Sunday, February 21, 2021

 

Travels Through south Indians kitchens

 Nao Saito

  Published by Tara Books

     आपल्याच स्वयंपाकघराकडे नाविन्याने बघायचे असेल तर Nao Saito ने लिहलेले Travels Through South Indian Kitchens” वाचायला हवे. मी ते पुस्तक हातात घेतलं तेव्हा त्यातील रेखांकने पाहूनच खुश झाले होते.या पुस्तकाचा सगळ्यात मोठा आणि चांगला गुण कोणता तर त्याचा ‘साधेपणा’होय. यातच लेखिकेने जो आनंद आपल्याला दाखवला आहे तो सुद्धा खूप छान आहे.

   खरं तर सुरुवातीला भारतीय स्वयंपाक घराविषयी दुसरं कोणी आम्हांला कसं सांगू शकेल?हा कुचकट विचार आपल्या मनात येऊ शकतो.तो जरा बाजूला सारून पुस्तकाकडे लक्ष दिलं की आपल्याच स्वयंपाक घरातल्या कितीतरी जागा ती आपल्याला दाखवते, ज्यांचा वापर अतिशय नजाकतीने करतो.

    Nao (नाओ) ही जपानी आर्किटेक्ट आणि डिझायनर आहे.  ती तारा बुक्सच्या  टोकियो मध्ये झालेल्या वर्कशॉप मध्ये सहभागी झाली होती. नंतर चेन्नई इथे असेल्या तारा बुकच्या प्रकाशनगृहात निवासासाठी तिला आमंत्रित केलं होतं.जेव्हा ती इथं आली तेव्हा तिने ठरवलं की लोकांना त्यांच्या स्वयंपाक घरात जाऊन भेटायचं.त्यांचा शोध त्यांच्या स्वयंपाक घरातून घ्यायचा.कारण स्वयंपाक घरं ही प्रवाही होतात कारण त्यात राहणारी माणसं त्याला तशी ठेवतात.तिने तिच्या प्रवासाची सुरुवात ऑफिस मधल्या सहकाऱ्यांच्या स्वयंपाकघरापासून केली आणि नंतर त्यांच्या मित्रांच्या घरी,मग मित्रांच्या मित्रांकडे सुद्धा गेली. 

   Nao Saito ने अतिशय सुंदर साधे आणि सोप्पी रेखाटने केली आहेत.त्यात स्वयंपाक घरातली भांडी,नारळ,भाज्या, झेंडूची फुलं आहेत.विळी (arivalmannai ),पाटा-वरवंटा( Ammi) यांचीही रेखाटने आहेत.ती त्याबद्दल जे सांगते त्यामुळे आपलं स्वयंपाक घराकडे नीट लक्ष जातं. ती आर्किटेक्ट असल्याने तिने ज्या ज्या स्वयंपाक घरांना भेटी दिल्या त्यांचा  फ्लोअर प्लान काढला आहे.कधी कधी तिला स्वयंपाक घरातले सिंक सहज हात पोहचेल असे लावलेले नाही हे ही दिसते.त्याचीही ती नोंद घेते.

    तिने जवळ जवळ २२ स्वयंपाकघरांना भेटी दिल्या. सुरुवातीला तिच्या स्वतःच्या इथल्या स्वयंपाक घरातली शेगडी पेटवतांना काय मजा झाली हे ही ती सांगते, “मी  गॅस चालू केला पण शेगडी पेटलीच नाही.” तिच्यासाठी लायटर ही संकल्पना नवीन होती/अनोळखी होती.या पुस्तकाची कल्पना या तिच्या  स्वयंपाक घरात असणाऱ्या विविध प्रकारचे मसाले आणि कडधान्य यामुळे तिच्या मनात आली. तिने पारंपारिक स्वयंपाक घरांना भेटी दिल्या, तसेच फक्त मुली वापरत असणारे,अविवाहित मुलगे वापरत असणारे स्वयंपाक घरांना सुद्धा तिने भेट दिली.चेट्टीनाड स्वयंपाक घर,शाळेचे स्वयंपाक घर,त्सुनामी मुळे बाधित झालेल्यांची,वीज नसलेली स्वयंपाक घरेही तिने अनुभवली.या सगळ्या दक्षिण भारतीय स्वयंपाक घरातली विविधता बघून तिला खूप आश्चर्य वाटले.

   आपण आपल्या स्वयंपाक घराकडे ज्या दृष्टीने बघतो त्या दृष्टीने ती बघत नाही. तिला आपलं स्वयंपाक घर कसं बाहेर ओट्या पर्यंत विस्तारत जातं हे बघतांना अनुभवतांना फार छान वाटतं.आपण घराच्या बाहेर काही वाळायला ठेवतो,समोरच्या नळा वरून कोणी पाणी आणतं,शेजारी आज काय भाजी केली हे सहज विचारतात.याला ती विस्तारणे म्हणते.एखाद्या परक्या माणसांकडून ही दृष्टी घेतांना मला आपण अजून उदार व्हायला हवं हे पटलं.तिने सहजपणे एक आपल्यात आणि तिच्या साकव उभं केलं.तरीही ती या पुस्तकात कुठेही दिसत नाही.तिने अनेक पदार्थ चाखून पाहिले आणि ते कसे करायचे हे सुद्धा सांगितले.तसेच आधुनिक स्वयंपाक घरात कसे शोर्ट कट असतात आणि तरीही पदार्थ कसा चांगला होतो हे ही ती सांगते.या सगळ्या वर्णनात काही घरात पुरुष सुद्धा स्वयंपाक करतांना आढळतात आणि ते सहजरित्या आपल्या स्वयंपाक घरात वावरतात याचेही वर्णन ती करते.

  फक्त या पुस्तकात एकच गोष्ट मला फार गंमतीची वाटली,लेखिका ज्यांच्या बद्दल लिहते आहे त्यांच्या नावाचे फक्त आद्याक्षर ती घेते.जसे की निर्मला नाव असेल तर ती ‘नी’ म्हणते.हे सुरुवातीला आपल्याला डाचतं.पण तिच्या दृष्टीने ती त्यांचा खाजगीपण जपत असते.आपल्याला एखाद्याचे नाव घेवून लिहण्याची सर्रास सवय असते.

  लेखिकेने फक्त तामिळनाडू मधल्या स्वयंपाक घराबद्दल लिहले आहे. पण तिने वेगवेगळ्या जाती-धर्मातील लोकांच्या स्वयंपाक घरांना भेटी दिल्या.खरंतर एखाद्याच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहचणे ही खूप अवघड गोष्ट आहे. पण तिने अनेकांशी स्वतःहून मैत्री केली आणि ती काही पदार्थ करायला शिकली.काहीवेळेस तिला घरची आठवण येत असे अशावेळी ती तिच्या जपानच्या घरातले आणि आपल्या इथल्या स्वयंपाक घरातले साम्य बघत असे. स्वयंपाक घरात नेहमी काही शिजवले जातेच असं नाही पण एकमेंकाशी घट्ट नातं निर्माण करणारी ती छान जागा आहे असे तिला वाटते.ती जागा तुमची तुम्हीच निर्माण करू शकतात असे ती म्हणते.

   या पुस्तकात दिलेले पदार्थ हे नेहमीचे असले तरी त्यामागची गोष्ट फार सुंदर आहे.प्रत्येकाचे मोजमाप करण्याची पद्धत ती सांगते.भाजी चिरण्याची पद्धतीचे वर्णन करते.एखाद्या नवीन ठिकाणी जाऊन एखाद्या साध्या विषयाचा अभ्यास करतांना कितीतरी गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि त्या कश्या घ्यायच्या हे यापुस्तकातून आपल्याला नक्की कळते. आपण हाताने कसे खातो,शिक्षिका तिच्या वर्गातल्या लहान मुलांना भरवते,सणाच्या दिवशी लोक एकमेकांना मदत करत कसे पदार्थ करतात,हे सगळं ती अचंबित होऊन बघते. आपलीही दृष्टी  तिच्या नजरेने  या सगळ्याकडे बघतांना बदलत जाते. आता कोणाच्या घरी गेलो की त्या घराचे वेगळेपण आपण सहज टिपू शकू हे नक्की.  

 


No comments:

Post a Comment