Friday, February 19, 2021

 

गौरीचं झाड -४ मार्च २००७,लोकसत्ता

 ‘मावशी, दोन दिवस  आला नाहीत? बरं नव्हतं का? मी आमच्याकडे काम करणाऱ्या बाईंना विचारलं. त्यांचा चेहरा आधीच खूप सुकला होता. मनामध्ये चिंतेचे ढग कधीचेच जमा झाले होते. फक्त कोणी हात लावायचा अवकाश, लगेच ते बरसायला लागले.

‘काय झालं? नीट सांगा बरं, रडू नका’

माझी केविलवाणी धडपड.

‘माझ्या भाच्चीनं औषध घेल्म आणि ती गेली’ मावशी रडतच म्हणाल्या.

‘गेली’ अहो, दोन महिन्यांपूर्वीच तर लग्न झालं ना तिचं,मग? माझ्या या प्रश्नाला आणि त्यानंतर त्यांच्या येणाऱ्या उत्तराला खरंतर काहीच अर्थ नव्हता.आम्ही या आदिवासी भागात राह्यला आल्यापासून अशा ‘औष’ घेऊन आत्महत्या करण्याचे प्रकार खूप ऐकले होते. तरुण मुला-मुलींचा  त्यात अधिक भरणा होता. खरंतर ही सर्व आदिवासी मंडळी दवाखाना,औषधाचं दुकान यापासून शंभर हात दूरच राहण्याचा प्रयत्न करणारी.मग ते हे ‘मरायचं औषध कुठून मिळवतात?चौकशी केली तर कळलं.ते औषध म्हणजे एक प्रकारचं झाड असतं. त्याचं नाव ‘गौरीचं झाड!’

‘गौरीचं झाड’ हे लांब जंगलात वाढतं. पावसाळ्याच्या मध्यावर त्याची रोपं फोफावतात.गणपतीबरोबर गौरी आल्या की गावातील आदिवासी मंडळी वाजतगाजत जंगलात जातात आणि गौरीचं झाड मुळासकट घेवून येतात. त्याला कळ्याही आलेल्या असतात. या झाडाला केशरी रंगाची तजेलदार फुलं येतात. हे झाड घरी आणून पितळी भांड्यात,नाहीतर मातीच्या मडक्यात ठेवायचं.त्याला विविध प्रकारे सजवायचं. पानाफुलांची तोरणं बांधायची, रूढीनुसार पूजा करायची, तांदळ्याच्या पिठीचे गोड पदार्थ करून नैवेद्य दाखवायचा. असं सगळं या झाडाचं कौतुक करून त्याची ‘गौरी’म्हणून पूजा केली जाते. म्हणून ते ‘गौरीचं झाड’. दुसऱ्या दिवशी रात्री अंगणात वाद्यांच्या तालावर नाच करायचा आणि सकाळी ते झाड आपापल्या शेतात, नाहीतर घराच्या मागे आशीर्वादासाठी लावून द्यायचं.

   या झाडामुळे जितका आनंद मिळतो तितकंच दुःखही!....गौइक्य झाडाची मूळं विषारी असतात. जगणं नकोसं झालं, तर जंगलात जाऊन गौरीचं झाड शोधायचं आणि आपल्या आयुष्याला तिलांजली द्यायची. इथे हे सर्रास चालतं.नंतर जंगलाच्या वाटेवर पडलेला मृतदेह कोणीतरी पाहतं.मृतदेहावर गावकरी अंत्यसंस्कार करतात.पोलिसांकडे तक्रार नाही की पंचनामा नाही. या आत्महत्येची नोंद कुठेही होत नाही. तो केवळ एक अपघात असतो. कारण या विषारी औषधाची कुठे नोंदच नसते. वयाने मोठ्या असणाऱ्या मुलाशी लग्न लावून दिले म्हणून,वेगळी झोपडी नाही म्हणून, दुसराच यार आवडला म्हणून, सावकाराचे कर्ज फेडता आले नाही म्हणून.... अशा कितीतरी कार्न्न्णाई ही तरुण मुलंमुली,प्रौढ माणसं आत्महत्या करतात. एकत्र इतकं कष्टाचं जीवन ते जगत असतात की,आपण त्यांच्या दुःखाची कल्पनाच करू शकत नाही. कितीतरी पाड्यांवर वीज,पाणी,वाहन, गिरणी यांची काहीच सोय नसते. सावकारापासून वाचवलेल्या तांदळाची दोन्ही वेळेला ‘आमली’ करायची आणि खायची.पुन्हा गरज लागली की त्यातच सावकारापुढे हात पसरायचा.त्यःची कर्जफेड करतच जगायचं. तेही अशक्य झालं की जीव संपवायचा.विदर्भ,मराठवाड्यातले शेतकरी आत्महत्या करू लागल्यावर त्यांच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष द्यायला लागलं.आदिवासीच्या मरण्याची आणि त्यांच्या जिवंतपणीच्या  मरणासन्न जगण्याची दखल कोण आणि कधी घेणार?तोपर्यंत ‘गौरीचं झाड’ जवळ करण्यावाचून त्यांना पर्याय नाही. 

   


 

No comments:

Post a Comment