Friday, February 19, 2021

 

अवघाचि संसार -१३ ऑक्टोबर २००६

पहाट रोजच होते,पण प्रत्येक वेळी नवीन नवीन गोष्टी दाखवून देते. आजही भल्या पहाटे उघ्ले.तोंडावर गार पाण्याचा हबका मारला. बरं वाटलं. लक्षात आलं की, आज बाहेर नेहमीच्या आवाजांबरोबरच दुसराच एक मंजुळ आवाज येतो आहे. कोणाच बरं आहा आवाज? पक्ष्यांचा? छे, घनतेचा वाटतो आहे. बैलाच्या गळ्यात अडकवलेल्या घनतेचा मंजुळ आवाज होता तो. खरं तर आमचं घर गावाबाहेर,महामार्गाच्या शेजारी. त्यामुळे गावात सहजपणे ऐकू येणारे आवाज कधीमधीच ऐकू येतात. घाई घाईने पायऱ्या उतरून अंगणात आले, तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक बैलगाड्या एकामागोमाग उभ्या होत्या. ऊसतोडणी मजूर मोठ्या संख्येने कारखान्याकडे निघाले होते. रस्त्यात एक एक दिवस विसावा घेत आणि बैलांना विसावा देत ही मंडळी गाव सोडून चालली होती. महामार्ग खरोखरच जिवंत झाला होता. प्रत्येक बैलगाडीत तीन-चारजण होते. काहींमध्ये नवरा-बायको,मुलं असं सगळं कुटुंबच होतं. एवढ्याशा छोट्या गाडीत त्यांच्यासह त्यांचा संसार मावत होता.माझ्यासाठी हे जरा नवलाचच होतं. एक हंडा,पातेलं, ताट कं परात,बाज, सायकल, गोधडी. बास. एवढंच सामान त्यांच्याजवळ होतं. ज्या ठिकाणी थांबायचं, तिथं तीन दगडांची चूल करून ते स्वयंपाक करतात. बायका चूल पेटवतात. तोपर्यंत पुरुष पाणी आणायला धावतात. हे त्यांचं नेहमीचं ठिकाण असावं. कारण कोणालाही न विचारता ते पाण्याच्या टाकीजवळ गेले आणि त्यांनी पाणी भरून आणलं. ज्या गाडीबरोबर फक्त पुरुषच होते, ते स्वतःच भाकरी टाकत होते. छान,मोठ-मोठ्या गोलाकार भाकरी. आमच्या घरापर्यंत भाकरी भाजल्याचा खरपूस वास येत होता. मूलं हुंदडत होती. शाळा,अभ्यास या कटकटीतून सुटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आता पुढचे काही महिने आई-वडीलांसमवेत मजुरीच्या कामातच जाणार. तरीपण त्यांनी शिक्षण घ्यायलाच हवं, असं मनात वाटत होतं.मी त्यांचे रोजचे व्यवहार बघत होते. त्यांच्या हालचालीतली सहजता, मुलांचा रस्त्यावरचा वावर निर्भयपणे होत होता. अज्ञानात सुख असतं का?

‘वहिनी, माणसं पाणी भरत्यात बघा’ दुधवाला म्हणाला. ‘तुम्ही नळ झाकून टाका म्हणजे येणार नाहीत कोणी...’ त्याने सल्ला दिला.

‘भरू द्यात,टाकी खाली होणार नाही एवढ्याने....’मला पाणी, चोरी,भांडी,लबाडी यातलं काहीच दिसत नव्हतं. फक्त पलीकडच्या रस्त्यावरचा निखळ संसार दिसत होता.अनेक अडचणीतून चालणारा.....

 


No comments:

Post a Comment