Friday, February 19, 2021

 

बगळ्याचं घर -२३ सप्टेंबर २००६

 ग्रीष्मात येणाऱ्या मोगऱ्याच्या सुगंधाने माणूस कितीही उल्हासित झाला, तरी त्याला वर्षा ऋतूत येणाऱ्या मृद्गंधाची ओढ असतेच नाही का? यात काही चाकोरीबद्धता आहे, असे आपल्याला कधीच वाटत नाही किंवा मुद्दामहून त्यातील सौंदर्य शोधण्याचा आपण प्रयत्न करतो असेही नाही. कशाचीही तुलना न करता आपण तो मृद्गंध स्वतःत  सामावून घेत असतो. या वर्षी मात्र मी या दोन्ही सुगंधाबरोबर एका दुर्गंधीची वाट पाहत होते. ग्रीष्म संपण्यापूर्वी बगळे परत आपापल्या झाडांकडे परत यायला लागतात. वर्षभर तलावाकाठी,शेतात राहणारे बगळे पावसापासून सरंक्षण  मिळावे म्हणून दाट झाडांच्या छायेत परत येतांना दिसतात. बारीक बारीक काटक्या जमवून पसरट टोपलीसारखे घरटं बनविण्याचं त्यांचं काम सुरु होतं. हिरव्या पाना-पानांमध्ये पांढऱ्या शुभ्र बगळ्यांची हालचाल दिसायला लागते. साळूक्यांना वर्षभर वापरलेलं ते झाड सोडून द्यावं लागतं. त्या भरपूर आरडाओरडा करतात.पण बगळे ढिम्म. अजिबातच हलत नाहीत. दिवसागणिक बगळ्यांचा कलकलाट वाढत जातो.त्यांचा विणीचा हंगाम सुरु झालेला असतो. न उडता येणारी काही लहान पिल्लही दिसतात. म्हणजे आधीच क्ध्त्री ते अंडी घालत असावेत. कधी कधी मारामारीत एखादं अंडं खाली पडतं, तर कधी बगळ्याचं पिल्लू. एकदा पडलं की जिवंत राहत नाही. पहाटे माणसांना जाग येनाय्च्या आधी हे बगळे खाली उतरून भरपूर नाष्टा करतांना दिसतात. दिवसभर झाडावर बसूनही काहीबाही खात असावेत. कारण सगळं अंगण ते रात्रीतून पांढरं करून टाकतात. त्याची खूप घाण येते. मनून आजूबाजूचे लोक त्यांना जोरजोरात हाकलून लावण्याचा प्रयत्न करतात. कोणी फटाके वाजवतात. बगळे क्षणभर उडून जातात आणि परत झाडावर येऊन बसतात.कधी कधी पाथरवटाची पोरं एखादा बला खाली पाडतात आणि भाजून खातात.पण हे क्वचितच. मुसळधार पाउस पडत असतो. सोसाट्याचा वारा वाहत असतो. अशा वेळी झाड तुटून पडेल की काय, याची भीती वाटते.पण बगळे ते झाड सोडून जातांना दिसत नाहीत. बांधलेल्या घरट्याला पानांच्या आड ते घट्ट पकडून बसतात. ओलेचिंब होतात, तरीही माणसांनी बांधलेल्या घराच्या आडोशाला ते येत नाहीत. नवल वाटतं ते त्यांच्या चिवटपणाचं... हळूहळू पाऊस ओसरतो. वाराही हळुवारपणे यायला लागतो. बगळ्यांची पिल्लं केवढी झाली हे मात्र आपल्याला समजत नाही.पण ती नक्कीच वाढली असणार. कारण कलकलाट वाढलेला असतो. शिकाऊ उमेदवार आजूबाजूला दिसतात. झाडाच्या खाली कुत्री जमायला लागतात. त्यावरून वर पिल्लं आहेत हे कळतं.पाऊस थांबल्यावर बगळे आपल्या रस्त्याने परत जायला निघतात. शेतात पेरणी सुरु झालेली असते. काही झाडांना मोहर आलेला असतो.पिवळ्या चोची आता त्यावर तुटून पडतील.नाही तर तलावातील मासे खातील. माहित नाही.पण ते जातात. मागे उरतात फक्त त्यांनी बांधलेली रिकामी घरटी. 




No comments:

Post a Comment