Friday, February 19, 2021

 

ओढ गावाकडची – १३ एप्रिल-२००७ लोकसत्ता

‘गावाकडची ओढ’ असं कुणी म्हटलं की फार हसू यायचं, वाटायचं उगीच मनाचे चाळे  आहेत, बाकी काही नाही.पण नंतर त्याच अवस्थेचा मलाही अनुभव येवू लागला.म्हणजे अगदी रुढार्थाने नाही म्हणता येणार.कारण बऱ्याच जणांना आपलं बालपण ज्या गावात गेलं किंवा पूर्वज ज्या गावात राहत होते, त्या गावाची विलक्षण ओढ वाटतं. तसं काही माझ्या बाबतीत होत नव्हतं.

     एखाद्या गावात आपण किती दिवस राहतो, याला माझ्या दृष्टीने फारसे महत्व नाही. तिथं आपण राहतो, दैनंदिन जीवनात समरसून जातो आणि तिथलेच होऊन जातो.तिथं अनुभवलेली सकाळ, सुपर, संध्याकाळ,दिवस-रात्रीतील कोणतीही वेळ..आता मी नसतांना तिथं काय चालू असेल? गावात प्रवेश करतांना प्रथम ज्या झाडांवर दृष्टी गेली ती झाडं माझ्याशिवाय कशी जगत असतील? अशा नॉस्टलॉजिक मूडमध्ये परत त्या गावी जावं असं फार वाटतं.ती वेळ, ते क्षण परत हवेहवेसे वाटतात.

  गावात जाणाऱ्या वळणावळणाच्या वाटा,जंगलात दूरवर जाणाऱ्या लहानखुऱ्या लाल पाऊलवाट,उन्हाळ्यात पानांचा होणारा करकर आवाज,पानगळीचे वृक्ष,फुललेला पळस,लांबवरून पाणी घेवून येणाऱ्या बायका,अंगावर धडकं नाही म्हणून लपून बसणाऱ्या तरुण पोरी...या सगळ्यांसाठी मी तिथं जायलाच हवं का? याचं कारण जाहीरपणे सांगता येणार आहे? खरं तर मनालाही ते समजावून सांगता याचं नाही.

    एखाद्या गावात अनेक गोष्टीची कमतरता असते. बरेचजण त्याची लांबलचक यादीही करतात. पाणी चांगलं नाही,शिक्षणाच्या सोयी नाहीत वगैरे वगैरे...पण गाव म्हटलं की असं होणारच. त्यात दुःख करण्यासारखं, उदास वाटण्यासारखं काय आहे? त्याशिवायही माणसांना त्या गावात राहता येतंच की!

   निश्चिंत असं एखादं गाव आपलं असतं,असं मला मनापासून अजिबात पटत नाही.वेगवेगळ्या गावात फिरतांना ती गावं मला माझीच वाटतात.मग माझं गाव कोणतं?कशाची ओढ?प्रत्येक गावात मला ती थोडी थोडी सापडते आणि ते गाव मला माझंच वाटतं.

    काय मिळवत असतो आपण एखाद्याला त्याचं गाव विचारून, जे तो मागे ठेवून आलेला असतो. त्याला त्या गावच्या सर्वच आठवणी हव्या वाटत असतील का? कितीतरी नकोशा वाटणाऱ्या आठवणीही त्या गावाशी जोडल्या गेल्या असतील. ते संदर्भ पुसण्यासाठी कितीतरी पल्ला ती व्यक्ती शरीराने आणि मनानेही पार करते. तरीही आपल्याला त्याच्या पार्श्वभूमीवरचं गाव मात्र हवं असतं. असं का होतं? काय असतं तिथं त्याचं?

     त्या व्यक्तीने जोडलेल्या छोट्या छोट्या गावांनी,त्यातील छोट्या छोट्या प्रसंगांनी,त्यांनं त्यःच्म जीवन समृद्ध केलेलं असतं. त्याची कृतज्ञतापूर्वक जाणीव ठेवून व्यक्ती  पुढची पाउलं टाकते. आपण मात्र त्या व्यक्तीला चौकटीत बांधायला पाहतो.ती या गावातून , राज्यातून आली म्हणजे ही ही वैशिष्ट्ये तिच्याकडे असणारच असं आपल्याला वाटतं.म्हणून वाटतं आपण आपल्यासारखं असण्याची ओढ असली की एखाद्या गावाने असा काय फरक पडणार आहे?

  ...शिक्षण,नोकरी बदलीच्या निमित्ताने कितीतरी गावं पाहिली.आधीचं गाव सोडतांना मन उदास व्हायचं,पण नव्या गावाची ओढही लागलेली असायची.नव्या गावात रुळेपर्यंत, माणसं ओळखीची होईपर्यंत जुनं गाव आठवत राहतं. नंतर हळूहळू नवं गावच आपलं होऊन जातं.










 

No comments:

Post a Comment