झालेले आहेत.  २००२ मध्ये लोकसत्तामध्ये हे सदर प्रकाशित होत असे. त्यावेळी हे लेख सलग वाचले नव्हते.पण पुस्तकामुळे ते नीट सलग वाचता आले आणि त्यातला अर्थ नीट समजून घेता आला.

 

No comments:

Post a Comment